लोगो – जीवन संस्कार अरे, संस्कार संस्कार!

0
8
  • प्रा. रमेश सप्रे

जीवनसंस्कारांचे जे अनेकानेक पैलू आहेत. ते अक्षरशः आपल्या जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतरही जीवनाला ‘स्पर्श’ करणारे आहेत. धर्मशास्त्रानुसार आजन्म मरण व्यापणारे हे संस्कार. त्यांतील कर्मकांड, विधिविधानाइतकेच व्यक्तीच्या तना-मना-जीवनावर प्रभाव पाडणारे असतात.

प्रतिभावंत कवी गुलजार यांचं एक गीत आठवतं? ‘जीवन से लंबे हैं बंधू ये जीवन के रस्ते…’ अगदी तसंच संस्कारांबद्दलही म्हणता येईल- ‘जीवनापेक्षा गहन, लांब-रुंद-खोल-उंच असतात जीवनसंस्कार!’
ज्या बहिणाईंच्या (चौधरी) चालीवर आपण लेखाचं शीर्षक दिलंय- ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर। आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर॥’- जीवनाचा हा सत्य अनुभव आहे.
तसेच ‘अरे, संस्कार संस्कार’ म्हणताना संस्कारांची जीवनाच्या दृष्टीने अत्यावश्यकता व्यक्त होतेच, पण त्यात संस्कारांचा उदय होण्याऐवजी अस्त होतोय याबद्दल एक उसासा, एक खंतही आहे.
याचसंदर्भात सुविचार वाटावं असं एक महत्त्वाचं विधान आहे- ‘संस्कारांचा लोप होतोय ना? त्यावर रामबाण उपाय म्हणजे संस्कारांचा लेप देणं!’ हे नुसतं विधान नाही तर जीवनाचं संविधान (आचारसंहिता) आहे.

जीवनसंस्कारांचे जे अनेकानेक पैलू आहेत ते अक्षरशः आपल्या जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतरही जीवनाला ‘स्पर्श’ करणारे आहेत. हे वाचून तुमच्या मनात ‘सोळा संस्कार’ उभे राहिले असतील. धर्मशास्त्रानुसार आजन्म मरण व्यापणारे हे संस्कार. त्यांतील कर्मकांड, विधिविधानाइतकेच व्यक्तीच्या तना-मना-जीवनावर प्रभाव पाडणारे असतात. आज यांना कालानुरूप काहीसं उत्सवी, उथळ ‘इव्हेंट’चं रूप आलंय. याचं कारण, त्यातील यंत्रतंत्राला अधिक महत्त्व आलंय. मंत्रांचं अस्तित्व केवळ ‘शब्दरूप (वायुरूप)’ उरलंय. त्यामुळे अर्थातच अर्थावरचं मनन-चिंतन झाकोळलंय.
या सोळा संस्कारांशिवाय इतर अनेक विविधांगी जीवनसंस्कार आहेत, ज्यांच्यावर सांस्कृतिक-आध्यात्मिक-शैक्षणिक-वैद्यकीय अंगाने सहचिंतन करण्याचा मानस आहे.

‘गर्भसंस्कार’ हा विषय काही विचारवंत शास्त्रीय मानतात, तर काही वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी ‘गर्भसंस्कार’ हा अवैज्ञानिक विषय समजतात. यासंदर्भात एका वेगळ्या दिशेने चिंतन करता येईल. ‘पुराणातली वांगी पुराणात’ अशी एक प्रचलित म्हण आहे. काहीजण विनोदाने असेही म्हणतात- ‘ही पुराणातली वांगी खरी असती तर निदान त्यांचं भरीत करून तरी खाल्लं असतं.’ – मुळात ‘वांगी’ हा शब्दच चुकीचा आहे. खरा शब्द आहे ‘वानगी’ म्हणजे उदाहरण. दुसऱ्या शब्दात पुराणातली उदाहरणं पुराणातच शोभणारी असतात; प्रत्यक्ष जीवनात त्यांचा काही संबंध किंवा उपयोग नसतो. पण ती विचारसरणीही चुकीची आहे.
आपण तीन पौराणिक व्यक्तींवर झालेल्या जन्मपूर्व संस्कारांवर म्हणजेच ‘गर्भसंस्कारां’वर व्यावहारिक दृष्टीने सहचिंतन करूया. ‘प्रल्हाद- अष्टावक्र- अभिमन्यू’ या तीन व्यक्तींवर ते जन्मापूर्वी मातेच्या गर्भाशयात असताना बाहेरील वातावरणातून- परिस्थितीतून संस्कार झाले. तेही प्रल्हादावर भक्तीचे, अष्टावक्रावर ज्ञानाचे तर अभिमन्यूवर कर्माचे म्हणजे पराक्रमाचे.
प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू यांच्या राज्यात विष्णूच्या कोणत्याही रूपातील पूजेला, भक्तीला बंदी होती. म्हणजे विष्णूचे पूजन-भजन-नामस्मरण-यज्ञ इ. काही म्हणजे काही करायचे नाही अशी सक्ती होती.
हिरण्यकशिपूची सर्वात प्रिय व्यक्ती होती त्याची पत्नी- कयाधू. त्या असुराचे अत्याचार कमी करण्यासाठी या कयाधूला नारदांच्या आश्रमात लपवले. हिरण्यकशिपूने प्रिय कयाधूचा सर्वत्र शोध घेतला. नारदांच्या आश्रमात आपली पत्नी (एक स्त्री) असेल याची त्याला कल्पनाही नव्हती. त्यावेळी गर्भवती असलेल्या कयाधूच्या गर्भावर सदासर्वदा ‘नारायण नारायण’ या नामाचा गजर (ध्वनी) पडत राहिला. त्याचा संस्कार गर्भावर झाला, जो पुढे प्रल्हादाचा जन्म होऊन तो बोलायला लागल्यावर प्रकट झाला.

दुसरी कथा आहे अष्टावक्राची. त्याचे पिता कहोड ऋषी आश्रमात आपल्या शिष्यांना संस्कृत शिकवत होते. त्यांची गर्भवती पत्नी जवळच झाडाला टेकून काहीतरी घरकाम करीत होती. काहीतरी चांगलं आपल्या कानावर पडावं हा तिचा हेतू होता. कहोड ऋषी बोलत असताना एका विशिष्ट शब्दाचा उच्चार करताना ते अडखळले. त्यावेळी कुणीतरी ‘हं हं’ असं विडंबनात्मक हसलं. शिष्यांना विचारल्यावर कुणीही कबूल केलं नाही. हा प्रकार तीनचार वेळा घडला. तरीही कुणाही शिष्यानं ‘हो’ म्हटलं नाही. रागावून कहोड ऋषींनी शाप दिला, ‘जो कोणी माझ्या नकळत झालेल्या चुकीला हसला असेल तो शरीरानं आठ ठिकाणी वाकडा (अष्टावक्र) बनेल.’ हे ऐकून त्यांची पत्नी रडू लागली. तिला कारण विचारल्यावर तिनं सांगितलं, ‘माझ्या आतलं आपलं बाळ हसत होतं.’ कहोड म्हणाले, ‘ज्याअर्थी माझी चूक त्याला गर्भावस्थेत कळली त्याअर्थी तो भविष्यात खूप ज्ञानी होईल.’ त्याप्रमाणे पुढे अष्टावक्र विद्वान ऋषी बनले.
तिसरं सर्वपरिचित उदाहरण अभिमन्यूचं. आपली बहीण सुभद्रा हिला भेटायला आल्यावर कृष्णानं तिला रथातून फिरायला नेलं. तिनं एक छान गोष्ट ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर श्रीकृष्ण उद्गारला, ‘तू एक क्षत्राणी- वीर क्षत्रिय स्त्री- आहेस. तुला युद्धासंबंधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो.’ यानंतर कृष्णानं भगिनी सुभद्रेला रणांगणात शत्रूनं रचलेल्या चक्रव्यूहात कसं शिरायचं हे विस्तारानं सांगितलं. चक्रव्यूहातून यशस्वीपणे बाहेर कसं पडायचं हे सांगण्यापूर्वी कृष्ण-सुभद्रा ही दोघी घरी पोचली. तो विषय अर्धवटच उरला. गर्भातील अभिमन्यू हे सारं ध्वनिरूपातलं ज्ञान शोषून घेत होता. पुढे द्रोणाचार्यांनी प्रत्यक्ष रचलेल्या चक्रव्यूहाचा भेद अभिमन्यू करू शकला. पण बाहेर येण्याचं ज्ञान नसल्यामुळे वीर अभिमन्यू मारला गेला, हे सर्वांना माहीत आहेच.
या वर्णनावरून गर्भसंस्कार प्रत्यक्षात होतात का, कशा प्रकारे होतात, पुढे जीवनात ते कसे व्यक्त होतात हे पूर्णपणे सिद्ध करता येणार नाही.
पण संस्कारांच्या दृष्टीने खालील गोष्टी प्रत्यक्ष करायला काय हरकत आहे?

  • गर्भवती स्त्रीचा आहार, विहार, विश्रांती, मनोरंजन यांचा विचार करायला हवा.
  • भावी मातेच्या मनावर आघात होतील असे कर्कश्श, कठोर बोलणे पूर्णतः टाळण्यात काय वाईट आहे?
  • मुख्य म्हणजे कान, डोळे यांसारख्या इंद्रियांतून आत जाणारी दृश्यं, घटना, कार्यक्रम शक्यतो कमीत कमी करायला हवेत.
    यात अवघड काय आहे? निदान आपल्या बाळासाठी?