शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार

0
160

>> खुनाचाही केला प्रयत्न; आरोपी १२ तासात जेरबंद ः केपे तालुक्यातील घटना

मायणा-कुडतरी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचे बळजबरीने अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सां जुझे आरियल येथील मेलवीन आंतोनियो जुझे फर्नांडिस (२३) या युवकाला काल पोलिसांनी अटक केली व त्याची स्कूटर जप्त केली. पोलिसांनी संशयितावर भा. दं. सं.च्या कलम ३०७, ३७६ व कलम पोक्सो कायद्याच्या कलम ४ खाली गुन्हा नोंद केला आहे. त्याला न्यायालयात दाखल केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी फर्मावली असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

याबाबत वृत्त असे, दि. ११ रोजी शाळेत गेलेली मुलगी परत न आल्याने कुटुंबियांनी दुपारी २ वाजता मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदविली. सायंकाळी ७ वाजता आंबावली येथील कामगार महिलांनी जखमी, बेशुद्धावस्थेत अज्ञात मुलगी पडली असल्याचे वृत्त पोलिसांना दिले. पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांना माहिती देताच त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना तपासाचा आदेश देऊन पोलीस दलासह ते आंबावली येथील डोंगराळ निर्जन स्थळी रवाना झाले.

उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सागर एकोसकर, रवींद्र देसाई, सचिव नार्वेकर, उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक, महेश वेळीप, अशोक बावकर, पोलीस कॉन्स्टेबल रिझवान शेख, चेतन कोली, विकास नाईक, एडवीन कार्व्हालो, समीर सुदीर, विशाल धुरी, रोनीत नाईक, किशोर गावकर, मिनार देसाई, सतीश गावकर, अविनाश नाईक, विशाल धुईवर, गोरखनाथ गावस, विशाल प्रभु, कल्पेश खोलकर, सिद्धेश कोणरकर व रुपा वेळीप यांनी तपास सुरू केला.
त्या अल्पवयीन मुलीच्या डोक्याला व चेहर्‍यावर गंभीर जखमा झाल्या होत्या व ती बेशुद्धावस्थेत होती. तात्काळ तिला हॉस्पिसियु इस्पितळात दाखल करून तात्काळ उपचार सुरू केले. मेलवीन याने बलात्कार करून तिचा खून करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

आरोपीने शाळेच्या
वेळेतच मुलीला नेले
पोलीस पथकाने सर्वत्र आरोपीचा तपास सुरू केला. कित्येकांकडून माहिती मिळविली. शेवटी एका स्कूटरवर मुलीला बसवून आंबावली येथे तरुणाला पाहिल्याचे सांगताच त्या अनुषंगाने तपास करून आरोपीच्या घरावर गुरुवारी पहाटे छापा टाकून त्याला अटक केली. त्याने शाळेच्या वेळेतच तिला स्कूटरवर बळजबरीने बसवून आंबावली येथे डोंगरदरीत नेले. त्या मुलीने मेलवीन याला लैंगिक अत्याचार करण्यास विरोध केला व त्यावेळी झटापट झाली. त्यावेळी मेलवीनने तिला मारहाण केली. डोक्यावर प्रहार केला व त्यानंतर बळजबरीने बलात्कार केला. त्यात ती बेशुद्ध पडली. तिला त्याच अवस्थेत सोडून रात्रौ उशिरा तो घरी परतला. पोलीस दलाने सायंकाळी ७ वा. पासून आरोपीचा तपास सुरू केला व शेवटी बारा तासांच्या आत अटक केली. या अमानुष प्रकाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पीडित मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तर संशयिताची वैद्यकीय तपासणी केली असल्याची माहिती देण्यात आली.

महिलांवरील अत्याचार रोखण्यात
सरकार अपयशी ः गोवा फॉरवर्ड

राज्यात महिलांवर होणार्‍या अत्याचारांत वाढच होत असून केपे येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे, असे गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला अध्यक्ष ऍड. अश्मा सईद यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यात राज्य सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोप सईद यांनी यावेळी केला.
वर्षातून एकदा महिला दिन साजरा केला की महिलांप्रती असलेली आपली जबाबदारी संपली असे राज्य सरकारला वाटत आहे काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सहा महिन्यांत ३९ बलात्कार
छोट्याशा गोव्यात गेल्या सहा महिन्यांत ३९ महिलांवर बलात्कार झाल्याचे सांगून सरासरी ५ दिवसांत एक बलात्कार झाल्यासारखे हे प्रमाण असल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय सगळ्याच महिला काही तक्रार करीत नाहीत. त्यामुळे काही बलात्कारांची नोंद होत नसल्याचे त्या म्हणाल्या. बलात्कार पीडीत महिलांना न्याय मिळत नाही. त्यामुळे काही महिला बलात्काराची तक्रार नोंदवत नाहीत असे सांगून ‘निर्भया’ सारख्या गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अद्याप फाशीची शिक्षा झाली नसल्याचे त्या म्हणाल्या.
भाजप महिला मोर्चा
आता गप्प का?
गोवा पूर्वी असे नव्हते व राज्यात अशा प्रकारे महिलांवर बलात्कार होत नसत, असे त्या म्हणाल्या. गोवा सरकारचे हे अपयश असून महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कधी पावले उचलेल, असा प्रश्‍न सईद यांनी यावेळी केला. पणजी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी भाजप महिला मोर्चाने महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावरून रान उठवले होते. आता या महिला गप्प का आहेत, असाही प्रश्‍न त्यांनी केला.
ग्रामीण भागात रस्त्यांवरील पथदीप पेटत नाहीत. त्याचा फायदा उठवीत गुन्हेगार महिलांवर अत्याचार करीत आहेत, असे सईद म्हणाल्या.