वसंतोद्गार

0
93
  • मीना समुद्र

बहावा फुलला की 60 दिवसांनी पाऊस पडतो आणि हा अंदाज म्हणे अचूक असतो. यंदा तो इथे-तिथे फुललेला दिसतो आहे. फिरायला गेलं की नजरच नाही तर मनही खेचून घेतो आहे. आपले पाय तर त्याला पाहून जागीच खिळून राहतात. आणि निसर्गाची ही अद्भुत किमया पाहून मन आनंदित आणि चकितही होते. बहावा फुलायला सुरुवात म्हणजे पाऊस येण्याचा दोन महिने आधी मिळालेला संकेत.

बहावा फुलला की 60 दिवसांनी पाऊस पडतो आणि हा अंदाज म्हणे अचूक असतो. यंदा तो इथे-तिथे फुललेला दिसतो आहे. फिरायला गेलं की नजरच नाही तर मनही खेचून घेतो आहे. आपले पाय तर त्याला पाहून जागीच खिळून राहतात. आणि निसर्गाची ही अद्भुत किमया पाहून मन आनंदित आणि चकितही होते. येणारे ऋतू पुनःप्रत्ययाचा आनंद देतात आणि स्मरणरंजनही करतात. बहावा फुलायला सुरुवात म्हणजे पाऊस येण्याचा दोन महिने आधी मिळालेला संकेत. म्हणून तर याला इंग्रजीत ‘नेचर इंडिकेटर’ म्हणतात. ‘शॉवर ऑफ फॉरेस्ट’ असेही म्हटले जाते. मातीवर हळदी गालिचा अंथरल्यासारखा वाटतो- बहावा फुलांची पखरण करतो तेव्हा.
पावसाचा संकेत म्हणजे आपल्या शेतीप्रधान देशासाठी मोठाच शुभसंकेत. माणसाने आपल्या निसर्गनिरीक्षणाने काही शोध लावले- त्यातलाच हा एक ऋतुसंकेताचा शोध. सौंदर्याचा खजिना उरीपोटी बाळगलेला हा बहावा म्हणजे सृष्टीच्या सृजनसोहळ्याचा अनोखा आविष्कार. हा आविष्कार पाहून दृष्टी खिळून राहते आणि मन आनंदाने उचंबळून येते. चेरीच्या बहराचे अनोखे लावण्य पाहून आचार्य प्र. के. अत्र्यांचे कविहृदय असेच उचंबळून आले आणि त्यांनी त्याचे हृदयंगम वर्णन केले. चेरीचा वृक्ष ‘फुली फुलून येतो’ आणि तो निसर्गोत्सव साजरा करण्यासाठी जपानी लोक त्या वृक्षाखाली नृत्य करतात. आनंदाने बेभान होतात असे त्यांनी लिहिले आहे. बहाव्याकडे पाहताना मला आमच्या शालेय पाठ्यपुस्तकात असलेल्या त्या धड्याची आठवण होते. फरक इतकाच की चेरीची फुले गुलाबी बहराची आणि बहावा असतो पिवळचार फुलांनी नटलेला. दोन्हींचे असीम लावण्य आपापली खासियत असणारे!
सर्वसामान्य माणूसही हे निसर्गवैभव पाहून वेडावतो आणि तिथे क्षणभर थबकल्याशिवाय राहत नाही; तिथे इंदिरा संतांसारख्या कवयित्रीच्या काव्यवृत्तीला बहावा पाहून बहर न येईल तरच नवल! बहाव्याचे दर्शन होताच त्यांच्या चित्तवृत्ती बहरून, उचंबळून येतात आणि त्यांच्या मनातून काव्यपंक्ती झरू लागतात-
नकळत येती ओठांवरती तुला पाहता शब्द ‘वाहवा’!
सोनवर्खिले झुंबर लेउन दिमाखात हा उभा बहावा
या ओळी वाचताना मला आठवलं- माझ्या ‘स्वच्छंद’ या ललितलेखांच्या पुस्तकात बहाव्यावरचा लेख लिहिताना गद्यात मी असं लिहिलं होतं की, आमच्या एम.पी.टी.तल्या घराच्या कोपऱ्यावरून वळलं की आपटा, गुलमोहर, कॅशिया यांच्या हारीतच उभं असलेलं बहाव्याचं झाड जेव्हा या दिवसात फुललेलं पाहिलं तेव्हा पाहणाऱ्याच्या तोंडून ‘वाहवा’च निघावं, किंबहुना सर्वांगी फुललेल्या याला पाहिल्यावर निघालेल्या ‘वाहवा’ या उद्गारावरूनच याचं नाव ‘बहावा’ पडलेलं असावं.
त्यावेळी ही इंदिरा संतांची कविता माहीत नव्हती; कुठे वाचली पण नव्हती. या पिवळ्या रंगाच्या भरगच्च फुलांमुळे मदन तर पीतांबर नेसून आला नाही ना? -असे मला वाटले होते. बहावा हे नाव पुल्लिंगी आणि तो या वसंतागमाच्या वेळी फुलल्याने मदनाच्या पीतांबरासारखे वाटले होते. एरव्ही अष्टपुत्री (ही पिवळ्या रंगाची असते) नेसून, फुलमाळा घेऊन विवाहवेदीजवळ उभ्या राहिलेल्या सलज्ज नववधूसारखे ते झाड वाटते असाही उल्लेख माझ्या लेखात होता. आणि त्यानंतर गेल्या चारपाच वर्षांत या दिवसांत बऱ्याच जणांकडून फॉरवर्ड झालेल्या इंदिरा संतांच्या कवितेत अशाच कल्पना वाचून खूप आश्चर्य वाटले. इंदिराबाई म्हणतात-
कधी दिसे नववधू बावरी हळद माखली तनु सावरते
झुळुकीसंगे दल थरथरता डूल कानीचे जणू हालते
इंदिराबाईंची कल्पना समग्र समर्पक. बहाव्याचे धम्मक पिवळे इवले लोलक दवबिंदूतून लुकलुक करतात आणि मधूनच दिसणारी हिरवी पाने ही जणू पाचूच्या साजाचे कोंदण बनतात. कधी त्यांना हे बहाव्याचे पुष्पांकित झाड म्हणजे युवतीच्या कमरेवरची झुलती रम्य सुवर्णमेखला वाटते, तर कधी धरणीवर गंधर्वांनी बांधलेला नक्षत्रांचा झुला वाटतो.
बहाव्याचा सुंदर सोनवर्खी झळकता रंग पाहून त्यांना पीतांबरधारी युगंधर कृष्णाची आठवण होते आणि तो पार्थासाठी पुन्हा एकदा गीता सांगतो आहे. ग्रीष्माच्या दाहाने तप्त झालेल्या पार्थाच्या मिषाने जणू अखिल मानवजातीला तो संदेश देत आहे-
ज्या ज्या वेळी अवघड होई, ग्रीष्माचा तुज दाह सहाया
त्या त्या वेळी अवतरेन मी ‘बहावा’ रूपे तुज सुखवाया
बहावा त्या युगंधराचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी जणू अवतार घेतो आणि ग्रीष्माच्या दाहात होरपळणाऱ्या मानवाला आश्वस्त करतो. आपल्या शीतल, सोज्वळ सौंदर्याने सुखवतो. निसर्गसौंदर्याने भारावलेल्या कविमनाची केवढी ही उदात्त कल्पना!
सर्वांगसुंदरतेचा त्याला दिमाख नाही, गर्व नाही. अंगभूत अशी उदारता, सौजन्य आणि संवेदनशीलतेची जाण असलेला बहावा विनम्रच दिसतो. स्वागतशील बहावा असंख्य सोनवर्खी झुंबरे अंगावर लेवून स्वानंदात मग्न झाल्यासारखा डुलत असतो. नखशिखांत पुष्पभार ल्यालेला बहावा म्हणजे मूर्तिमंत सृष्टिकाव्यच!
काव्य म्हणजे रसात्मक वाक्य. मानवी भावाचा उत्स्फूर्त आविष्कार. असामान्य कल्पनाशक्तीद्वारा विविध प्रतिमांना वा प्रतीकांना एकत्र गुंफणे. छंदोबद्धता हेही काव्याचे महत्त्वाचे लक्षण. इंदिरा संतांच्या ‘बहावा’ कवितेत हे सारे कसे बहाव्यासारखेच सर्वांगांनी उमलून आले आहे. पावसाच्या निसर्गसंकेताची डूबही त्यांनी केवढ्या कलात्मक रीतीने व्यक्त केली आहे!
‘ग्रीष्माचा दाह सह्य करण्यासाठी आश्वासन देणारा बहावा’ हा त्याच्याशी निगडित असलेल्या निसर्गशास्त्राशी जोडणारा वास्तविक दुवा आहे. पुष्पसंभाराने हलणारा-डुलणारा बहावा हा शिरीष, गुलमोहर, कव्हेर यांच्यात उठून दिसणारा आणि स्पष्ट ऐकू येणारा वसंतोद्गार आहे.