शारदीय चंद्रकळेचा अलौकिक आविष्कार कोजागिरी पौर्णिमा

0
6
  • – पौर्णिमा केरकर

पौर्णिमेची प्रसन्न रात्र… त्यात ही शरदातली पौर्णिमा. इतर ऋतूंत येणार्‍या पौर्णिमांपेक्षा जराशी वेगळी… शुभ्र, प्रसन्न, पारदर्शक! वार्‍याच्या मंद झुळका पिकून सोन्यासारख्या झालेल्या भातशेतीवरून हलकेच स्पर्श करून जायच्या तेव्हा एक सोनसळी लहर नसानसांत भिनून जायची. कोजागिरी ही धनधान्याची, समृद्धी-सुबत्तेची देवता म्हणून लोकजीवनात वंदनीय ठरलेली आहे. धार्मिक, श्रद्धाळू मनांनी तिला तर साक्षात लक्ष्मीचे रूप मानून अंतःकरणात अढळपद दिलेले आहे.

सूर्य, चंद्र, चांदणे, तारका, आकाश यांविषयी लोकमनाला अगदी पूर्वापारपासूनची ओढ आहे. सूर्य-तारकांप्रमाणेच रात्रीच्या अथांग शांततेत चंद्राची, चांदण्याची त्यांना भुरळ पडायची. चंद्र-सूर्याविषयीची त्यांची भावना एवढी नितळ आणि पारदर्शी आहे की अवकाशातील या ग्रह-तार्‍यांना त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात महत्त्वपूर्ण स्थान दिले. त्यातील देवतत्त्वांसमोर नतमस्तक होत जगण्याला सुख-शांतीची किनार बहाल केली.

आश्विन-कार्तिक मास हे आनंद, समाधान, हर्षोल्हासाची पेरणी सभोवतालावर करीत करीत प्रवेश करीत असतात. ही भूमी सण-उत्सवांची. बदलत्या प्रत्येक ऋतूत लोकमानसाला काव्य दिसलं. निसर्गसौंदर्याने त्यांना भुरळ घातली. वर्षातील बाराही पौर्णिमांना त्यांनी महत्त्वाचे स्थान बहाल केले. सण, उत्सव, व्रतवैकल्ये यांची जोड या पौर्णिमांना दिली. अश्विन महिना धनधान्याची सुबत्ता अनुभवत अवतरतो.

सुफलन आणि सृजनाची पूजा केली जाते. शक्तीच्या विविध रूपांची भक्तिभावाने आळवणी करण्यात येते. नवरात्रांत नऊ धान्यांची पेरणी घरात, मंदिरात करून त्याला दुधाने, हळदपाण्याचे शिंपण दिले जाते. नवव्या दिवशी बरोब्बर हिरव्या-पिवळ्या कोंबांची लवलव अलवार डोलते. हे भूमीचे मार्दव या रुजवणातून जेव्हा आविष्कृत होते, मातृपूजनातून ते गडद होत जाते, त्याच आश्विनात येणारी पौर्णिमा ही ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते.

आश्विन मासात पाऊस परतीच्या वाटेवर असतो. हवेत गारठा आणि मातीत ओलावा झिरपत जातो. धनधान्याची सुबत्ता सर्वत्र जशी दिसते तशीच ती सभोवतालच्या वातावरणातूनही जाणवते. घरात मुबलक दाणागोटा आलेला असतो. कष्टकर्‍यांच्या कष्टाचे सार्थक झाल्याचीच ती अनुभूती असते. पौर्णिमेची प्रसन्न रात्र… त्यात ही शरदातली पौर्णिमा. इतर ऋतूंत येणार्‍या पौर्णिमांपेक्षा जराशी वेगळी… शुभ्र, प्रसन्न, पारदर्शक! वार्‍याच्या मंद झुळका पिकून सोन्यासारख्या झालेल्या भातशेतीवरून हलकेच स्पर्श करून जायच्या तेव्हा एक सोनसळी लहर नसानसांत भिनून जायची. पिवळ्या रंगाची छोटुकली असंख्य फुलपाखरे, भिरमोटी, केसाळ कुसुंडे आजूबाजूला भिरभिरत जाताना… घरात, दारात, भाताच्या राशीवरून अंगाखांद्यावर येताना कोजागिरी इथेच अवतीभोवती असेल… नितळ, दुधाळ चांदण्याची बरसात करीत करीत ती येत आहे याची जाणीव व्हायची. कोजागिरी ही धनधान्याची, समृद्धी-सुबत्तेची देवता म्हणून लोकजीवनात वंदनीय ठरलेली आहे. धार्मिक, श्रद्धाळू मनांनी तिला तर साक्षात लक्ष्मीचे रूप मानून अंतःकरणात अढळपद दिलेले आहे.
कोजागिरीच्या पिठोरी चांदण्यात लक्ष्मी म्हणे धारित्रीवर अवतीर्ण होते. ती सर्वत्र फिरते. कोण जागी आहेत, कोण सत्कर्म करीत आहेत, कोण उत्साह-आनंदाने रात्र जागवीत आहेत? याची पडताळणी करून जी जागी आहेत त्यांना आशीर्वाद देत त्यांच्याच ठिकाणी धनधान्याची, सुबत्तेची बेगमी करते. याच समजावर अतूट विश्वास ठेवीत वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या साथीने रात्र जगविण्याची परंपरा सुरू झालेली आहे. आश्विनातील हीच पौर्णिमा देवभोळी… नृत्य, नाट्य, संगीत, भजन, कीर्तन आदींनी सजलेली. व्रत-वैकल्यांचे अधिष्ठान असलेली. याच पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी व ऐरावतावर आसनस्थ झालेल्या इंद्रदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. पोहे तसेच नारळपाणी पितरांना अर्पण करण्याची परंपराही अनेक ठिकाणी दिसून येते. आप्तस्वकीयांच्या साथीने कलेकलेने वाढत-चढत जाणार्‍या चंद्राच्या विलोभनीय रूपाला डोळ्यात, मनात साठवत नारळपाणी, केशर, बदाम घालून आटवून सुगंधित केलेले दूध, खीर खाण्याची परंपरा अजूनही प्रवाहित झालेली दिसते. कोजागिरीच्या या उत्सवाला वात्सयनात ‘कौमुदी जागर’ असं एक लडिवाळ नाव दिलेलं आहे. ‘दीपदान जागर’ असे वामन पुराणात कोजागिरी पौर्णिमेचे संबोधन केलेले आहे. एवढेच नाही तर बौद्धकाळातही कौमुदी उत्सव साजरा केला जात असे.
उत्सव हा उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. ते आनंद, सुखा-समाधानाचे निधान. बौद्धकाळातही या पौर्णिमेचा उत्सव उत्साह, हर्षाने साजरा व्हायचा. घरेदारे फुलांच्या माळांनी सजवली जायची. घराघरांवरती ध्वज लावले जात असत. रात्रीची वेळ ही दीपाराधनेत घालविली जायची. दिव्यांच्या या स्निग्धतेत नृत्य, नाट्य, गायनाच्या मैफिली संपन्न होत असत. लोकांनी चंद्राकडे तो सखा म्हणून पाहिलेले आहे. हृदयातील भक्ती, आदर, सद्भावना, प्रेम व्यक्त करण्यासाठी कोजागिरीची रात्र त्यांना जवळची आणि प्रसन्न वाटली. आकाशातील चंद्राचे लोकमनाला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. लहान मुलांचा तो चांदोबा, चांदोमामा आहे. स्त्रियांनी त्याला आपल्या उपवासाच्या दिवसांत, व्रतवैकल्यांत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. श्रावणातील ‘आयतार पूजन’ व्रतात सूर्याची जरी पूजा केली जात असली तरी देवघरात पाटावर फुलपत्री वाहून पीठाने काढलेल्या सूर्याच्या चित्राच्या जोडीने चंद्राचे चित्रही काढून त्याची पूजा करण्याची पद्धती रूढ आहे. खरेतर चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह. पृथ्वीभोवती फिरत असताना त्याचा प्रकाश परावर्तित होऊन जेव्हा धरणीवर येतो तेच तर चांदणे असते. हा प्रकाश सूर्याचाच असतो; मात्र चंद्राच्या विलोभनीय रूपाचे आकर्षणच इतके जबरदस्त असते की समुद्राला भरती येते. शरद ऋतूत तर सभोवतालाबरोबरच चंद्र खुलून येतो. चंद्राच्या सोळाही कला विकसित होतात… आणि धरित्री अगदी पिठोरी, दुधाळ, रुपेरी, चंदेरी, नितळ, पारदर्शी होऊन उठते. रात्र जणू सजीवंत होते. शारदीय चांद्रकलेच्या शीतल प्रकाशात समस्त सृष्टी न्हाऊन उठते. कोजागिरीची ही रात्र जे कोणी जागवतात, शरीरमनातून चांदणे झिरपत आत आत पेशींमधून मुरवतात त्याचे सकारात्मक परिणाम पुढील आयुष्यात दिसून येतात. लोकमनाची ही उत्कट, आंतरिक श्रद्धा आहे.

चंद्राचा संबंध समाजमनाने स्त्रीच्या गर्भाशी जोडलेला आहे. चंद्रकिरणांची पृथ्वीवरील पखरण या जणू अमृतधाराच असतात. पुनवेच्या पूर्णचंद्राला साक्षी ठेवून झालेली प्रसूती सुलभ होते. त्यात वेदना कमी करण्याचे सामर्थ्य असते. या चांदण्यात रोगप्रतिकारशक्ती सामावलेली असते. चंद्रदर्शनाने तर नजरसुद्धा तीक्ष्ण बनते असा लोकमानसाचा समज आहे. चांद्रकिरणाच्या सान्निध्यात केशर घालून दूध प्राशन केले तर ते अमृतासमान असते. दूधपेल्यात चंद्राची किरणे पडतात आणि जणू काही चंद्रामृत प्यायल्याचे समाधान मनाला प्राप्त होते.

शारदीय चंद्रकलेच्या लावण्याने भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. शीतल, सौम्य सौंदर्यदर्शनाने चित्तवृत्ती पुलकीत होतात. चांदण्यारात्री निसर्ग, झाडेपेडे खूप वेगळी आणि जिवंत भासतात. चंद्र, पूर्णचंद्र, अर्धचंद्र, चंद्रकोर असा विविध आकार-प्रकारातील चंद्र लोकमनाला भावला. स्त्रियांनी तर त्याला आपल्या भाळावर स्थान दिले. स्त्रियांच्या कपाळावरील चंद्रकोरीने या मालनींच्या सौंदर्यात भर घातली. व्रतवैकल्यात पाटावर, दैनंदिन जीवनात कपाळावर, सांस्कृतिक जीवनात रांगोळीत चंद्राला रेखाटून त्याच्याशी असलेले अनुबंध दृढ केलेले आहेत. चंद्र भगिनींचा भाऊ तर लहानपणापासून तो लहानग्यांचा प्रेमळ मामा बनून आजच्या एकविसाव्या शतकातही सन्मानाने मिरवीत आहे. त्याच्या अंगरख्याची, चतुर्थीत त्याला मिळालेल्या शापाची लोककथा सर्वश्रुत आहे. लोकमनाला चंद्र हे केवळ सौंदर्याचे प्रतीक म्हणून भावले नाही तर ती एक कौटुंबिक जिव्हाळ्याची, भावनिक नात्याची वीण पक्की असलेली अतिजवळची व्यक्ती म्हणून त्यांनी चंद्राकडे पाहिले. त्यांनी त्याला जीवनव्यवहारात महत्त्वपूर्ण स्थान दिले. सर्व अंगांना स्पर्श करून कलेकलेने वाढत जाणार्‍या त्याच्या रूपाचे उत्सव साजरे करण्याच्या परंपरा निर्माण केल्या. चंद्राच्या दर्शनाने कुमुदिनी प्रफुल्लित होते. त्याचे लोभसवाणे रूप भारतीय संस्कृतीत अजरामर आहे. चंद्राला देव संकल्पनेत गुंफून त्याला श्वेताम्बरधारी, दोन्ही हातांत सफेद कुमुदे धारण केलेला दाखविलेला आहे.

विश्वाला ज्ञात असलेला चंद्र हा अवकाशातील पृथ्वीचा तो उपग्रह म्हणून माहीत झालेला असला तरी देशभरात विविध आदिवासी समाजांत चंद्राला आगळेवेगळे स्थान लोकमनाने प्रदान केलेले आहे. त्यांच्यासाठी चंद्र हा देवतासमान आहेच, त्याशिवाय एका लोककथेनुसार आदिवासी मुंडा जमातीतील त्यांचे पूर्वज आणि स्वर्गातील देव यांनी मिळून एकदा समुद्रमंथन केले. या संयोगातून चंद्र आणि त्याची प्रियतमा चंद्रभागा यांची निर्मिती झाली. दोहोंचे अलौकिक लावण्य मन भुलविणारे होते. त्यांना पकडून त्यावर मालकी सांगण्याच्या प्रयत्नात चंद्र कधीचाच निसटून आकाशात विराजमान झाला, तर चंद्रभागेच्या मालकीवरून संघर्षाला सुरुवात झाली तेव्हा मात्र तिने नृत्य-गायनाने सभोवतालाला भुलविले आणि तीही आकाशाच्या विशाल, अमर्याद प्रांगणाच्या दिशेने झेपावली. आदिवासी मुंडाना तिने आकाशातून सांगितले की, जर तुम्ही चांदण्यारात्री जागवीत नृत्य-गायन केले तर तुमच्या जीवनातील सारी दुःखे नाहीशी होतील. हाच संदर्भ कोजागिरीला जोडता येतो. कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवून नृत्य, गायन, संगीताद्वारे तनामनाला समाधानाची प्राप्ती होते. पृथ्वीतलावर कोण कोण जागे आहेत हे पाहण्यासाठी साक्षात लक्ष्मी येते. घराघरांत, माणसांत चांगुलपणाचा शोध घेत फिरते. रात्र जागवून मनाची सुचिता साधणे म्हणजे चांदण्यासारखे शुभ्र पारदर्शक होत जाणे आहे.

गोव्यात तर प्राचीनकाळापासून रानोमाळ भटकणार्‍या आदिम मानवाला अवकाशातील ग्रह-तार्‍यांचे सखोल ज्ञान होते. जीवनव्यवहारात त्यांनी त्याचा उपयोग केला. प्रस्तर-रेखाचित्रातून, ‘कातयो’सारख्या लोकनृत्यातून, भजन-कीर्तनातून, गिती-गायन
दीपोत्सवातून, मंदिर संस्कृतीतून, नदी-पर्वत यांमधून त्यांनी तारामंडलाला अजरामर केलेले आहे. सासष्टी, केपे, सांगे आणि धारबंदोडा या चारही तालुक्यांना जोडणारा, त्यांच्यासाठी वंदनीय असलेला चंद्रनाथपर्वत हा तर चंद्रेश्वर-भूतनाथाच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या सोमकांत शिळेचा संबंध हा चंद्राशी जोडला गेलेला असून पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणे गर्भागृहातील शिवलिंग आणि सोमकांत शिळेवर परावर्तित होतात, आणि त्यातून ती शिळा पाझरताना अनुभवण्याचे भाग्य भाविकांना लाभायचे असे सांगितले जाते. वर्षोनुवर्षे असा अभूतपूर्व सोहळा घडून यायचा. त्याच्याच प्रभावाने पर्वतावरील कुंडे शिळेवरील पाझराने भरून गेली अशी भाविकांची श्रद्धा आहे. गोव्यात अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. त्यांची चंद्रेश्वरावर मनस्वी श्रद्धा होती. त्याच्याच आशीर्वादाने आपल्याला राजयोग लाभला ही कृतज्ञता त्यांच्या मनात त्यांनी कायम बाळगली होती. आजचे ‘चांदोर’ हे पूर्वाश्रमीचे ‘चंद्रपूर’ होते याची साक्ष पटविते. डिचोली तालुक्यातील कोठंबी गावात चंद्रेश्वर-भूतनाथाचे मंदिर आहे.

चंद्राचे, चांदण्याचे हे असे अनोखे नाते देशभरातील संस्कृतीबरोबरीने गोव्यानेही तेवढ्याच आत्मीयतेने जतन केलेले आहे. कोजागिरीला त्याचा अभूतपूर्व आविष्कार त्यातील धार्मिक, सांस्कृतिक संचितांसह गोव्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील मंदिरांतून विविध सांस्कृतिक, सामाजिक संस्थांमधूनही पाहायला मिळतो. वेर्ण्याची म्हाळसा अंत्रुज महालातील कुळागारात स्थिरावली. कोजागिरीच्या रात्री ही म्हाळसा मल्हाराच्या भेटीस जाते. प्रकृती-पुरुषाच्या मीलनाचा हा सोहळा शारदीय चांद्रकलेला साक्षी ठेवून जेव्हा घडवून आणला जातो तेव्हा आकाशातील चांदण्यांनी अन् मंदिराच्या प्रांगणातील शब्दसुरांच्या बरसातीत भाविक रसिक चिंबचिंब होतात. पार्से-पेडण्याचा तरंगोत्सव, भजन, कीर्तन, नाट्य, गायनाने कोजागिरी
सजविली जाते. ‘एका रात्रीत, एका वातीत’ मंदिर बांधण्याची संकल्पना कोजागिरीशी जोडलेली दिसते. पेडण्याचा दसरोत्सव ही तर कोजागिरीची अलौकिक पर्वणी असते. आकाश जसे चांदण्यांनी भरून निघते, तसेच खाली मंदिरपरिसर खेड्यापाड्यांतून आलेल्या भक्तगणांच्या उत्साहाने भरून आणि भारून गेलेला असतो. मनोविकार, मनोव्यथा समूळ नष्ट करण्याचे सामर्थ्य कोजागिरीच्या या चांदण्यात आहे. म्हणूनच असे असंख्य भाविकांचे पाय कोजागिरीच्या या तरंगोत्सवात सहभागी होत मनाचे समाधान शोधतात.