विद्यार्थ्यांसाठी योगाचरण

0
23
 • डॉ. मनाली महेश पवार

21 जून हा संपूर्ण जगभर ‘योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या योगसाधनेमध्ये कोणतीही धार्मिकता नाही. योगाची प्राचीन प्रथा ही भारतीय संस्कृतीतून उद्भवली आहे. या दिवशी भारताबरोबर जगातल्या विविध ठिकाणी योगासनांचा सराव केला जातो. ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा’निमित्त विशेष लेख-

आजची पिढी हुशार (अतिप्रतिभावान) आहे. कमी वयात वेगवेगळ्या स्पर्धांना ती सामोरी जातेय. धाडसी निर्णय स्वतः घेतेय. धाडसी वृत्तीची आहे व ‘अतिजलद’देखील आहे. पण मनावर, हृदयावर, बुद्धीवर ताण देऊन तणावाखाली जगते आहे. सतत कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली वावरते आहे. त्यात भर म्हणजे ‘विभक्त कुटुंबपद्धती’ व ‘एकच मूल.’ त्यांना समजावयाचे नाही, मारायचे नाही; त्यांना फक्त हवे ते द्यायचे व तेही ‘मागणीपूर्वी पुरवठा!’ त्यात परत आई-वडील सुशिक्षित, त्यामुळे कामाला जाणारे. मुलाची जबाबदारी आयावर (मुलाला सांभाळणारी बाई), जिचं संस्कारांशी काहीच देणं-घेणं नसतं. फक्त ‘पगारापुरतं’ तिचं काम अवलंबून. त्यामुळे मुलांमध्ये सामाजिकता भिनत नाही. नकार पटत नाही, हरणे पचत नाही. त्यांना दुसऱ्यांशी जमवून घेणे जमत नाही. त्यामुळे साहजिकच मुलांच्या व्यक्तिमत्त्व घडण्यावर दुष्परिणाम होतात. मुलांचा शारीरिक व मानसिक विकास योग्य प्रकारे होत नाही. बऱ्याच वेळा मुलं कुपोषित म्हणजे एकतर लठ्ठ किंवा हाडकुळी बनतात. मनाचं विकसनही आरोग्यपूर्ण होत नाही.

अनेक मुलांच्या भावनांत, विचारांत, कृतींत नकारात्मकतेचा भाव निर्माण होतो. भीती, चिंता, राग, द्वेष, खोटेपणा, वासना यांसारखे षड्रिपू मुलांमध्ये मूळ धरायला लागतात. थोडक्यात, अपयशाने मुले खचून जातात, आत्महत्येसारखे विचार त्यांच्यामध्ये रुजू लागतात. संयुक्त कुटुंबपद्धती नसल्याने मुलांना चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणारी वडीलधारी मंडळीही नसते, म्हणूनच मुलांमध्ये ‘योगसाधने’ची आवड निर्माण करणे, मुलांना योगी बनवणे ही आजच्या काळाची गरज आहे. कारण निरोगी शरीरामध्येच तल्लख बुद्धी वास करते. म्हणून सकस आहाराबरोबर उत्तम योगाभ्यास गरजेचा आहे.

आजकाल शारीरिक व मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर या व्याधींचे प्रमाण भारतामध्ये दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि त्याला वयाचे काहीही बंधन राहिलेले नाही. तसेच मानसशास्त्रीय विकारांचे प्रमाणही बरेच वाढले आहे. दुर्बल किंवा वजनदार शरीराचा आपल्या कार्यक्षमतेवर आणि परिणामी यशावर विपरीत परिणाम होत आहे. जर शरीर जर्जर, रोगट असेल तर आपली मन-बुद्धीदेखील तशीच होते. रोगट मन-बुद्धी दुर्गुणांना आमंत्रण देते आणि एकदा हे दुर्गुण चिकटले की आपण एकाही पुरुषार्थामध्ये (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये योगसाधनेची आवड निर्माण करावी. कारण आजची पिढी उद्याचे भविष्य आहे. म्हणून ‘योगदिवस’ हा फक्त एक दिवस साजरा करण्यासाठी नसावा; योगाचरण हे नित्य नियमित असावे.

संपूर्ण जगाने योगसाधनेचे महत्त्व जाणल्याने 21 जून हा संपूर्ण जगभर ‘जागतिक योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसापासून पुढे दिवस लहान व रात्र मोठी होत जाते. या योगसाधनेमध्ये कोणतीही धार्मिकता नाही. प्रत्येकाला आपले आरोग्य सांभाळता यावे यासाठी योगसाधनेला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हेच या दिवशी योगशिक्षक समजावत असतात. या योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. योगाची प्राचीन प्रथा ही भारतीय संस्कृतीतून उद्भवली आहे. आरोग्यदायी जीवनाचे सार म्हणजे ‘योगसाधना.’ योग शरीर व मन संतुलित ठेवते, शरीरामध्ये लवचिकता निर्माण करते, तणावाचे व्यवस्थापन उत्तम होते. या दिवशी भारतात विविध ठिकाणी योगासनांचा सराव केला जातो व योग दिवस साजरा केला जातो. ‘मानवता’ ही यावर्षीची ‘थीम’ आहे.

केवळ योगासने म्हणजे योग नव्हे. योगासने ही व्यायामपद्धती आहे, ज्याने फक्त मांस-सांधे-स्नायू यांची क्षमता सुधारली जाते. पण मग माणसाच्या मज्जासंस्थेचे, चेतासंस्थेचे काय? या संस्थांनाही व्यायाम मिळाला पाहिजे. त्यासाठीच योग अष्टांगांशिवाय पर्याय नाही. मानसिक पातळीवर इंद्रियांचे प्रसन्नत्व, सत्यनिष्ठा, सत्त्वगुणप्रधान अशी (सर्वभूतमात्रांविषयी) कल्याणेच्छा कायम असावी. रजोगुणप्रधान कामक्रोधेच्छा व तमप्रधान मोहेच्छा नाहीशी व्हावी, आणि हे सर्व साधल्यामुळे शरीराला थंडी, ऊन, पाऊस, वारा, भूक, तहान, कष्ट सहन करण्याची उत्तम क्षमता लाभावी यासाठी अष्टांगयोगाशिवाय पर्याय नाही.

आठ योगांगांचे आचरण क्रमाने वाढवीत व आत्मसात करीत गेल्यास मुलं आरोग्यसंपन्न होतील. म्हणून मुलांनी केवळ योगासनांचा सराव न करता, योगसाधना- यम, नियम, आसन आदी अष्टांगयोगांपासूनच करावी.
मुलांकरिता अष्टांगयोग
प्रत्येक शाळेमध्ये तसेच घरीही मुलांना फक्त वेगवेगळी अवघड-अवघड अशी योगासनेच शिकवू नका. प्रत्येकाची यम-नियमांपासून योगसाधनेची सुरुवात व्हावी. यम-नियमांचे आचरण केल्यास योगसाधनेचा पाया घट्ट रोवला जाईल. मग कोणतेच मूल तणावाखाली येणार नाही व आत्महत्येलाही प्रेरित होणार नाही.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही अष्टांगयोगाची अंगे आहेत. योगसाधनेला यम-नियम आदी अंगांचे आचरण करूनच सुरुवात करावी. आठ योगांगाचे आचरण क्रमाने वाढवीत व आत्मसात करीत गेल्यास अपेक्षित स्वास्थ्यकर घटकांचे पालन चांगल्याप्रकारे होऊ शकते.
यम-नियम
व्यक्तींची इतरांशी वागणूक कशी असावी हे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांद्वारे सुचविले आहे. यालाच ‘यम’ असे म्हणतात.

 • अहिंसा ः हिंसा न करता वागणे-बोलणे म्हणजे अहिंसा. मुलांनी शिव्या देऊ नयेत. मारामारी करू नये. विनम्र वागावे व बोलावे.
 • सत्य ः नेहमी सत्य बोलावे व वागावे.
 • अस्तेय ः चोरी करू नये. कोणतीही वस्तू, साधी पेन्सिल-खोडरबरही घेताना विचारून घ्यावे म्हणजे मुलांना चांगली सवय लागते.
 • ब्रह्मचर्य ः सकाळी लवकर उठावे, देवाची प्रार्थना करावी, व्यायाम करावा व अभ्यास करावा म्हणजेच ‘ब्रह्मा’सारखे किंवा ब्रह्मदेवाला आवडते तसे आचरण मुलांनी करावे.
 • अपरिग्रह ः उगाच नको त्या गोष्टींचा संग्रह करू नये. त्याचप्रमाणे अभ्यासही असा करावा की तो आपल्या मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये लोड करून ठेवला जाईल. कोणत्याही क्षणी आपल्याला तो आठवला पाहिजे. म्हणजे पुस्तकांचासुद्धा संग्रह नको. जास्तीचे कपडे, जास्तीची खेळणी यांचाही संग्रह करू नये.
 • शीत ः उष्णावर, आहार-झोपेवर काबू मिळवून शांत राहाणे. विषयसंपर्कासाठी इंद्रियांचे नियंत्रण करणे म्हणजे ‘यम’. शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान म्हणजे ‘नियम’.
 • वागण्यात स्वच्छता (शरीर, मन, वाणी) म्हणजे शौच.
 • मिळालेल्यात समाधान भावना म्हणजे संतोष.
 • थंडी, उष्णता, उपवास, अन्न मिळणे, तहान-पाणी मिळणे, बसायला मिळणे- न मिळणे या परस्परविरुद्ध घटकांना सहन करण्याची तयारी म्हणजे तप.
 • ईश्वरप्राप्तीसाठी अभ्यास करत राहताना थंड-उष्ण सोसणे, त्यासाठी ईश्वरार्पण भावनेने सर्व स्वीकारणे म्हणजे स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान.

गुरुभक्ती, सत्यमार्गाची स्वतःहून आवड, सुखर वस्तूच्या अनुभवाने समाधान, निःसंगता, एकांत ठिकाणी राहाणे, फळाची आशा न ठेवता मनाचे नियंत्रण करून काम करणे, वैराग्यभाव यांना ‘नियम’ म्हटले आहे.
या भावना टिकल्या तर मग अस्वास्थ्य येऊ शकणार नाही. मुलांचे वागणे जर या तऱ्हेने झाले तर मग कसला संघर्षच होऊ शकणार नाही. योगसाधनेचा ‘यम-नियम’ हा घट्ट पाया आहे.
आसन ः ध्यान-धारणादी पुढील योगाचरणाकरिता तसेच अभ्यासाकरिता दीर्घकाळ क्लेश न होता सुखाने बसता यावे यासाठी एखाद्याच आसनाची निवड करणे पुरेसे आहे. विविध आसने ही स्वास्थ्यरक्षणासाठी किंवा व्याधिनाशासाठी सांगितलेली आहे. आजकाल मुलं फार वेळ एका जागेवर बसून अभ्यास करू शकत नाहीत म्हणून योग्य योगासने शिकणे व अभ्यास करणे आवश्यक आहे. मुलंही हल्ली दुर्बल किंवा लठ्ठ असतात. मग त्यानुसार योगशिक्षकांकडून प्रत्येकाने स्वतःला योग्य अशी आसने निवडावी. योगासनांच्या नियमित सरावाने शरीराला लवचिकता येते, लघुता येते, पचनशक्ती सुधारते, मल-मूत्रादी वेगांचे निःसरण योग्य प्रकारे होते. वर्ण, आवाज सुधारतो, एकाग्रता वाढते म्हणजे एकूणच आरोग्यास लाभ होतो.

प्राणायाम ः एक श्वास आत घेण्याच्या क्रियेपासून (प्राण) पुढील श्वास घेण्याच्या कालामधील अंतर शक्य तितके वाढवीत जाणे (आयाम) यालाच ‘प्राणायाम’ म्हणतात. हवा, पाणी, अन्न, ज्ञानेंद्रियांचे विषय या बाह्यघटकांचे शरीराकडे ग्रहण करणे हे प्राणाचे कार्य. हे कार्य नियंत्रित केले तर त्यांच्या विनियोगासाठी शक्ती खर्ची पडते, समान-व्यान-उदान आदी सर्वच वायूंची गती वाढते व त्यामुळे होणारा धातुनाश यावर आपोआपच नियंत्रण येते. स्रोतसांची शुद्धी होते. मनाचा व प्राणाचा अन्योन्यसंबंध असल्यामुळे प्राणनियंत्रणाबरोबर आपोआपच मनोनियंत्रण साधते. म्हणून योगासनांइतकेच प्राणायामाला महत्त्व आहे. मुलांना रोज किमान दहा मिनिटे तरी श्वास आत-बाहेर घेताना लक्ष केंद्रित करायला सांगावे किंवा दीर्घ श्वसन करून काही काळ श्वास आत कोंडून परत बाहेर सोडावा. याने मनाची एकाग्रता वाढेल. स्थिरता येईल. अभ्यास कधीच विसरणार नाहीत व मुलांची जीवनशैली सकारात्मक होईल.

आपल्या राष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी आपल्याला या चिमुकल्यांचे भविष्य सावरायला हवे. त्यासाठी ही योगसाधना करावी. यम, नियम, आसन व प्राणायाम ही चार योगांगे जरी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगात भिनवली तरी आपण सुसंस्कृत पिढी निर्माण करू शकतो.