वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

0
11527
  • माधुरी रं. शे. उसगावकर

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं… आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे.

मनमोही पावसाने निसर्गासारखेच माझ्या अंतर्मनाला मोहविले आहे. झिमझिमणार्‍या पावसात सृष्टीचे सुजलाम् सुफलाम् रूप न्याहाळताना नकळत तुकाराम महाराजांचे भावमधुर काव्य आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरांचा साज लाभलेले कर्णमधुर गीताने कान टवकारले –
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ॥
वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान. संथपणे एका लयीत बरसणार्‍या पावसाच्या सरींनी बहरलेल्या सृजनशील निसर्गाच्या सान्निध्यात सृष्टीचा दृक्‌श्राव्य अनुभव घेता यावा, यासारखे भाग्य ते कोणते? मनातील आठवणींची पिसे भिरभिरू लागली.
धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली. ‘परोपकाराय फलन्ति वृक्षाः’ या शब्दात वृक्षांचा गौरव केलेला आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.
अलीकडे पर्यावरण प्रदूषणाविषयी बरेच काही वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. प्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीचा, मानवाने सुरू केलेल्या जंगलतोडीमुळे पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे.

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं… आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे. माणसाने निसर्गाला विद्रूप करायचा जणू चंगच बांधला आहे. एकेकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला अवकळा येत चालली आहे.
मानवी मन हे निसर्गदत्त आहे. आजच्या या यंत्रयुगीन युगात तो यंत्रांच्या जंजाळात जेवढा अधिक अडकतो तेवढेच त्याचे मन निसर्गाकडे खेचले जाते. म्हणून तर डेरेदार वृक्षाच्या सान्निध्यात त्याचे मन सुखावते. निसर्गाच्या ओढीने मन त्याचे आसुसते.
आज प्रमाणाबाहेर जंगलतोड होत आहे. प्रदूषण, अवर्षण, जमीनीची धूप या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत. निसर्गाचे संतुलन बिघडण्यास कोण जबाबदार… याचा सखोल विचार होत आहे का? दिसेल त्या झाडावर घाव घालायचे आणि मिळणार्‍या जागेत घरे, कारखाने उभारायचे हे काम माणसांनीच सुरू केले. पैसा कमावणे हे आजच्या युगाचे एकमात्र ध्येय झाले आहे. पैशाच्या मागे लागत असताना आपण ज्या झाडाच्या आश्रयाला आहोत त्याच झाडावर आघात करून आपला सर्वनाश करून घेत आहोत, हे माणसाच्या लक्षात येत असेल पण मनातला लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाही. सुंदर निसर्गाला आता विनाशाची घरघर तर लागणार नाही ना? मनात शंकेचे काहूर निर्माण होते. असे असेल तर लोभी माणूसच निसर्गाच्या घरघरीला कारणीभूत आहे.

यंदा उन्हाळ्यात तापमान पंचेचाळीशी ओलांडण्याच्या मार्गावर झुकू लागले. पाऊस वेळेवर पडत नाही. वैश्‍विक तापमानाची समस्या भेडसावत आहे. हिमशिखरे वितळत आहेत. समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे.
वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. नाहीतर एकेकाळच्या जंगलांच्या ठिकाणी आगामी काही वर्षांनी वाळवंटे बनतील. जमिनीसाठी, सत्तेसाठी नव्हे तर पाण्यासाठी माणसा-माणसांत युद्धे होतील. आज जिथे तिथे इमारतींची जंगले दिसत आहेत. सिमेंटच्या जंगलात मुक्त निसर्गसौंदर्याचा शोध घेणे म्हणजे जणू वाळवंटात हिरवळ शोधणे!
आजचा माणूस खूप कर्तृत्वशाली पराक्रमी आहे. निसर्गाला लागणारी घरघर फक्त मानवच थांबवू शकतो. हे अशक्य नाही. माणसाने या बाबतीत आता अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे वाचवा’चे नारे पिटतात आणि दुसरीकडे माणसंच झाडांवर आघात करतात. झाडांना आपण ‘सोयरे, वनचरे …’ मानतो ना? मग त्याची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. झाडे स्वतःसाठी नव्हे तर भावी पिढ्यांच्या सुखासाठी, समृद्धीचे जीवन देण्यासाठी झाडांना संरक्षणाचे दान तरी द्यावे. पशूपक्षी, प्राणी, वन यांचं संरक्षण, संवर्धन करून आपल्याच बांधवांना वाचवायचे.

प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे. रोपं लावण्याबरोबर ती कशी जगतील याचीही खबरदारी घेतली पाहिजे. संगोपन केले पाहिजे. नाहीतर वनमहोत्सव साजरे करायचे. मोठमोठ्या मंत्र्यांना, आमदारांना आमंत्रित करायचे. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करायचं. ‘झाडे लावा, झाडे जगवा, भूमी तगवा’, घोषवाक्यांचा पुकारा करायचा. वर्तमानपत्रात ठळक बातम्यांसह छायाचित्रं प्रसिद्ध करायची आणि पुढच्या वर्षी ‘जैसे थे’ स्थिती. याला काय अर्थ आहे?
भविष्यात वृक्ष टिकले नाहीत तर आपणही टिकणार नाही. मुलांप्रमाणे झाडांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाबरोबर राहण्यासाठी वृक्षलागवड ही सुवर्णसंधी आहे. वृक्ष माणसाचे जीवन फुलांनी सुगंधित करून फळांनी रसभरित करतात. पण मानव वृक्षतोड करून आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतो. त्यामुळे वृक्षारोपण ही नितांत गरज ठरली आहे. आपले जीवन आनंदमय, चैतन्यमय होण्यासाठी झाडं वाचवा. असे प्रयत्न केले तर पदराआड दिवा जपल्याप्रमाणे सृष्टी आपल्यावर मायेचे छत्र सदैव ठेवील. आम्हा सर्वांवर तिची असीम कृपादृष्टी राहील.

निसर्ग आपल्याला शिकवतो. पण आपण समजून घेत नाही. निसर्गाशी मैत्री करणेच हितावह आहे. निसर्गाची ताकद अफाट आहे. निसर्गाशी शत्रुत्व केले तर तो त्याची ताकद दाखवतो. कुठंतरी त्सुनामी येते. भुकंप होतात व सर्व उध्वस्त होतं. होत्याचं नव्हतं होतं. ‘निसर्ग कोपला’ असं म्हणण्यापेक्षा याला आपण किती कारणीभूत आहोत याचा प्रामुख्याने अंतर्मुख होऊन विचार करणे शहाणपणाचे ठरेल. खरोखरच आज अशी वेळ आली आहे की माणसाने आत्मपरीक्षण करणे अनिवार्य आहे. आपण सगळे….
झाडे लावू पाणी घालू|
वृक्षसंवर्धन करू॥
निसर्ग रंगात मिसळू|
पर्यावरण समतोल साधू|
वृक्षवल्लींना साथ देऊ|
हरितक्रांतीचे गीत गाऊ॥
निसर्गात नंदनवन फुलवू|
जगण्याचा आनंद मिळवू॥