25 C
Panjim
Monday, January 18, 2021

विशेष संपादकीय- सौदामिनी

भारतीय राजकारणातील एक तळपती सौदामिनी असेच ज्यांचे वर्णन करावे लागेल अशा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे अकाली व आकस्मिक निधन हा देशाला फार मोठा धक्का आहे. वयाच्या अवघ्या ६७ व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेऊन सुषमाजींनी प्रत्येक देशवासीयाला चुटपूट लावली आहे. राजकारणासारख्या आजही पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रामध्ये एक स्त्री असूनही स्वतःच्या कर्तृत्वाची नाममुद्रा त्यांनी उमटवली. राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचे स्थान परिश्रमपूर्वक निर्माण केले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सत्तापदे भूषविली आणि त्यांना न्यायही दिला. महिला असल्या तरी एक लढवय्या नेत्या अशीच त्यांची जनमानसातील प्रतिमा होती. अत्यंत ओजस्वी वाणी आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व या बळावर त्यांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. तीनवेळा आमदार, सातवेळा खासदार अशी त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द राहिली. भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्या वावरल्या. पक्षाने जे काम सोपवले ते पार पाडण्यास त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोपवले तेव्हा ती जबाबदारी कसोशीने पार पाडली. पक्षाने केंद्रीय मंत्री बनण्यास सांगितले तेव्हा त्या पदालाही न्याय दिला. पक्षाचा आदेश त्यांनी सदैव शिरसावंद्य मानला आणि क्षणमात्र विचार न करता आव्हानांना त्या सामोरे गेल्या. म्हणूनच तर जेव्हा सोनिया गांधी कर्नाटकातील बळ्ळारीतून निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हा अत्यंत अल्प वेळ असूनही सुषमा स्वराज यांनी थेट बळ्ळारी गाठून, अल्पावधीत कन्नड भाषा शिकून त्यांचा सामना केला होता. वाजपेयींच्या काळामध्ये सुषमा यांची कारकीर्द खर्‍या अर्थाने बहरली. वाजपेयींच्या सरकारला एक मानवतावादी चेहरा होता, जो घडविण्यात सुषमा स्वराज यांचेही मोठे योगदान राहिले होते. पुढे काळ बदलला, वाजपेयी – अडवाणींच्या जागी नरेंद्र मोदी नावाचा एक झंझावात भारतीय राजकारणात अवतरला. पक्षातील जे मोजके नेते ह्या स्थित्यंतरात टिकून राहिले आणि आपली चमक दाखवू शकले, त्यामध्ये सुषमा स्वराज ह्याही एक होत्या. मोदी यांना प्रतिस्पर्धी म्हणूनही स्वराज यांच्याकडे पाहिले जात होते, एवढी उंची त्यांनी गाठली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर आत्यंतिक प्रेमाने पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांच्या नावाची शिफारस केलेली होती. पुढे मोदी सरकारमध्ये स्वराज यांना जे परराष्ट्र व्यवहार मंत्रिपद मिळाले, त्यालाही त्यांनी एक मानवी चेहरा मिळवून दिला. ट्वीटरसारख्या आधुनिक संपर्क साधनाचा अत्यंत प्रभावी वापर करीत त्यांनी देशविदेशातील गरजू व्यक्तींना सदैव मदतीचा हात दिला. कोठे कोण अडचणीत आहे असे दिसले की जातीने त्या आपल्या यंत्रणेला कामाला लावून मदतीला धावून जायच्या. एखादा उच्चपदस्थ केंद्रीय मंत्री सर्वसामान्य नागरिकांशी कसा जोडला जाऊ शकतो त्याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले. त्यातून जनतेचे उदंड प्रेम आणि जिव्हाळा जोडला. म्हणूनच तर जेव्हा त्यांना मूत्रपिंड विकाराच्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले व मूत्रपिंडे निकामी झाल्याचे वैद्यकीय निदान झाले, तेव्हा त्यांच्यासाठी आपले मूत्रपिंड देण्यास ना ओळख ना पाळख असे आम नागरिक पुढे झाले. त्यांनी जनतेवर आणि जनतेने त्यांच्यावर असे अलोट निर्व्याज प्रेम केले. आपल्या प्रकृति अस्वास्थ्यामुळे स्वराज यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतःहून स्वतःला दूर ठेवले आणि आपली शान कायम राखली. एखादी वीज तळपून जावी तशा आपल्या अल्प आयुष्यामध्ये सुषमा स्वराज या देशामध्ये तळपल्या. एक लखलखीत कारकीर्द मागे ठेवून त्या आता निजधामाला गेल्या आहेत. या देशाचे प्रत्येक घर आणि त्यातील बायाबापड्या त्यांच्यासाठी हळहळतील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. राजकारणासारख्या क्षेत्रात जनतेचे प्रेम असे सहजासहजी मिळत नसते. ते पारदर्शीपणे वागून कमवावे लागते. सुषमा स्वराज यांनी आपल्या स्वच्छ, पारदर्शी राजकीय कारकिर्दीने ते कमावले आणि टिकवले. एक शानदार राजकीय कारकीर्द मागे ठेवून गेलेल्या या तळपत्या सौदामिनीला भावपूर्ण श्रद्धांजली.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

विशेष संपादकीय – स्वागत

जवळजवळ चार महिन्यांनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची अमेरिकेतील वैद्यकीय उपचारांनंतर गोव्यात परतण्याची घटिका जवळ आली आहे. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत ते गोव्यात पोहोचणार...

मंगलाताई वागळे ः एक दीपस्तंभ

अनुराधा गानू गोव्यातील ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती मंगला वागळे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. अ. भा. महिला परिषद, कस्तुरबा ट्रस्ट आणि ‘हमारा स्कूल’च्या माध्यमातून त्यांनी...

विशेष संपादकीय

  सम्राज्ञी तामीळनाडूच्या लाडक्या‘पुरात्ची थलैवी’ म्हणजे क्रांतिकारी नेत्या जयललिता जयरामन यांचे निधन ही दक्षिणेतील एका झुंजार स्त्रीच्या प्रदीर्घ संघर्षाची इतिश्री आहे. आधी कलेच्या आणि नंतर राजकीय...

जीवोध्दारक : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

  नवप्रभेच्या २८ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात श्री. शंभू भाऊ बांदेकर यांचा ‘सर्वांगीण मानवी समानतेसाठी झटणारे चक्रधर स्वामी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. सदर लेखामध्ये...