विशाखापट्टणमजवळ रासायनिक वायू गळती

0
178

काल गुरूवारी पहाटे एलजी पॉलिमर या कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्यामुळे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला. या वायू गळतीमुळे हजारो आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून या घटनेबाबत बचावकार्य सुरू आहे. वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशम विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत. या वायू गळतीचा परिणाम आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर जाणवू लागला. मात्र वायू गळतीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

या दुर्घटनेमुळे बेशुद्ध पडलेले तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. इस्पितळात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये लहान मुले व वृद्ध इसमांचा समावेश जास्त संख्येने आहे. दरम्यान, या वायू गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, घटनास्थळावरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात असून गृहमंत्रालय व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत चर्चा केल्याचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याशीदेखील पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेबाबत चर्चा केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील विशाखापट्टणम येथील परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले आह.