शिवसेना-भाजप युती कायम राहणार

0
83

भाजपला १३० जागा देण्यास मान्यता
महायुतीबाबत अद्याप स्पष्टता नाही
महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपला १३० जागा देण्यास शिवसेनेने काल मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी बैठक घेऊन नंतर एका पत्रकार परिषदेत युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, भाजप-शिवसेना व अन्य मित्रपक्ष यांच्या नेत्यांची महायुतीसाठीची बैठक रात्री उशिरापर्यंत चालू होती. या बैठकीत शिवसेनेने १५० जागांवरून खाली यावे अशी मागणी घटक पक्षांनी केल्याची माहिती मिळाली.
काल सकाळी शिवसेनेचे सुभाष देसाई, संजय राऊत, अनिल देसाई व मिलिंद नार्वेकर हे नेते भाजपच्या मुंबई कार्यालयात दाखल झाले. उभयतांमधील युती कायम ठेवण्याच्या हेतूनेच चर्चेसाठी हे नेते तेथे गेले होते. त्यावेळी तेथे भाजपचे निवडणूक निरीक्षक ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे हे वसंत स्मृतीमध्ये उपस्थित होते. या सर्वांमध्ये युतीविषयी तपशीलवार चर्चा झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी मित्रपक्षांच्या जागा कमी करून भाजपला जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने मांडला. तो प्रस्ताव भाजप नेत्यांना मान्य झाल्याचे सांगण्यात आले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आपल्या पक्षाची भूमिका विनोद तावडे व संजय राऊत यांनी स्पष्ट केली. युतीचे भवितव्य दोन पक्षच ठरवतील व युती कायम ठेवण्यावर आमचे एकमत आहे असे राऊत यांनी सांगितले. संध्याकाळी मित्र पक्षांशी या संदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असेही तावडे यांनी सांगितले. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.