वाढीव भाडेपट्टीमुळे अष्टमी फेरीच्या दुकानदारांत नाराजी

0
10

पणजी महापालिकेने ठरल्यानुसार कालपासून अष्टमीच्या फेरीतील दुकानांसाठीचे अर्ज वितरित केले. ह्या फेरीतील 2 बाय 4 आकाराच्या दुकानासाठी 12 दिवसांचे एकरकमी 26 हजार 400 रुपये भाडे आणि अर्जाचे 500 रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र, रक्कम मोठी असल्याने व ती सगळी रक्कम एकदम भरायची असल्याने अर्ज भरण्यासाठी आलेल्यांपैकी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

सोमवारी व्यावसायिकांनी अष्टमीच्या फेरीतील दुकानांसाठीचे अर्ज महानगरपालिका देणार अशी माहिती मिळाल्याने अर्जांसाठी गर्दी केली होती; मात्र महापौरांनी अर्ज देण्याची व स्वीकारण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार असल्याचे कळवले होते. त्यानुसार महापालिकेने काल सकाळी 10.30 वाजल्यापासून अर्जांचे वितरण सुरू केले. कर अधिकारी सिद्धेश नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली हे काम सुरू झाले. ज्या व्यावसायिकांनी सगळी रक्कम भरण्याची तयारी दाखवली, त्यांना अर्जांसाठीचे कूपन देण्यात आले होते. या कुपनांनुसार काल संध्याकाळपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे काम चालू होते.

यंदा अष्टमीच्या फेरीसाठी 400 दुकानांची सोय करण्यात आली आहे. त्यातील दुकानांचा आकार 2 बाय 4, 4 बाय 4 व फर्निचर विक्रेत्यांसाठी मोठ्या आकाराची शंभर दुकाने असतील.