जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना काल टोकियोमध्ये शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींकडून आबे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अंत्यसंस्कारासाठी ७०० परदेशी पाहुणे उपस्थित होते. जपानच्या नारा शहरातील प्रचारसभेदरम्यान आबे यांची ८ जुलैला हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काल शिंजो आबेंवर जपान सरकारकडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची अंत्यसंस्काराआधी भेट घेतली. आबे यांनी भारत आणि जपानचे संबंध अधिक उंचीवर नेले, असे मोदी या भेटीत म्हणाले.