लोक जागे आहेत!

0
17

बाणस्तारी अपघात प्रकरणी आज संपूर्ण गोवा संतापाने खदखदतो आहे. ज्या जोडप्याच्या बेपर्वाईने तीन निरपराध नागरिकांचा बळी घेतला, चौघांना जायबंदी केले, त्यांच्या आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात तीव्र जनमत आहे याची जाणीव सरकारनेही ठेवण्याची आवश्यकता आहे. काल रात्री संतप्त दिवाडीवासीयांंनी पुन्हा एकदा म्हार्दोळ पोलीस स्थानकावर स्वयंस्फूर्तीने धाव घेतली आणि धनशक्तीपुढे कदाचित पोलीस झुकत असतील, पण जनता झुकणार नाही, ती झोपलेली नाही हे दाखवून दिले. अपघातग्रस्त कार महिला चालवत होती अशी साक्ष दिग्विजय वेलिंगकर या प्रत्यक्षदर्शीने ठामपणे काल पुन्हा एकवार दिली आहे. त्याला खोटे ठरवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न पोलिसांनी वारंवार चालवला, तो या अपघात प्रकरणाच्या तपासकामाविषयीचा संशय अधिक गडद करणारा आहे. श्री. वेलिंगकर यांनी कच न खाता आपण जे पाहिले ते पोलिसांना सांगितले, त्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. सदर वाहन महिला चालवत नव्हती, तर तिचा नवरा चालवत होता असे जे पोलिसांचे म्हणणे आहे, ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता पोलिसांची राहील. त्यासाठी त्यांनी पुढे आणलेल्या तथाकथित प्रत्यक्षदर्शींची साक्ष पुरेशी नाही. कुंडई ते बाणस्तारी दरम्यान जी व्यावसायिक आस्थापने आहेत, त्यातील एखादी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पुराव्यादाखल सादर केली तरच हे वाहन नेमके कोण चालवत होते हा तिढा सप्रमाण सुटू शकेल व जनतेच्या संशयाचे निराकरण होईल. अपघात घडल्यानंतर नवऱ्याला वाचवण्यासाठी सदर महिला चालकाच्या आसनावर जाऊन बसली हे जे काही तर्कट पोलीस अधिकारी सांगत आहेत ते पटण्यासारखे नाही. मुळात अपघात घडला तेव्हा ती शुद्धीवर होती का? नवऱ्याने मर्यादेहून तिप्पट मद्यप्राशन केले होते. या महिलेच्या मद्यप्राशनाची चाचणी घेतली गेली का व घेतली नसेल तर का घेतली नाही हेही पोलिसांनी सांगितले पाहिजे. हे मद्यधुंद जोडपे खांडेपारला रोटरी क्लबची पार्टी आटोपून पणजीला परतत होते. गाडीत मुले असताना नवरा तर झिंगलेला होताच, शिवाय अपघातग्रस्त गाडीत दारूची बाटलीही आढळली आहे. हा अपघात चुकून घडलेला अपघात नाही. तो मस्तवालपणातून झालेला अपघात आहे. या मस्तीचे दर्शन अपघातानंतरही जी अरेरावी उपस्थित नागरिकांशी केली गेली त्यातून घडले आहे. अपघात घडला तेव्हा पोलिसांनी जखमींना मदत करण्याऐवजी या हाय प्रोफाईल दांपत्याला मदत केली असा नागरिकांचा आरोप आहे. रात्री आठच्या सुमारास एवढा भीषण अपघात होऊनही चालकाला अटक करायला आठ तास का लागले? मुळात त्याला अपघातानंतर तात्काळ ताब्यात का घेतले गेले नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता? संतप्त नागरिकांनी आवाज उठवल्यावर नाईलाज झाल्यागत पोलिसांनी चालकाला अटक केली. त्याला पोलीस कोठडीत रात्र घालवावी लागू नये यासाठीची ही जय्यत तयारी होती का असा सवाल काल आम्ही केला होता. घटनाक्रम तर तेच सुचवीत आहे. काल न्यायदंडाधिकाऱ्यांनी ह्या महाभागाला जामीन नाकारला. तो कोठडीत कसा ढसाढसा रडत होता त्याची रसभरित वर्णने करून त्याच्याविषयी सहानुभूती उत्पन्न करू पाहणाऱ्यांनी जे निरपराध नागरिक या अपघातात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचे मोल आधी जाणावे. या अपघात प्रकरणाची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. या वाहनाला तब्बल सातवेळा ऑनलाइन चलन जारी झाले होते. आर्टिफिशिलय इंटेलिजन्सचे एक बरे असते. त्याला कशाचे दडपण लागू पडत नाही किंवा ते भ्रष्टाचारातही गुंतलेले नसते. त्यामुळे एआययुक्त कॅमेऱ्यांनी चलन पाठवण्याचे आपले काम बजावले. परंतु एवढे चलन मिळूनही एकाही दंडाची रक्कम सदर कारमालक महिलेने भरली नव्हती. तरीही वाहतूक खाते सुस्त कसे काय राहिले याचे उत्तर आधी वाहतूक संचालकांनी जनतेला द्यायलाच हवे. सध्या राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. परंतु एवढा भीषण अपघात होऊनही ज्या पोटतिडकीने हा विषय विधानसभेत उपस्थित व्हायला हवा होता तसा तो झाला नाही हे बोलके आहे. सातवेळा कायदेभंग करणारी कारमालक महिला परवाना निलंबित न होता मोकळी कशी राहिली ह्या प्रश्नाचा आम्ही पुनरुच्चार करतो. पोलिसांविषयी तर अत्यंत अविश्वासाचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणेच्या, सरकारच्या आणि एकूणच न्यायप्रक्रियेच्या प्रामाणिकपणाचा कस या प्रकरणात लागणार आहे हे निश्चित.