विविध प्रकारच्या विमा योजना

0
15
  • शशांक मो. गुळगुळे

नेमका कोणता विमा घ्यावा याबाबत आपण संभ्रमात पडतो. आयुर्विमा किंवा मुदत विमा यापैकी कोणता उपयुक्त आहे, हे प्रत्येकाची परिस्थिती, त्याची आर्थिक उद्दिष्टे, जबाबदारी, तसेच जोखीम घेण्याची क्षमता यावर अवलंबून असते.

कोणीही माणूस त्याच्या मागे त्याच्या प्रियजनांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू नये, त्यांच्या आर्थिक भविष्याचे अनिश्चिततेपासून संरक्षण व्हावे यासाठी उपयुक्त अशा विम्याची तरतूद करणे ही काळाची गरज बनली आहे. सर्वांनाच विम्याच्या नियोजनाची नितांत गरज आहे. मात्र त्याबद्दल पुरेशा माहितीचा अभावही आहे. त्यामुळे कोणता विमा घेतला पाहिजे याबाबत संभ्रम असतो. आयुर्विमा किंवा मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) यापैकी कोणता उपयुक्त आहे, हे प्रत्येकाची परिस्थिती, त्याची आर्थिक उद्दिष्टे, जबाबदारी, तसेच जोखीम घेण्याची क्षमता यावर अवलंबून असते.

आयुर्विम्याचे फायदे
संभाव्य धोक्यापासून संरक्षण ः नियमित प्रीमियम चालू असताना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबाला जोखमीपासून संरक्षण म्हणून पॉलिसीअंतर्गत आश्वासित रकमेची आर्थिक भरपाई दिली जाते.
विविध योजना ः व्यक्तींच्या विम्याच्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारच्या विमा योजना कंपनीद्वारे प्रस्तावित केल्या जातात. जितका प्रीमियम तितके जास्त फायदेही दिले जातात.

आरोग्यासाठीचे ‘कव्हर’ म्हणजेच कवच ः काही विमा पॉलिसींमध्ये हॉस्पिटल खर्च, गंभीर आजाराचे कव्हर अतिरिक्त प्रीमियम घेऊन दिले जाते.
बचत/गुंतवणुकीला प्रोत्साहन ः काही विमा पॉलिसींमध्ये प्रीमियमचा काही भाग हा बचत/गुंतवणुकीसाठी वापरून त्याद्वारे संपत्तीनिर्मितीचा प्रयत्न केला जातो. अशा पॉलिसीच्या तारणावर विमाधारकाला अडीअडचणीच्या वेळी त्याच्या गुंतवणुकीपैकी काही रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.
कर-सवलत ः विमाधारकाने दिलेला प्रीमियम हा प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80-सी अंतर्गत वजावटीसाठी पात्र असतो. ही वजावट जुन्या कर-प्रणालीत मिळते. तसेच विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला मिळणारी रक्कम ही कलम (10 डी) अंतर्गत करमुक्त असते.
आयुर्विम्यामध्ये सर्वप्रकारच्या पॉलिसींचा समावेश होतो. अशा पॉलिसीमध्ये विमा संरक्षणाबरोबरच गुंतवणुकीच्या घटकांचा समावेश असल्यामुळे पॉलिसीधारकासाठी कालांतराने संपत्तीही निर्माण होते. आयुर्विमा पॉलिसींमध्ये संपूर्ण जीवन योजना, मनी-बॅक पॉलिसी, युनिट लिंक्ड विमा योजना (युलिप) व एण्डॉवमेंट पॉलिसी अशा योजनांचा समावेश असतो. यात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पॉलिसीनुसार आश्वासित रक्कम तर मिळतेच, पण योजनेनुसार इतरही लाभ दिले जातात आणि विमाधारक हयात असेल तर त्याला मुदतपूर्तीचा लाभही मिळतो. ही पॉलिसी प्रदीर्घ कालावधीसाठी असते.

आयुर्विम्याचे काही प्रकार
एण्डॉवमेंट पॉलिसी ः ही पॉलिसी काहीशी मुदत विम्यासारखी असली तरी या पॉलिसीचा एक फायदा म्हणजे जर विमाधारक पॉलिसीच्या मुदतपूर्तीपर्यंत जिवंत असेल तर त्याला काही रक्कम बोनससह एकरकमी दिली जाते.
युलिप ः ही पॉलिसी विमाधारकाला विमा संरक्षणाबरोबरच संपत्तीनिर्मितीसाठीही मदत करते. या पॉलिसीसाठी घेतल्या गेलेल्या प्रीमियमचा काही भाग विम्यासाठी, तर काही भाग गुंतवणुकीसाठी वापरला जातो. तसेच या प्लानमध्ये विमाधारकाला त्याच्या गुंतवणुकीपैकी काही रक्कम अंशतः काढण्याची किंवा त्यावर कर्ज घेण्याची सुविधाही असते.

मनी बॅक पॉलिसी ः ही पॉलिसी एण्डॉवमेन्ट पॉलिसीसारखीच असली तरी विमा पॉलिसीच्या कालावधीमध्ये ठरावीक वर्षांनंतर काही रक्कम परत केली जाते.
संपूर्ण जीवन पॉलिसी ः काही प्रकारच्या पॉलिसी एका विशिष्ट कालावधीसाठी असतात. पण ही पॉलिसी विमाधारकाला संपूर्ण आयुष्यभर विमा संरक्षण तसेच ‘सर्व्हायव्हल बेनिफिट’ देते. विमाधारकाला अंशतः रक्कम काढण्याचा तसेच ही पॉलिसी तारण ठेवून कर्ज काढण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.
ॲन्युइटी/पेन्शन प्लान ः या पॉलिसीमध्ये प्रीमियमची एकत्रित रक्कम ही विमाधारकाला त्याच्या पसंतीनुसार नियमित किंवा एकरकमी दिली जाते.

टर्म इन्शुरन्स ः ही सोपी विमा पॉलिसी आहे. ही पॉलिसी विशिष्ट कालावधीसाठी किंवा ठरावीक मुदतीसाठी संरक्षण प्रदान करते. हा कालावधी सामान्यतः 5 ते 30 वर्षांपर्यंत असतो. ही मुदत विमाधारकाने ठरवायची असते. अशी मुदत ठरविताना विमाधारकाने स्वतःच्या आर्थिक जबाबदाऱ्या केव्हापर्यंत असणार आहेत याचा विचार करून पॉलिसीचा कालावधी निश्चित केला पाहिजे. यात पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना पूर्वनिर्धारित विम्याच्या रकमेचा लाभ दिला जातो. मुदत विम्यात उपलब्ध असलेली विमा संरक्षणाची रक्कम, तसेच त्यासाठी दरवर्षी द्यावा लागणारा प्रीमियम पॉलिसी खरेदी केली जाते त्यावेळीच निश्चित केला जातो आणि तो संपूर्ण कालावधीसाठी कायम असतो. त्यामुळे टर्म इन्शुरन्स जितक्या लवकर खरेदी केला जाईल, त्यानुुसार व्यक्तीला कमीत कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त कव्हर मिळू शकते. टर्म इशुरन्स पॉलिसींमध्ये बचत किंवा गुंतवणुकीचा कोणताही अंश नसतो. त्यामुळे त्याचा प्रीमियम इतर प्रकारच्या विमा योजनांपेक्षा खूपच कमी असतो. या वैशिष्ट्यामुळे मुदत विम्याला फक्त विमा संरक्षण देणारा विमा असे म्हटले जाते.
आयुर्विमा की मुदत विमा?
यापैकी कोणता विमा घ्यावा, हे ठरविताना आपल्या गरजा आणि जोखीम क्षमतांचा विचार महत्त्वाचा असतो. टर्म इन्शुरन्समध्ये मिळणारे विमाकवच हे अधिकतर असतेच, पण त्याचा प्रीमियमही तुलनेने खूपच कमी असतो. त्यामुळे कमीत कमी प्रीमियममध्ये टर्म इन्शुरन्स घेऊन उर्वरित रक्कम एसआयपीने म्युच्युअल फंडात गुंतविल्यास जमा होणारी रक्कम आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करते. त्यामुळे अधिक कव्हर आणि अधिक वाढ अशा दोन्हींचा फायदा घेता येऊ शकतो. याउलट आयुर्विम्यात प्रीमियमचा वापर विमा संरक्षण, तसेच गुंतवणूक यासाठी होत असल्याने विमा कव्हरही कमी मिळते. अशा पॉलिसींत मिळणाऱ्या परताव्याचे प्रमाण 5.50 ते 6 टक्के असते. हा परतावा चलनवाढीच्या दरावर मात करू शकत नाही.

टर्म इन्शुरन्स घेताना कोणी घ्यावा याचा विचार व्हायला हवा. किती घ्यावा यासही महत्त्व आहे. पॉलिसीचा कालावधीही योग्य ठरावयास हवा. अशा विम्याच्या प्रीमियम पेमेंटसाठी मासिक, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक असे पर्याय असतात. पॉलिसीधारक त्याच्या सोयीचा पर्याय ठरवू शकतो. मुदत विमा घेताना गंभीर आजार, अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व असे विविध रायडर किंवा अतिरिक्त प्रीमियम दिल्यास उपलब्ध असतात. विमा कंपनी निवडताना त्या कंपनीचे दावा निकालात काढण्याचे प्रमाण व सॉल्व्हन्सी रेशो पाहावा. सॉल्व्हन्सी रेशो कंपनीची दावे सेटल करण्याची क्षमता दर्शविते. दावा सेटलमेंट कंपनीने किती दावे सेटल केले आहे हे दर्शविते, तर रक्कम सेटलमेन्ट पाहताना एकूण दावा रकमेपैकी किती रकमेचे दावे संमत झाले हे समजते. ज्या कंपनीचे हे तिन्ही ‘रेशो’ जास्त असतील ती चांगली वित्त कंपनी!
वरील सर्व विम्याचे प्रकार हे जीवन विम्याचे आहेत. विम्याचे दोन प्रकार आहेत. एक- जीवन विमा व दुसरा- सर्वसाधारण विमा. यात आगीचा विमा, घराचा विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा इत्यादी प्रकार येतात. सर्वसाधारण विमा हे ‘नॉन-लाइफ’ असतात, तर जीवन विमा हे लाइफ विमा असतात.

‘स्टार हेल्थ’तर्फे ब्रेल लिपीत विमा योजना
‘स्टार हेल्थ’ने- भारतातील सर्वात मोठ्या रिटेल कंपनीने- नुकतीच ब्रेल लिपीतील विमा योजना लाँच केली. यामुळे नेत्रहीन समाजाला योग्य माहिती मिळवून देत, आरोग्य व विम्याशी संबंधित स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्टार हेल्थने वैविध्यपूर्ण आणि आर्थिक सर्वसमावेशकता मोहीम आखत भारतातील 34 दशलक्ष अंध व्यक्तींना उत्पन्नाच्या संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात 34 दशलक्ष व्यक्ती नेत्रहीन आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत 2.5 टक्के जनता नेत्रहीन आहे. दृष्टिदोषामुळे भारतातील आर्थिक उत्पादनक्षमतेचे 646 अब्ज रुपयांचे नुकसान होते. कंपनी समाजातील वंचित, दुर्लक्षित वर्गाला प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण देऊन त्यांना आरोग्य विमा प्रतिनिधी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या कंपनीने ब्रेलमध्ये ही ‘स्पेशल केअर गोल्ड’ योजना लाँच केली आहे. ही योजना पारंपरिक योजनांहून वेगळी आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेप्रमाणे विमाकवच मिळावे यासाठी आहे.
स्पेशल केअर गोल्ड योजना दिव्यांग व्यक्तींच्या गरजा पूर्ण करणारी आहे. अंध व्यक्तींमुळे देशाचे दरडोई 9192 रुपये इतके नुकसान होते. ही ब्रेल आवृत्ती नॅशनल असोसिएशन ऑर द ब्लाईंड यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. ही विमा योजना 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात दिव्यांग असणाऱ्यांना खास विमाकवच पुरविते. यात वैद्यकीय सुविधा व पूरक सेवांचा समावेश आहे.
या कंपनीने नव्याने भरती केलेल्या दिव्यांगांच्या परीक्षेच्या संपूर्ण तयारीचा खर्च, तसेच त्यांना ऑडिओ प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा एजंटस्‌‍साठी खास हॉटलाइन क्रमांक तयार करण्यात आला असून, त्याद्वारे आवश्यक ती मदत आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. हा विमा उद्योगातील क्रांतिकारी उपक्रम मानावा लागेल.