वैशाख मास

0
9
  • मीना समुद्र

वैशाख हा सौंदर्याचा, समृद्धीचा तसाच साठवणीचा महिना. शाळेला सुट्टी त्यामुळे मुक्त स्वातंत्र्य उपभोगण्याचाही. कौटुंबिक काळजी आणि मायेचा. जपण्याचा, जगण्याचा आणि जगविण्याचा मोठा जबाबदार, कर्तबगार, कर्मरत ठेवणारा…

चक्रनेमिक्रमेण चैत्राच्या पाठोपाठ वैशाख येतो आणि चैत्राच्या हातात हात गुंफून चालू लागतो; तेव्हा श्रीमती दुर्गाबाई भागवतांना तो चैत्रसखाच वाटू लागतो. अतिशय हृद्य अशी ही पदवी वैशाखाला प्राप्त झाली आहे. चेतोहर चैत्राचं प्रसन्न हास्य आणि वसंतवैभव वैशाखात शिगेला पोचतं. तरी त्याची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहेतच.

वैशाखाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाचा सोनरुपेरी झळाळ! चैत्रातलं ऊन मधून मधून वाहणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळुकांमुळे शीतल, सुखद वाटतं. झाडाला झुले बांधून त्यांचा आस्वाद घेत झुलावे असे वाटते. पण वैशाख मात्र कडक उन्हाचा, सूर्याच्या प्रखर तेजाचा. आकाशात वरवर चढणारा सूर्य आणखी आणखीच तळपणारा, आग ओकणारा; भर माध्यान्हसमयी तर अक्षरशः वणवा पेटवणारा, समस्त जीवसृष्टीच्या अंगाची लाही लाही करणारा, माणसाच्या देहाचा असह्य दाह करणारा, भाजणारा-पोळणारा-जाळणारा. एरव्ही आपण म्हणतो की रागानं अंगाचा तिळपापड होतो. पण वैशाखी उन्हात काही तास उभे राहिले तर अंगाचा खरोखर पापड होईल; नाहीतर जनावरांना घालतात तशी कडब्याची वाळली धाटं होतील- असलं हे ऊन!

पण वैशाखी उन्हाच्या तीव्र झळा सोसत झाडे-वेली मात्र खूप आनंदी दिसतात. पंचाग्निसाधन करणाऱ्या उमेची आणि धगधगत्या अग्निकुंडातून चालणाऱ्या धोंडांची श्रद्धा, निष्ठा आणि साधना यांची आठवण व्हावी अशी ती आहे. वसंतागमनानंतर फुटणारी लालसर पालवी आता हिरवा तजेलदार रंग लेवू लागते आणि बाहवा, बाभळीसारखी झाडं वनाची, जनस्थानांची शोभा लाखपटीने वाढवतात. उन्हातून फुलांना तजेलदारपणा मिळेल पण जीवनरस? पण तशाही या उन्हाने पान्हावल्यासारख्या झाडे-वेली-फुलांनी, गुच्छांनी, तुऱ्यांनी लहडून गेलेल्या दिसतात. मोगरा, जुई, निशिगंधा, रातराणी, सायली, सुरंगी, बकुळी सुगंधाच्या पिचकाऱ्या मारत असतात. त्यामुळे दिवसरात्रीला वातावरण गंधित होते. अवतीभवतीच्या परिमळामुळे वैशाखी उन्हाने क्लांत झालेली मने शांत, तृप्त होतात. गुलमोहर, शिरीष, वड-पिंपळासारखे वृक्ष हिरव्या साजांनी आणि फुलबहारांनी झगमगत असतात. वैशाखी उन्हातून जणू त्यांना तलम रेशमी तकाकी आणि तेजस्वी झळाळी मिळते. अगदी दिखाऊ अशी काटेरी बोगनवेल आणि निवडुंगालाही वैशाख उन्हाच्या स्पर्शाने रंगीत तलम अशी फुले येतात.

काजू, आंबा, फणस, जांभळे, करवंदे, जांब, कोकम… सारी झाडे ऋतुराज वसंतासाठी भरभरून नजराणा घेऊन येतात तो फळांचा! फळांचा राजा असलेले अमृतफळ हे सर्वांचेच आवडते, तुष्टीपुष्टी देणारे. इतक्या विपुल प्रमाणात ही फळे लागतात की वृक्षलतांचे वैभवशाली जीवन आपल्याला थक्क करून सोडते आणि हे सर्व फक्त देण्यासाठी. ‘स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः।’ सृष्टीत स्वार्थासाठी जागा नसते तर फक्त देण्यासाठी आणि माणसाचे आणि पशुपक्ष्यांचे जीवनधारण, पोषण करण्यासाठी हे सारे असते. झाडे सतत सूर्यप्रकाशाची, उन्हाची भुकेली आणि पाण्याची तहानलेली असतात. ऋतुचक्राप्रमाणे पुढे पावसाळा असतो, त्यामुळे घरांची शाकारणी होते, डागडुजी होते, तर कधी नवीन बांधकामे होतात.

उन्हामुळे जलाशय, विहिरी आटतात; पण पाणी आणि पेये ही वैशाखवणवा शांत करण्यासाठी अतिआवश्यक असतात. भर उन्हात छत्री, डोक्यावर टोपी हे आवश्यक ठरते. एरव्ही सनस्ट्रोक, घेरी, चक्कर असे प्रकार घडत असतात. शरीरातील पाण्याची मात्रा कायम ठेवण्यासाठी माठातले वाळा किंवा मोगरीच्या वासाचे थंड सुगंधी पाणी; कोकम, लिंबू, वाळा यांची सरबते, फळांचे रस, कैरीचे पन्हे, ताजे ताक अशी नाना प्रकारची पेये आलटून-पालटून सेवन केली जातात. हलका आहार आवश्यक असतो. त्यामुळे पोटात थंडावा आणि जिवाला चैन पडते. अंगाचा दाह आणि उन्हामुळे होणारी तलखी कमी करण्यासाठी नद्या, समुद्र, तळी, विहिरी अशा ठिकाणी स्नान, जलविहार, पोहणे, डुंबणे अशा नाना तऱ्हांनी लोक प्रयत्न करतात. पाण्यातून बाहेर येऊच नये असे वाटते. जलक्रीडेची मौज अशा तापत्या उन्हातच. हा ऋतू तसा स्वच्छ आणि कोरडा. पावसाळ्यात ओलसरपणामुळे येणारी दुर्गंधी, बुरशी, त्रासदायक किडेमकोडे, नाना प्रकारच्या व्याधी या ऋतूत बऱ्याच कमी प्रमाणात असतात. घाम, घामोळे, चिकचिक, तलखी टाळण्यासाठी उन्हात कळशीचे तोंड बांधून तापवलेले पाणी म्हणजे झळोणी किंवा झळवणीचे पाणी आणि उकडलेल्या कैरीचा गर अतिशय उपयोगी.

चैत्राचं ऊन वैशाखाच्या मानाने मवाळ. तेव्हा रेशमी साड्यांना ते ऊन मानवते. वैशाखापर्यंत एकदा ऊन दिले की त्या करकरीत, चांगल्या राहतात. वैशाखात गाद्यागिरद्या, पांघरुणे धुवून-वाळवून-कापूस फुलवून ठेवली की पावसाळ्याचे तीनचार महिने स्वच्छ आणि छान राहतात. वास, दुर्गंधी, ढेकणांसारखे प्राणी निघून जातात. काठीने बडवून धूळही उडवली जाते. उन्हाचा जास्तीत जास्त उपयोग गृहिणी करतात. पावसाळ्याची बेगमी (बेजमी?) म्हणून पापड, पापड्या, कुरड्या, मिरच्या ऊन्हात सुकवल्या जातात. फळांचे जाम, मुरांबा, सरबते ही उन्हामुळे टिकवता येतात. गहू-ज्वारीसारखी धान्ये कडुनिंबाचा पाला मिसळून सुकवून टिकवता येतात. त्यामुळे पोरकिडे, अळीजाळी होण्याची भीती नसते. आंबा, फणस, काजूचे महामूर पीक या दिवसांत येते ते खाण्यासाठी वापरून जास्तीचे सुकवले जाते. आंबा-फणसाच्या गराची साटे घातली जातात. आठळ्या सुकवून ठेवल्या जातात. डाळी, कडधान्येही चांगली वाळवून ठेवली की पावसाळ्यात भाज्या कमी असतात तेव्हा वापरता येतात. मासे, मासळी सुकविली जाते. कोकम, कैरीची आंबोशी, सुपाऱ्या, खोबरे सारे काही वाळवून, सुकवून साठवता येते.

वैशाख हा सौंदर्याचा, समृद्धीचा तसाच साठवणीचा महिना. शाळेला सुट्टी त्यामुळे मुक्त स्वातंत्र्य उपभोगण्याचाही. कौटुंबिक काळजी आणि मायेचा. जपण्याचा, जगण्याचा आणि जगविण्याचा मोठा जबाबदार, कर्तबगार, कर्मरत ठेवणारा. वैशाख लखलखीत तेजाचा, स्वच्छ उजेडाचा, मोठ्या प्रकाशित दिवसांचा, लख्ख पांढऱ्या आभाळाचा, शुष्क बीजांकित धरणीचा, घर-घरट्यातील चिवचिवाटाचा, चैत्रातील वसंताची पालवी खांद्यावर मिरवणारा आणि ती कधी उतरवावी याची जाण असणारा. अक्षयतृतीयेसारखा अक्षय टिकाऊ वृत्तीचा. झळाळत्या उन्हाचा, तसाच बुद्धपौर्णिमेच्या अक्षय चांदण्याने सृष्टीला आणि मानवाला सौंदर्य, शीतलता आणि मनःशांतीचा बोध करणारा. म्हणूनच संस्कृत श्लोकात म्हटले असावे-
न माधव समो मासो न कृतेन युगं समम्‌‍।
न च वेद समं शास्त्रं न तीर्थं गंगया समम्‌‍॥

  • अर्थात, वैशाखासारखा महिना नाही, कृतयुगासारखे युग नाही, वेदासारखे शास्त्र नाही, गंगेसारखे तीर्थ नाही.