जीवन संस्कार- 10
- प्रा. रमेश सप्रे
जीवनाचा जरा गंभीरपणे विचार करण्याची, उर्वरित आयुष्य खऱ्या आनंदात, समाधानात घालवण्यासाठी साधना करण्याचीही गरज आहे. ही साधना बाहेरच्या विश्वात जाण्यापेक्षा अंतर्विश्वात उतरण्यासाठी, संपूर्ण स्वास्थ्यासाठी, समृद्ध-संपन्न जीवनासाठी आवश्यक आहे.
महाभारतात ज्यावेळी द्रौपदी-वस्त्रहरणाचा प्रसंग येतो त्यावेळी ती तेजस्वी याज्ञसेनी द्रौपदी आकाशातल्या विजेसारखी कडाडते, ‘मला वाटलं ही वृद्धांची सभा आहे. पण ही तर म्हाताऱ्यांची सभा आहे.’ कारण भीष्म-द्रोण-कृप हे सारे आचार्य काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी पराभूतासारखे खाली मान घालून बसले होते. मुख्य म्हणजे हे सारे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध होते. वृद्धात असलेली निर्भय परिपक्वता व्यक्त करण्याऐवजी ते सारे अगतिक, असहाय मनोवृत्तीचा परिचय करून देत होते.
असाच हा दुसरा प्रसंग. राजा जनकानं आपल्या ज्ञानवृद्ध विद्वानांच्या (विद्वत्)सभेत शास्त्रार्थ करण्यासाठी बालक अष्टावक्राला आमंत्रित केले होते. त्यानुसार सभेत पोचल्यावर आठ ठिकाणी वाकडं असलेलं त्याचं शरीर पाहून सारे विद्वान ऋषी-मुनी जोरात हसू लागले. यावर वज्राचा आसूड पाठीवर ओढावा अशा आवाजात अष्टावक्र गरजला, ‘राजन, मला वाटलं तू मला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध व्यक्तींच्या सभेत आमंत्रित केलं आहेस! पण हे तर सारे चर्मकार (चांभार) आहेत. कारण केवळ माझ्या वाकड्या शरीराच्या कातड्याची (चामडीची) परीक्षा करून हे हसू लागले. हे कसले वृद्ध? यांना माझ्या मनाची, बुद्धीची ओळख करून घ्यायची आवश्यकता वाटली नाही.’ अष्टावक्राच्या या तेजस्वी उद्गारांनी साऱ्या सभेत गंभीर शांतता पसरली… कारण अष्टावक्र म्हणत होता ते चिरंतन सत्य होतं…
खरंच, वृद्ध कोणाला म्हणायचं? ज्ञान-तप यांच्याबरोबरच जीवनातील विविध अनुभवांनी संपन्न बनलेली व्यक्तीच खरी वृद्ध. असं म्हणतात- तुम्ही स्वतःला समजता तेवढेच वृद्ध असता. केवळ पंचांग (कॅलेंडर) किंवा जीवनाची लांबी कुणालाही वृद्ध बनवत नाही. त्यासाठी इतर तीन मिती (डायमेन्शन्स) आवश्यक असतात- कर्तृत्वाची जाडी, विचारांची उंची नि भावनांची खोली!
म्हणून विशिष्ट वयोगटातील व्यक्तींना वृद्ध म्हणायचं असं ठरवता येत नाही. उदा. काही वर्षांपूर्वी निवृत्त (ज्येष्ठ) नागरिकांची बस-ट्रेन-विमान प्रवासातील सवलतीसाठी लागणारी वयोमर्यादा वेगवेगळी होती. असो.
संस्कृत भाषेत दोन शब्द आहेत- वृद्ध आणि ऋद्ध. गणेशदेवाच्या दोन शक्तींची (पत्नींची) नावं आहेत ऋद्धी नि सिद्धी. नुसता ‘ऋद्ध’ शब्द क्वचित वापरला जातो, पण समृद्ध-समृद्धी अनेकदा वापरले जातात. ‘वृद्ध’ हा जीवनातला शब्द आहे. प्रपंचासाठी जो पैसा आवश्यक असतो त्याची वृद्धी करणाऱ्या बँकांसारख्या संस्था अनेक असतात. त्यात एका ‘व्यक्तीचा’ लाभ असतो. पण समृद्धीत मात्र अनेकांचं, समाजाचं कल्याण असतं. इथं एक लक्षात ठेवायचं की, वृद्धावस्थेत फक्त वयोवृद्ध व्हायचं नसतं तर ज्ञान, अनुभव यांनी खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायचं असतं.
वृद्धावस्थेचा आरंभ वयाच्या साठ वर्षांबरोबर सुरू करायचं म्हटलं तरी शेवट काय मृत्यू समजायचा? पूर्वी आयुष्याची (वयो)मर्यादा कमी होती. सर्वसाधारणपणे साठ वर्षांनंतर मनाबुद्धीची कार्यक्षमता कमी होऊ लागे. म्हणून म्हणायचे ‘साठी बुद्धी नाठी!’ आता साठीपूर्वीच बुद्धी ‘नाठी’ म्हणजे विस्मृती, विचारपद्धती, दृष्टी, श्रुती (श्रवण क्षमता) अशा गोष्टी अनुभवाला येऊ लागल्यात. याचबरोबर आयुमर्यादा वाढू लागलीय. ऐंशी वर्षांवरच्या वृद्धांना ‘अतिज्येष्ठ नागरिक’ (सुपर सिनियर सिटिझन्स) म्हणतात. अशा ‘वृद्धांची’ संख्याही वेगाने वाढतेय. पण वाढत्या वयाबरोबर अनेकांना अनुभव येतोय की ‘जगण्याची वर्षं वाढलीयत, पण या वाढलेल्या वर्षांत जगणं मात्र कठीण होऊन बसलंय!’
याचसंदर्भात वृद्धावस्थेचा महत्त्वाचा संस्कार मनावर करून घ्यायचा. ‘केवळ जगणं (लिव्हिंग) नव्हे तर जीवन (लाइफ) अधिक महत्त्वाचं आहे. जगण्यासाठी धडपड (स्ट्रगल फॉर सरव्हायव्हल म्हणजे लिव्हिंग) सारे सजीव करतात. अगदी लाजाळू (टच् मी नॉट) किंवा गांडुळापासून ते महाकाय हत्ती किंवा देवमाशा (व्हेल)पर्यंत!
सध्या वृद्धावस्थेतील व्यक्तींमध्ये धम्माल करण्याची, आतापर्यंत न घेतलेले अनुभव घेण्याची, सर्वेंद्रियांच्या उपभोगांची, जगाच्या सफरीवर नि साहसी सफरीवर जाण्याची जबरदस्त ओढ (किंवा स्पर्धा) निर्माण झालीय. यात वाईट काही नाही. पण याबरोबरच जीवनाचा जरा गंभीरपणे विचार करण्याची, उर्वरित आयुष्य खऱ्या आनंदात, समाधानात घालवण्यासाठी साधना करण्याचीही गरज आहे. ही साधना बाहेरच्या विश्वात जाण्यापेक्षा अंतर्विश्वात उतरण्यासाठी, संपूर्ण स्वास्थ्यासाठी, समृद्ध-संपन्न जीवनासाठी आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन – ऑफलाइन उदंड मार्गदर्शन मिळू शकतं, कारण ती काळाची गरज आहे.
‘रूपांतरित वृद्धालयं’ (मॉडिफाइड होम्स फॉर द एजेड), ‘ज्येष्ठग्राम’ (जेरियाट्कि व्हिलेज), ‘जीवनाची अथश्री’ (केवळ जगण्याची इतिश्री म्हणजे शेवट) अशा आशयाच्या योजना नि प्रकल्प जगभर राबवले जात आहेत. यावर विचार मात्र करायला हवा नि त्यानुसार आचार!
वृद्धावस्थेतील महत्त्वाचा संस्कार जीवन-चिंतन, जीवन-तत्त्वज्ञान. सफलसार्थसंपूर्ण जीवन जगणं हा आपला जन्मसिद्ध अधिकारच नव्हे तर कर्तव्यही आहे. असो.
यासंदर्भात समर्थ रामदासांचा एक नित्यपठणातील श्लोक सुचवावासा वाटतो. आपण तो अगदी निराळ्या प्रसंगी म्हणतो. पण त्याचा भावार्थ जीवनस्पर्शी आहे. त्यात एक समर्थ संस्कार दडलेला आहे. श्लोक असा-
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥
यातील सर्वात महत्त्वाचा संस्कार (संदेश)- ‘जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म’- जीवित्व म्हणजे फक्त जगणं, तगणं, जिवंत राहणं (जस्ट लिव्हिंग). थोडक्यात किडामुंगीसाखं जगणं. हे काही मानवाचं ध्येय नव्हे. ‘जीवन’ म्हणजे ज्याला काही मूल्यं, तत्त्वं, ध्येयं, स्वप्नं आहेत. असं मानवी जीवन विकसित करण्यासाठी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ अन् आहार (जेवण) म्हणजे ‘यज्ञकर्म’- निदान वृद्धांनी तरी यावर सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे. वृद्धावस्था म्हणजे व्याधी-विकार-आजार यांनी शरीरात मांडलेलं ठाण. यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार आहेत. पण इथून पुढच्या काळात खरे विकार असणार आहेत मानस म्हणजे मनाचे. थोड्याफार फरकानं बहुसंख्य लोक मानसरुग्ण असणार आहेत. ज्या मनाचा काम-क्रोध-लोभ-मत्सर-स्पर्धा इ. गोष्टींमुळे तोल (बॅलन्स) जातो ते मन रुग्ण म्हणजे आजारी असतं. वृद्धावस्थेत भीती-चिंता-नकारात्मक कल्पना- मनावरचा प्रचंड ताण यांचं प्रमाण वाढतच जाणार आहे. मानसविकार तज्ज्ञांचे उपचार पुरेसे प्रभावी पडणार नाहीत. कारण उन्मादी, प्रमाथी म्हणजे उफाळून येणाऱ्या मनस्थितीसाठी केवळ विज्ञान-तंत्रज्ञान पुरेसं पडणार नाहीये. औषधांची मर्यादा नि विषारी परिणाम सर्वपरिचित आहेत.
यावर रामबाण उपाय म्हणजे रामनाम म्हणजे कोणत्याही देवदेवतेचं, संत-महात्म्याचं नाम. हा फार व्यापक उपाय आहे. या नामस्मरणात योगाचे सारे प्रभावी अनुभव व परिणाम येतात. वाचन-श्रवण-मनन-चिंतन-ध्यान-अनुसंधान (म्हणजे मनात सतत ईश्वरी शक्तीचं स्मरण भरून ठेवायचं नाहीतर रिकामं मन हे सैतानाचा कारखाना (डेव्हिल्स वर्कशॉप) आहेच!). एका अर्थी या साऱ्या अभ्यासाचा (साधनेचा) पाया आहे ‘मौन’ आणि कळस आहे ‘नाम.’ म्हणून भोजनप्रसंगी म्हणावयाच्या (खरं तर म्हटल्या जाणाऱ्या) समर्थ रामदासांच्या श्लोकात ‘नाम’ हा शब्द दोनदा आलाय. एकदा ‘नाम घ्या श्रीहरीचे’ अशी आदेशात्मक विनंती (सूचना?) आहे. तर नंतर जनमानसाचं मर्म जाणणाऱ्या समर्थांनी ‘नाम घेता फुकाचे’ म्हणजे फुकट असलेलं नाम घ्या असं सांगितलंय. तसाच ‘हवन’ आणि ‘यज्ञकर्म’ हा शब्दप्रयोगही दोनदा करायला समर्थ विसरले नाहीत.
सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे तो म्हणजे अन्न किंवा आहार काय फक्त पोटाचा असतो? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांचा नि हात, पाय, वाणी, उत्सर्जन (मलमूत्र विसर्जन), पुनरुत्पादन या पाच कर्मेंद्रियांचा- या दहा इंद्रियांच्या जोडीला अकरावं इंद्रिय ‘मन’, या एकादश इंद्रियांचा आहार हे यज्ञकर्म, हा केवढा मोठा संस्कार आहे. वृद्धावस्थेत अशी आध्यात्मिक एकादशी करायला काय हरकत आहे? यातूनच ‘ज्येष्ठांना’ ‘श्रेष्ठ’ बनण्याची सुवर्ण नव्हे, अमृतसंधी लाभणार आहे.