लोकांचे प्रश्न सोडवा; मगच खाणी सुरू करा

0
8

>> डिचोलीतील खाणीबाबतच्या जनसुनावणीवेळी नागरिकांची मागणी; दीड हजार जणांची उपस्थिती; अनेक सूचना सादर

यापूर्वी झालेल्या खाणकामामुळे अनेक गावे, तेथील शेती-बागायती आणि जलसाठे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे लोकांचे सर्व प्रश्न आधी सोडवा, लोकांना विश्वासात घेऊन जे आक्षेप आहेत, ते दूर करा, अशी मागणी काल डिचोलीत खाणींसंदर्भात आयोजित जनसुनावणीवेळी उपस्थित नागरिकांनी केली. खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही; मात्र आधी सर्व प्रश्न कायदेशीर मार्गाने आणि लोकांचे समाधान होईल अशा पद्धतीने सोडवा आणि मगच खाणी सुरू करा, असा सूर या सुनावणीवेळी उमटला.

वाठादेव-डिचोली येथील झांट्ये महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात काल सकाळी 10.30 वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणीस सुरुवात झाली. या सुनावणीला दीड हजारच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.

यावेळी सुरुवातीला उपस्थित नागरिकांनी ही सुनावणी रद्द करण्याची मागणी केली; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही सुनावणी सर्व नियमानुसार घेतली जात असल्याने ती रद्द करता येणार नसून, लोकांनी आपली बाजू मांडावी, असे स्पष्ट केले. त्यानंतर अनेकांनी आपली बाजू मांडताना खाण व्यवसायाचे चांगले-वाईट परिणाम याबाबत आपापली मते मांडली. अनेक कामगारांनी खाण व्यवसायाचे समर्थन करताना हा पोटापाण्याचा प्रश्न असल्याने तो सुरू होण्याची गरज व्यक्त केली.

दुसऱ्या बाजूला या खाणकामाविरोधात भूमिका मांडण्यात आली. ही सुनावणी घेताना संबंधित गावातील ग्रामस्थ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. तसेच नव्याने पूर्ण सर्वेक्षण करावे आणि ग्रामस्थांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. याशिवाय खाण क्षेत्रात गावांतील मंदिरे, शेती-बागायतींचा जो समावेश करण्यात आलेला आहे, तो वगळण्यात यावा. तसेच यापूर्वीच्या खाणकामामुळे जी अनेक गावे गेल्या अनेक वर्षात उद्ध्वस्त झाली, जी शेती-बागायती आणि नष्ट झाले, त्यासंदर्भात न्यायालयीन लढाई जिंकूनही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही, ती आधी द्यावी. हे सर्व प्रश्न आधी निकालात काढण्यात यावे, असा सूर अनेकांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या खाणीसाठी जो ग्रीन फिल्ड म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, तो अयोग्य आहे, असे अनेकांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी रमेश गावस, सखाराम पेडणेकर, ॲड. अजय प्रभुगावकर, स्वप्नेश शेर्लेकर, प्रदीप रेवोडकार, वसंत गाड, प्रशांत धारगळकर यांच्यासह अनेकांनी भूमिका मांडली. यावेळी वेदांता कंपनीतील कामगारांनीही आपापली भूमिका स्पष्ट केली.

पंचायत मंडळे, देवस्थाने, शेतकरी संघटना, कोमुनिदाद, ग्रामस्थ, पंचायत मंडळांना विश्वासात घेणे आणि कंपनीची भूमिका याबाबत योग्य समन्वय साधला गेलेला नाही, अशी टिप्पणी काहींनी केली. या सुनावणीसाठी 189 लोकांनी नावनोंदणी केलेली होती, दुपारपर्यंत सुमारे 100 च्या आसपास विविध क्षेत्रातील लोकांनी आपली भूमिका मांडली. सायंकाळी ही सुनावणी सुरुच होती.