>> नगरनियोजन खात्याकडे तक्रारी प्राप्त
>> मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती
प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये कित्येक लोकांच्या लोकवस्तीतील विभाग म्हणून नोंद झालेल्या जमिनींचे रुपांतर मोकळ्या जागा, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जागा, बागायती म्हणून करण्यात आली असल्याच्या तक्रारी नगरनियोजन खात्याकडे आल्या असल्याचे काल मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
यापैकी बर्याच लोकांना धमक्या देऊन त्यांना त्यांच्या जमिनी विकण्यास भाग पाडल्याच्या तक्रारी आहेत. ज्यांनी जमिनी विकण्यास नकार दिला, त्यांच्या जमिनींचे वरील प्रकारे मोकळ्या जागा, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जागा, बागायतीच्या जागा म्हणून भू-रुपांतर करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
आपण या सर्व तक्रारींची दखल घेणार असून, अशा प्रकारे बेकायदेशीरपणे ज्या लोकांच्या जमिनींचे रुपांतर करण्यात आले आहे, त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचेही राणेंनी नमूद केले.
जमीन घोटाळाप्रकरणी आणखी एकास अटक
>> विशेष तपास पथकाची कारवाई; आतापर्यंत दोघे संशयित गजाआड
आसगाव-म्हापसा येथील बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जमीन घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एका संशयिताला काल अटक केली असून, या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या दोन झाली आहे. मोहम्मद सोहेल सफी (४४, रा. सांतईनेज-पणजी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
आसगाव येथील जमीन घोटाळा प्रकरणी विक्रांत शेट्टी याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. एसआयटीला शेट्टी याच्याकडून जमीन बळकावणे व हस्तांतरण प्रकरणी बरीच माहिती मिळाली आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावून परराज्यातील व्यक्तींना विकल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता मोहम्मद सोहेल याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हा बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावणे व विक्री प्रकरणात तरबेज आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. एसआयटीकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याने अनेक बेकायदा जमीन हस्तांतरण, विक्री प्रकरणांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याचे माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटीकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तसेच विविध पोलीस स्थानकांत दाखल करण्यात आलेल्या याविषयक तक्रारी देखील एसआयटीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या एसआयटीकडून केवळ आसगाव येथील जमीन घोटाळ्याचाच तपास केला जात आहे. आसगाव प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्यानंतरच पुढील तक्रारींवर कारवाई केली जाणार आहे.
एसआयटीला पूर्ण सहकार्य : मोन्सेरात
महसूल खात्याकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावणे, विक्री आणि हस्तांतरण प्रकरणाचा तपास करणार्या एसआयटीला सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.