>> अमित पाटकर यांचा विश्वजीत राणेंना सवाल
सत्तरी तालुक्याची शान असलेला वाघेरी डोंगर परप्रांतीयांना कुणी विकला. ही विक्री झाली तेव्हा विश्वजीत राणे हे कुठे होते व वाघेरी डोंगराच्या विद्ध्वंसाला जबाबदार कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल केली.
आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे विश्वजीत राणे हे घाईगडबडीत बोलून सर्वांनाच संभ्रमात टाकत आहेत. राणे हे स्वत:च गोंधळल्यासारखे वागत असल्याचा टोलाही पाटकर यांनी लगावला.
विश्वजीत राणेंनी कॉंग्रेसची पक्षाची दृष्टी ही गोव्याचा विद्ध्वंस करणारी आहे, अशी जी टीका केली होती, त्यावर बोलताना पाटकर यांनी काही सवाल उपस्थित केले. वाघेरी डोंगराची विक्री कुणी केली व तेव्हा राणे मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल पाटकरांनी विचारला. तसेच वाघेरी डोंगराच्या विद्ध्वंसाला जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तरही राणे यांनी द्यावे, अशी मागणी पाटकर यांनी केली.