Home Featured व्यावसायिक गॅस सिलिंडर 993 रुपयांनी महागला

व्यावसायिक गॅस सिलिंडर 993 रुपयांनी महागला

0

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर महागाईचा भडका

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या मतदान संपले असून, निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे व्यावसायिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या कधी नव्हे एवढी मोठी वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत तब्बल 993 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, दिल्लीमध्ये एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 3071.50 वर पोहोचली आहे. आता या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांच्या दैनंदिन संचालन खर्चावर होणार आहे. अंतिमत: या सर्वांची झळ ग्राहक म्हणून सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. या प्रचंड दरवाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील खाद्यपदार्थ महागणार आहेत.

इराणमधील तणाव आणि होर्मुझ जलमार्गाच्या संभाव्य नाकेबंदीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात इंधनाच्या किमतींमध्ये कधी आणि किती चढ-उतार होतील, याबद्दल लोकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. आता, 1 मेपासून नवीन महिन्याची सुरुवात होत असताना, एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. 1 मे रोजीच्या स्थितीनुसार, भारतातील प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलोच्या प्रमाणित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कालपासून लागू झालेल्या या बदलामुळे व्यावसायिक सिलिंडर 993 रुपयांनी महागला. या दरवाढीनंतर, दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 3071.50 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत 3024 रुपये, तर कोलकातामध्ये 3201.50 रुपये एका सिलिंडरसाठी मोजावे लागतील.

राहुल गांधींचे भाकीत ठरले खरे
पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर महागाईचा भडका उडणार असल्याचे भाकीत काही दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वर्तवले होते, ते अखेर खरे ठरले. या दरवाढीनंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर खोचक टीका केली. 993 रुपये ही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. हेच आहे निवडणुकीचे खरे बिल, अशी टीका राहुल गांधींनी केली.

खाद्यपदार्थांच्या
किमती वाढणार

तज्ञांच्या मते, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमधील वाढीचा परिणाम बाजारातील अन्नपदार्थांच्या किमतींवर होणे निश्चित आहे. आगामी काळात, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स त्यांच्या मेनूवरील पदार्थांच्या किमती वाढवू शकतात, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांत 1518 रुपयांनी
महागला व्यावसायिक सिलिंडर

1 जानेवारी : 111 रुपये
1 फेब्रुवारी : 50 रुपये
1 मार्च : 31 रुपये
7 मार्च : 115 रुपये
1 एप्रिल : 218 रुपये
1 मे : 993 रुपये
एकूण : 1518 रुपये