वनवासाला निघताना…

0
10
 • प्रा. रमेश सप्रे

ज्यावेळी श्रीरामाच्या वनवासासंबंधीचा वर कैकेयीने राजा दशरथाकडे मागितला त्यावेळी फक्त दशरथावरच नव्हे तर सर्व संबंधितांवर तो प्रत्यक्ष वज्राघातच होता. याचा प्रभाव मात्र निरनिराळ्या व्यक्तींवर वेगळा होता. काही व्यक्तींची प्रतिक्रिया पाहूया-

अयोध्येच्या श्रीरामाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा मध्यवर्ती कालखंड जर कोणता असेल तर तो वनवासाचा. श्रीरामाचं भगवंताचा अवतार (भगवान विष्णूचा सातवा अवतार) म्हणून खरं अवतारकार्य हे वनवासकालातच सिद्धीस जाणारं होतं. एकूणच रामायणातील अनेकांच्या जीवनाला लक्षणीय कलाटणी देणारा असा हा प्रसंग.

म्हणूनच या वनवासाची पूर्वपीठिका (पार्श्वभूमी), प्रत्यक्ष वनवासाला राजमहालातून निघताना, नंतर अयोध्येची सीमा सोडून वनात प्रवेश करताना, यानंतर वनवासाला (चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडाला) सुरुवात करताना आणि मुख्य म्हणजे संपूर्ण चौदा वर्षांतील अनेकविध बऱ्यावाईट घटनांना सामोरं जाताना असे हे वनवासाचे विविध पैलू आहेत. यांच्यावर चिंतन करून स्वतःसाठी जीवनशिदोरी तयार करण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. असो.

ज्यावेळी श्रीरामाच्या वनवासासंबंधीचा वर कैकेयीने राजा दशरथाकडे मागितला त्यावेळी फक्त दशरथावरच नव्हे तर सर्व संबंधितांवर तो प्रत्यक्ष वज्राघातच होता. याचा प्रभाव मात्र निरनिराळ्या व्यक्तींवर वेगळा होता. काही व्यक्तींची प्रतिक्रिया पाहूया-
रामाच्या वनवासाच्या वादळाचा केंद्रबिंदू अर्थातच दशरथ होता. कैकेयीचे मागणे हे चक्रीवादळ होते. रामाशिवाय इतर अनेकजण या वादळात धूळ, पानं, वृक्ष यांच्यासारखे भिरभिरत राहणार होते.

 • दशरथ ः याची अवस्था अतिशय केविलवाणी नि चिंताजनक झाली होती. कैकेयीला शरण जाऊन तसा (वनवासाचा) वर न मागण्याबद्दल वरचेवर विनवणी करत होता. पुनः पुन्हा बेशुद्ध पडत होता, शुद्धीवर येत होता. कैकेयीवर काहीही परिणाम होत नाही आणि त्याचा लाडका राम वनवासात जाण्यासाठी कटिबद्ध (सिद्ध) होत आहे हे पाहून दशरथाने रामाला राजाच्या नात्याने आज्ञा केली की रामाने त्याला बंदी बनवून कारागृहात टाकावे. पण हे अशक्य आहे हेही त्याला कळत होते, कारण त्याचवेळी श्रावणकुमाराची ‘पुत्राचा वियोग नि स्वतःचा (दशरथाचा) मृत्यू’ याविषयीची शापवाणी त्याच्या कानात घुमत होती. परिस्थितीपुढे, नियतीसमोर एरव्हीचा पराक्रमी दशरथ अगदी हतबल, लाचार झाला होता.
 • कैकेयी ः श्रीरामाच्या वनवासाची खरी नायिका (खलनायिका?) कैकेयीच होती. शूर, क्षत्राणी (क्षत्रीय वीरांगना) कैकेयीने दशरथाबरोबर देवांच्या बाजूने शंबरासुराविरुद्ध लढताना ऐन मोक्याच्या क्षणी दशरथाचे प्राण तर वाचवले होतेच, पण त्याला युद्ध जिंकण्यात मोलाचे साह्यही केले होते. याचाच परिणाम म्हणून दशरथाने तिला दोन वर देऊ केले होते, जे तिने नंतर मागण्याचे ठरवून रामाच्या यौवराज्याभिषेकाप्रसंगी मागितले. दशरथाचा नकार ऐकल्यावर साहजिकच ती क्रोधाविष्ट झाली. वाटेल ते आरोप त्याच्यावर करत राहिली. शेवटी सुमंत्रामार्फत रामाला बोलावल्यावर श्रीरामाच्या निश्चयी, धीरगंभीर वाणीतील वचनबद्धतेने ती शांत झाली. रामाचा निर्धार पाहून कैकेयीने त्याला तिथेच वल्कले आणून दिली. ती नेसून तिथूनच वनवासाचा आरंभ करावा असे सुचवले. इतकेच काय, रामाबरोबर आवश्यक नसतानाही वनवासात जाणाऱ्या लक्ष्मणासाठी आणि सीतेसाठीही वल्कले आणवून त्यांना नेसायला सांगितली.
 • कौसल्या ः सुरुवातीला कौसलेला या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. रामाच्या चौदा वर्षं वनवासाची वार्ता हा तिच्यावर वज्राघातच होता. लवकरच स्वतःला सावरून रामाला वनवास यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला. सीता, लक्ष्मण यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. रामाच्या दंडावर विशल्यकरणी (म्हणजे शरीरावरील कोणतीही जखम बरी करणारी औषधी वनस्पती) बांधली. आनंदानं सर्वांना निरोप दिला.
 • सुमित्रा ः अनपेक्षित दुःखाच्या आघातातून सावरत तिने आपला पुत्र लक्ष्मण याला काही आज्ञा केल्या. अरण्य हीच अयोध्या मान. श्रीरामाला पिता नि सीतेला माता मानून त्यांची सेवा आणि रक्षण कर. सुमित्रेने त्यामानाने स्वतःला चांगले सावरले.
 • सीता ः सर्वांचा, विशेषतः रामाचा सीतेने वनवासात जायला विरोध होता. तेव्हा ती आत्मनिग्रहाने म्हणाली, ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता!’ आनंदाने आपल्या राजवस्त्रांचा, अलंकारांचा त्याग करून वल्कले नेसून ती वनवासात गेली.
 • लक्ष्मण ः शेषाचा अवतार असलेल्या लक्ष्मणाला आपला स्वामी विष्णूचा अवतार राम याच्यावर होणारा अन्याय सहन होणारा नव्हताच. त्याने दशरथ, कैकेयी यांना दोष देत युद्ध करून रामाला राज्याभिषेक करण्याचा संकल्प व्यक्त केला. याला श्रीरामाची अर्थातच मान्यता नव्हती. पण दोघातील अप्रतिम बंधुप्रेमाचे दर्शन मात्र घडले.
 • वसिष्ठ ः या साऱ्या प्रकाराने त्रिकालदर्शी वसिष्ठमुनीही वरवर अस्वस्थ झाले. आपल्या अधिकारात त्यांनी कैकेयीला रामाला अडवण्याचा सल्ला दिला. फक्त कैकेयीच रामाचा वनवास रद्द करू शकत होती. पण तसे घडले नाही, कारण नियतीची अटळ गती!
 • श्रीराम ः या साऱ्या आकस्मिकपणे घडलेल्या प्रसंगात एखाद्या निर्वात (वारा नसलेल्या) परिस्थितीतील राम निश्चल ज्योतीसारखा स्थिर, स्तब्ध, शांत होता. कैकेयीने त्याच्या उद्दिष्टाबद्दल संशय घेताच राम कठोर निर्धाराच्या स्वरात तिला म्हणाला,
  माते, रामो द्विर्नाभिभाषते। रामो द्विर्नाभिसंधते।
  म्हणजे- ‘राम आता एक, नंतर एक असे बोलत नाही आणि एकाच लक्ष्यावर (टार्गेट) दोनदा बाण मारत नाही.’ या प्रतिज्ञेसारख्या उद्गारात श्रीरामाचे चरित्र नि चारित्र्य (सद्गुण) या दोहोंचे दर्शन होते.
  अशा प्रकारे वनवासाशी संबंधित व्यक्तींच्या कृतीतून नि उद्गारातून विविध संस्कारांचे सिंचन आपल्यावर घडते. व्यक्ती तितक्या प्रकृती हेच अखेर खरे!