* ‘लॉकडाऊन’चे दिवस *

0
262

 

धैर्य, नियोजन आणि कार्याची गुढी

सौ. शुभदा दी. मराठे

 

लॉकडाऊन- कुलूपबंद. नाव खूपच छान. घरातून सगळे बाहेर जाताना घर कुलूपबंद होते. पण… आता मात्र एकवीस दिवसांसाठी आम्ही घरात कुलूपबंद आहोत. अगदी चौवीस तास! कुणाला भेटणे नाही, येणे-जाणे नाही. रविवार दि. 22 चा कर्फ्यू अगदी स्वेच्छेने, राजीखुशीने पाळला. संध्याकाळी 5 वाजता टाळ्या, घंटानादही केला. त्यावेळी ‘बंद’चे एवढे गांभीर्य वाटले नाही. पण मनावर दडपण होतेच. नक्की काय करायचे ठाऊक नसल्याने चलबिचल वाढली होती.

सोमवारी मा. मुख्यमंत्र्यांनी दि. 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचे सुतोवाच केले आणि मनात पाल चुकचुकली. मी गृहिणी असल्याने सर्वात आधी इतके दिवस पुरतील एवढ्या गरजेच्या वस्तू आहेत का आपल्या घरात याची चाचपणी केली. काही होत्या; काही नव्हत्या. पण भागेल एवढ्यात असे वाटल्याने सूऽऽ झाले.

एवढ्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला आदरणीय पंतप्रधानांनी एकवीस दिवस लॉकडाऊनचे जनतेला आवाहन केले आणि मी सुन्न झाले. एक मन आवाहनाचे स्वागत करत होते, तर दुसरे मन स्वतःचा विचार करत होते.

सुन्न एवढ्यासाठीच झाले की, आम्ही स्थायिक झालोत तिथून बारा कि.मी. अंतरावर आमचे कुळागर आहे. तिथे जाऊन आम्ही दोघानी राहावे असे यांचे मत, तर सर्वांनी इथेच एकत्र राहावे हा मुलाचा आग्रह. माझी मधल्यामध्ये त्रिशंकू अवस्था झाली. एकवीस दिवस पाण्याविना कुळागर किंवा नात्यांपासून फारकत! काहीच सुचेना. डोळ्यात येणारे पाणी अडवण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. बोलायला शब्द नव्हते. आवाज कातर झाला होता. गेलो तर आज रात्रीच; नपेक्षा नाही! आयुष्यात अनेक बरे-वाईट अनुभव घेतले, पण असा क्षण नवीनच होता. आता नको, सकाळी बघू, काहीतरी मार्ग निघेल, असा विचार करून देवावर भरवसा ठेवून झोपायला गेले. पण झोपेने जणू कट्टी केली होती. डोळे सताड उघडे होते. पहाटे कधीतरी डोळा लागला.

सकाळी उठले. नेहमीसारखीच सकाळ, पण मला काही प्रसन्न वाटली नाही. चिंतातूर मन अजूनही निष्कर्षाप्रत येत नव्हते. यंत्रवत कामे चालली होती. टीव्ही चॅनलवर सारख्या त्याच त्या बातम्या, सूचना पाहून, ऐकून मन उद्विग्न होत होते. पण बाकीच्यांकडे पाहून सगळे मनातच दडपले आणि शेवटी कठोरपणे निर्णय घेतला, काहीही झाले तरी सर्वांनी एकत्रच राहायचे!

चैत्र शुद्ध प्रतिपदा. नववर्षाची सुरुवात ही अशी. तरीही आंब्याची डहाळी आणली. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधले. सडासारवण करून रांगोळी रेखली. फुले काढून माळा केल्या. देवपूजा झाल्यावर गुढीची पूजा करून गुढी उभारली. गुढीला आरती दाखविताना निरांजनामधील ज्योतीकडे एकटक पाहता पाहता अंतर्मन हुंकारले, हेही दिवस जातील. धीर धर. नववर्षाचे आनंदाने स्वागत कर. आणि सहज उभारलेल्या गुढीकडे पाहताक्षणी मनातले सारे मळभ मनाच्या चोरकप्प्यात दडपले. मन शांत शांत झाले.

मी लगबगीने स्वयंपाकाला लागले. जे आहे त्यात भागवायचे ही खूणगाठ मनाशी बांधली. एरव्ही एखादी वस्तू कमी पडली तर चला बाजारात, घेऊन या. आता ते होणे नाही. मग आम्ही दोघांनी उपलब्ध सामानातून मेनू ठरवला. आणलेली भाजी चार दिवस पुरवली. नंतर मात्र कडधान्ये आमच्या मदतीला धावून आली.

पहिले चार दिवस तर आम्ही दूधही घेतले नाही. कोरा चहा पिताना मजा आली. एकदा मनाची तयारी झाली की सर्वकाही सोपे होते.

पहिले अभियान- स्वच्छता अभियान. रोज सकाळी घर स्वच्छ करताना सांदी-कोपर्‍यात पडलेले सामान, डबे, पुस्तके, जुने कपडे काढून घासूनपुसून स्वच्छ करायचा जणू नादच लागला. करता करता एक दिवस देवघरावर मोर्चा वळवला. आळसाने देव्हार्‍याच्या पाठीमागे टाकलेले कापूस, जादाची हळद, पिंजर, रांगोळी, मेणबत्त्या, स्तोत्रे, पोथ्या, सहाण-खोड सगळे सगळे साफ करताना तोंडाने स्तोत्रपठन चालूच होते. देव्हारा, समई घासूनपुसून अगदी स्वच्छ केली. अगदी नव्यासारखी. दरवर्षी नवरात्राच्या पहिल्या दिवशी देव, देव्हारा, देवाची खोली अशीच घासूनपुसून चकचकीत करतो. त्याची पुनरावृत्ती झाली. तो दिवस होता रामनवमीचा. चकचकीत सोन्यासारख्या समईत तेलवात करताना सहज मनात आले, कोरोनासारख्या महामारीलाही ही ज्योत आपल्या दिव्य, लखलखीत तेजाने शेकडो योजने पळवून लावील.

संध्याकाळच्या वेळी छोटी छोटी मासिके, दिवाळी अंक काढून बसले. छोट्यांसाठी खास असलेल्या छान छान गोष्टी वाचल्या. नातीला वाचून दाखविल्या. तिलाही वाचायला लावल्या. तिच्या बालसुलभ प्रश्नांना उत्तरे देताना माझ्यातली ‘शिक्षिका’ जागी झाली. पार भूतकाळात नेले तिने मला. कधी वेगवेगळे खेळ तयार करून खेळलो. खूप मजा आली. एक तास टेरेसवर रोज चालते. तोंडाने ‘श्रीराम जयराम जयजय राम’चा अखंड नामजप.

तिन्हीसांजेला आपोआप पाय देवघराकडे वळतात. माझेही तेच झाले. नेहमीची स्तोत्रे, शिवाय शिवलीला अध्याय, गजानन महाराजांची पोथी वाचायला घेतली अन् भूतकाळात रमू लागले. वाचनाने मन शांत शांत होते. त्यामुळे घरात जेवढी पुस्तके आहेत, तेवढी वाचण्याचा मी संकल्पच केला आणि सुरुवातही.

 

लॉकडाऊनचे दिवस

– शरत्चंद्र देशप्रभू

पंतप्रधानांनी 22 मार्चच्या एक दिवसीय लॉकडाऊनच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात दीर्घकाळ लॉकडाऊनचे संकेत दिले होते. परंतु चार तासांच्या नोटिशीने एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनची अपेक्षा नव्हता. यामुळे सार्‍यांचीच भंबेरी उडाली. असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या हालअपेष्टांना पारावार राहिला नाही. परंतु रोग तसा इलाज. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर मला 1965 व 1970 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धकाळाची आठवण झाली. परंतु त्याकाळी रात्री विजेचा प्रकाश खिडक्यांच्या तावदानांना जाड कागद घालून अडविणे एवढीच अपेक्षा होती. त्याकाळी बौद्धिक व भौतिक प्रगती न झाल्याने नागरिकांच्या मनात प्रखर देशभक्तीपर भावना उफाळली होती.

लॉकडाऊनचे पहिले दोन ते तीन दिवस जीवनावश्यक वस्तू जमा करण्यातच गेले. दूध, आटा, कडधान्ये, भाजीपाला सारेच अनुपलब्ध. सोसायटीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप करून परिस्थितीवर नियंत्रण आणले अन् रहिवाशांच्या प्राथमिक गरजा भागल्या. नंतर लॉकडाऊनची जाणीव हळूहळू तनामनात झिरपू लागली. विविध चॅनेलवरच्या, विशेष करून स्थानिक अन् महाराष्ट्रातील बातम्यांनी महामारीची दिशा स्पष्ट केली. परंतु सतत चॅनल पाहून मनात नैराश्येचे तरंग निर्माण होऊ लागले. श्री. वामन यांनी व्यक्तिशः नवहिंद व नवप्रभा हे पेपर आणून उपकृत केले. मर्यादित स्वरुपात प्रसिद्ध झालेल्या या दोन दैनिकांनी वृत्तपत्र वाचण्याची तहान भागवली. प्रथमच ही वृत्तपत्रे अथपासून इतिपर्यंत वाचली जाऊ लागली. भरपूर वेळ असल्यामुळे अवांतर वाचन वा काहीबाही लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु मन केंद्रित होईना. संध्याकाळी मिरामार किनार्‍यावर फिरण्यात मर्यादा आल्या. यामुळे गप्पागोष्टींवर पण निर्बंध आले. यातून घरातील जमेल ती कामे करण्याची सवय लावली. शारीरिक कष्ट झाले तरी मनावरचे दडपण कमी झाले. व्हाट्सअ‍ॅपवर येणार्‍या विविध संदेशांतून नेमके संदेश ज्यात कोव्हीडविषयी सर्वंकष माहिती होती ते नातेवाईक तसेच मित्रपरिवाराला फॉर्वर्ड करण्यात पण वेळ व्यतीत केला. सिद्ध समाधी योगाचा अभ्यास करताना ध्यानधारणा शिकवली होती. भावनाप्रधान स्वभाव असूनसुद्धा चिकाटीने ही विद्या आत्मसात केली होती. याचा फार उपयोग झाला. मजूर खात्यातील कनिष्ठ सहकार्‍यांना मार्गदर्शन करून वेळ सत्कारणी लावला. विशेष करून स्थलांतरित मजुरांचे प्रश्न समजून योग्य सल्ला दिला. थोडीफार या विषयाची उजळणी झाली. मी बारा बारा तास आव्हानात्मक जबाबदारी उसंत न घेता पार पाडू शकतो. तसेच काही न करता एकांताचा आनंद पण घेऊ शकतो. तासन्तास मिरामार समुद्राच्या लाटांचे विभ्रम एकटक बघत मी सहज दोन ते तीन तास घालवू शकतो. चिंतन, मनन याचा पण बराच फायदा होत आहे. आता लॉकडाऊनचे निर्बंध 15 एप्रिल नंतर उठविणार की नाही माहीत नाही; परंतु याचे आर्थिकच नव्हे तर समाजमानसावरही दूरगामी परिणाम अपेक्षित आहेत.

 

‘लॉकडाऊन’कडे सकारात्मकतेने पहा!

– अपूर्वा सांबरेकर (गोवा विद्यापीठ)

 

भारत सरकारने ‘कोरोना’विरुद्ध लढा देण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. बहुतेकजणांनी ही लॉकडाऊनची घोषणा ऐकून नाराजी व्यक्त केली. परंतु हे लॉकडाऊन म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी सरकारने उचललेली ठोस पावले आहेत. भारत सरकारने जर ही संचारबंदी जाहीर केली नसती तर आज कितीतरी लोक ‘कोरोना’चे बळी ठरले असते. परंतु सरकारने वेळीच सर्वाला बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे.  हा लॉकडाऊन आपण सकारात्मकतेने घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच असल्यामुळे एकमेकांना निवांत वेळ देता येतो. अनेक गोष्टींवर चर्चा होते.

ज्या दिवसापासून लॉकडाऊन सुरू झाला त्या दिवसापासून घरीच असल्यामुळे मला वाचनासाठी वेळ मिळतो. त्यामुळे काही पुस्तके वाचून होतात. आपल्या हातातच मोबाईल असल्यामुळे ऑनलाईन कितीतरी नाटके बघून होतात. या लॉकडाऊनच्या काळात मी सध्या हेच अनुभवतेय. निवांत वेळ, वाचन, नाटकांचा आस्वाद घेणे इत्यादी.

मुख्य म्हणजे निवांत वेळी आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळतेय. स्वत:शी संवाद साधणे हा एक महत्त्वाचा सकारात्मक असा विचार आहे. मला या गोष्टींसाठी वेळ मिळतोय यात मला खूप आनंद आहे. एरव्ही कॉलेज, अभ्यास या गोष्टी करताना स्वत:कडे दुर्लक्ष होतं. रविवारची सुट्टी असते परंतु तो दिवस कसा येतो आणि कसा जातो हे समजत नाही. लॉकडाऊनच्या निमित्ताने स्वत:कडे लक्ष देण्याची संधी मिळाली आहे. माझ्याप्रमाणेच इतरांनीही या संधीचा लाभ घ्यावा असे मला वाटते.

21 दिवस लॉकडाऊन असल्यामुळे आपली बरीच कामे होऊन जातात आणि आपण ती आनंदाने केली पाहिजेत. दर दिवशी मीसुद्धा वेगवेगळी कामं करण्याचा प्रयत्न करते. घरातील सर्व सदस्यांसाठी स्वयंपाक बनवतेय. स्वयंपाकातील जी गोष्ट मला जमत नाही ती शिकण्याचा मी प्रयत्न करतेय.

सर्वांच्या आवडीप्रमाणे माझीही आवड म्हणजे गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे. तर ते कामही मी या 21 दिवसांच्या काळात करत आहे. शेजारच्या दोन लहान मुलांच्या बोबड्या बोलातील गोष्टींचा मनमुराद आनंद लुटणे हे तर माझे अत्यंत आवडीचे काम.

आम्ही सर्वजण घरातच असल्यामुळे घरची स्वच्छता, साफसफाई करणे सुरू आहे. त्यामुळे एरव्ही आम्हाला न सापडणार्‍या वस्तूही मिळत आहेत. जुने अल्बम मिळत आहेत. त्यांमुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. वाचन, लेखन यांबरोबरच मी कॅरमही खेळते. त्यातूनही खूप आनंद मिळत आहे.

लॉकडाऊन ही गोष्ट नकारात्मकतेने न घेता सकारात्मकतेने घेतली पाहिजे. केवळ घरातून बाहेर जाण्यास मिळत नसल्यामुळे काहीजणांना लॉकडाऊन ही गोष्ट नकारात्मक वाटत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीप्रमाणे ही गोष्टही आपण सकारात्मकतेने घेतली पाहिजे. एरव्ही घरची मंडळी एकत्र जेवायला बसणे कठीण असते, कारण सर्वांची वेगवेगळी कामे. परंतु या लॉकडाऊनमुळे एकत्र बसून जेवण्याची संधी आपल्या सर्वांना मिळत आहे. माझ्याप्रमाणेच आपण सर्वांनी हा लॉकडाऊन सकारात्मक घ्यावा आणि 21 दिवस अनेक गोष्टींचा घरी बसून आनंद घ्यावा असे मला वाटते.

 

झुंझार बलाढ्य देशा, भारत देशा!

– राशी रामदास देसाई (डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालय, कुजिरा-गोवा)

लोभात्क्रोधः प्रभवति, लोभात् कामः प्रजायते।

लोभान्मोहश्च नाशश्च, लोभः पापस्य कारणम्॥

अर्थात, लोभ हेच क्रोध, काम, मोहाचे प्रमुख कारण असून लोभच असुरवृत्तीचा पाया आहे.

मनुष्यजीवनाला कायमस्वरूपी धोक्यात घालणारा गुण म्हणजे लोभच होय. मानवाने वैज्ञानिक, आधुनिक, तंत्रज्ञानिक इत्यादी क्षेत्रांत प्रचंड प्रगती केली पण त्याला आपल्या लोभावर आवर घालता आली नाही. लोभाच्या आहारी जाऊन त्याने पृथ्वीचा, सृष्टीचा सर्वनाश करण्यास सुरुवात केली. शेवटी सृष्टी तरी कितपत सहन करेल? आपले तिसरे नयन तिने उघडलेच व ‘कोरोना’सारखी महामारी मानवजीवनाला धडा शिकवायला जन्माला आली. शेवटी उत्पत्ती आणि लय ही निसर्गाच्याच हातात आहे. कोरोनामुळे भारताचेच नव्हे तर सर्व जगाचेच चित्र बदलून गेले आहे. आर्थिक स्थिती तर एवढी खालावली आहे की ती सुधरायला कदाचित पुढची आणखी दोन वर्षे लागतील प्रत्येक प्रांताला पुन्हा स्वावलंबी होण्यासाठी.

आता भारताची स्थिती पुन्हा उभारण्यासाठी युवा पिढीलाच पुढाकार घेऊन आपलं कर्तव्य पार पाडावं लागेल.

अंतरसे मुख से कृती से

निश्चल हो निर्मल मति से

श्रद्धा से मस्तक नतसे

हम करे राष्ट्र अभिवादन

हम करे राष्ट्र आराधन

आपल्याच अंतःमनातून देशासाठी आम्ही प्रयत्न करायला हवा. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी व विक्री करण्याचा अतोनात प्रयत्न करायला हवा. भारताचा जी.डी.पी. खालावला जाणार. लॉकडाऊनमुळे पुस्तके छापण्याचे कारखाने बंद असल्यामुळे पुस्तकांचे छापणे थांबलेले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर मुलांना पुस्तके-वह्या मिळणे थोडे कठीणच आहे. त्यामुळे भांबावून न जाता आम्ही जुन्या पुस्तकांचा वापर केला पाहिजे. जुन्या वह्या, पाठ्यपुस्तके वापरून छापणीसाठी वापरला जाणारा पैसा दुसर्‍या विभागात सरकार वापरू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे, आता पावसाळा सुरू होत असल्यामुळे नवीन छत्र्या, रेनकोट न घेता जुन्याच गोष्टींचा वापर करणे आवश्यक ठरेल. उगाच अनाठायी खर्च टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. मी आणि माझं कुटुंब असे आम्ही म्हणतो तेव्हा ‘भारत देश हेच माझं कुटुंब आहे’ असं प्रत्येकाने म्हटले पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाने आपले कार्य संपूर्ण निष्ठेने पार पाडावे. भारताला पुन्हा बलशाली बनविण्याचे शिवधनुष्य फक्त सरकारनेच नव्हे तर राज्यातील प्रत्येक नागरिकाने पेलायला हवे.

भुमि जलाग्रि वायुनामणव: मिलिता यदि।

साधयानि स्वकं कार्यम् न भिन्न: कार्यसाधक:॥

जेव्हा जल, अग्नी, वायू हे अणू एकत्र येतात तेव्हाच कोणतेही कार्य सिद्धीस जाते. ते भिन्न असल्यास कार्य साधणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती, सर्व धर्मातील, सर्व वयोगटातील समस्त भारतवासीयांनी एकत्र येऊन भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावला पाहिजे. जसा कोरोना जात, धर्म न बघता सर्वांनाच बाधतो त्याचप्रकारे आम्हीही जातपात न बघता एकत्र आले पाहिजे. स्वखुशीने गरीब व्यक्तीसमोर मदतीचा हात पुढे केला पाहिजे. एकीचे बळ काय असते हे दाखवून द्यायला हवे. मोठमोठ्या कर्मचार्‍यांनी आपल्या स्वेच्छेने पगारातील छोटासा का असेना पण खारीचा वाटा द्यायला हवा. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतील त्याचा स्वीकार करून काही काळासाठी आम्ही लोकल वाहतुकीचा वापर करणे अनिवार्य ठरेल. आज-काल तर प्रत्येकालाच काँक्रीटच्या जंगलात वसायचे असते, पण शेती कोणीच करू इच्छित नाही. आपण आपली भूमी पिकवली पाहिजे. आता आम्ही या महामारीवर मात करणारच, पण यानंतर काय? काही काळानंतर जर प्यायला पाणीच नसेल तर काय होणार? प्रदूषण वाढतच गेलं तर श्वास तरी कसे घेणार? म्हणून आत्ताच जागे व्हा. पाण्याची साठवण करा. रसायनयुक्त कारखान्यातील पाणी नदी-नाल्यांत सोडताना एकदा विचार कारा. पुन्हा ही प्रकृती आपल्याला ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ असं विचारणार नाही. सरळ वेताचे फटके देईल. कारण देश असेल तरच आम्ही असू. देशाला ठणठणीत उभारण्यासाठी आपणच प्रयत्न करूया. आपला भारत देश हा ‘फिनिक्स’ पक्ष्यासारखा आहे, जो राखेतून पुन्हा ऊंच भरारी घेईल. यासाठी गरज आहे ती फक्त सर्वांच्या साथीची. आता भारताचे भविष्य आपल्याच हातात आहे व आपणच ते घडवू शकतो.

जय हिंद

 

 

‘कोरोना’नंतरचा भारत व आम्ही

– शर्वरी भूषण भावे (म्हार्दोळ-गोवा)

 

कोविद-19 या जागतिक महामारीने आज इतर देशांबरोबर भारतालाही विळखा घातला आहे. भारत देश आज खूप मोठ्या प्रमाणात या कचाट्यात अडकला आहे. पूर्वीच्या काळीही साथीचे आजार पसरायचे. उदा. प्लेग. या आजाराने अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागत असे. अशा प्रकारचे रोग कितीतरी वर्षांनंतर येतात व संपूर्ण मानवजातीला आवाहन देतात. तशीच ही महामारी आपल्या देशापुरतीच नाही. ती कुठेही, कुणालाही बाधा आणू शकते.

कोविद-19 महामारीची कारणे

कोविद-19 या जागतिक महामारीची कारणे शोधणे खूप आवश्यक आहेत. विषाणू (व्हायरस) हा आपल्या आजूबाजूला असतोच. या सृष्टीमध्ये लहान-मोठ्या प्रत्येक जीवाचा अधिवास ठरलेला असतो. डोंगर म्हटला की माकडे, वन्य पशू हे आलेच. पठारी किंवा नदीकाठचा भाग हा मानवाचा अधिवास आहे. जमीन, माती, भूमीखालील भाग हा कीटकांचा अधिवास आहे. जोपर्यंत आपण दुसर्‍यांच्या अधिवासात प्रवेश करत नाही, त्यात ढवळाढवळ करत नाही, तोवर कसलाही धोका नाही. पण ज्याक्षणी माणसाने दुसर्‍यांच्या अधिवासात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली, त्याक्षणी धोका निर्माण झाला. आपण त्यांचे अधिवास नष्ट करायला लागलो. त्यांच्या अधिवासात अनिर्बंध प्रवेश करायला लागलो. निसर्गाचे दोहन करण्याऐवजी आपण आपल्या स्वार्थासाठी त्याचे शोषण करायला लागलो. माणसाच्या खासकरून चिनी माणसांच्या खादाड वृत्तीमुळे निसर्गातले चक्र हालले. वटवाघळाचे सूप किंवा साप यांच्या सेवनातून चीन देशातील वुहान शहरात या विषाणूचा फैलाव झाला. हा विषाणू माणसाच्या फुफ्फुसावर आक्रमण करतो व त्यामुळे माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो व त्याच्यातच त्याचा मृत्यू होतो.

या महामारीवरील उपाय

गालगुंड, पोलिओ, देवी, प्लेग यांसारखे आजार ज्याप्रमाणे आपण लसीच्या आधाराने दूर करू शकलो तसेच या कोविद-19 वर जोपर्यंत कोणीतरी लस शोधून काढत नाही तोपर्यंत मरणार्‍यांचे प्रमाण आपण अडवू शकणार नाही. दुसरा उपाय म्हणजे सृष्टीचे चक्र न बिघडावणे.

 

आज आपण खालील सूचनांचे पालन करतो-

स्वच्छता व टापटीपता यांचे पालन करणे.

हात परत परत धुणे.

हात तोंडाला, नाकाला न लावणे.

एकमेकांपासून अंतर ठेवून राहणे.

शक्यतो घरातच राहणे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणे.

सर्दी, खोकला झाल्यास तोंडावर रुमाल धरणे.

वरील आजार अनेक दिवस राहिल्यास वैद्यकीय सल्ला घेणे.

घरात जर बाधित माणूस असेल तर त्याचे ताट, कपडे वेगळे ठेवणे.

हे नियम आपल्या भारतात पूर्वीपासूनच आचरणात होते. आपल्या पूर्वजांनी हे धोके अनुभवले होते व त्यांनी यापासून धडा घेऊन काही आचार व रीतीरिवाज सांगितले होते ते खालीलप्रमाणे आहेत-

 

स्वच्छतेकडे संबंधित रीतीरिवाज

बाहेरून आल्यानंतर हात कोपरापर्यंत व पाय ढोपरापर्यंत धुवूनच घरात प्रवेश करावा.

एकमेकाला भेटल्यावर आलिंगन किंवा हस्तांदोलनाऐवजी हात जोडून नमस्कार करावा.

सकाळी उठल्यानंतर अंगणात शेणाने सडा-सारवण करावी.

प्रेत दहनानंतर घरातल्या शुद्धीसाठी गोमूत्र शिंपडणे.

यज्ञ करणे.

धूप घालणे.

घरातून बाहेर निघताना हातरुमाल घेणे व अनेक कारणांसाठी त्याचा वापर करणे. उदा. तोंड पुसण्यासाठी, ऊन लागल्यास डोक्यावर ठेवण्यासाठी.

टोपरे, उपरणे ही सगळी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे आहेत त्यांचा वापर करणे.

 

आरोग्याची काळजी घेण्यासाठीचे आचार

सकाळी उठल्यावर तुळशीचे पान खाणे. त्याने आरोग्य चांगले राहाते.

शिजवूनच अन्न खाणे.

अन्नात वेगवेगळे मसाले वापरणे.

गरम पाणी पिण्याची प्रथा ही केवळ भारतातच आहे.

त्यामुळे आपल्याकडे ही परंपरा, हे आचार फार पूर्वीपासूनच होते. आता आपल्याला ते स्वीकारावे लागतील. ‘सर्व जुने ते सोने’ या भावनेतून नव्हे; त्याचबरोबर ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनि, जाळुनी अथवा पुरुनी टाका’ या भावनेतूनही नव्हे तर डोळसपणे विचार करून निर्णय घ्यावा लागेल.

‘कोरोना’नंतरचा भारत हा भारतीय परंपरांविषयी आदर बाळगणारा, त्यांचे डोळसपणे अध्ययन करणारा, विज्ञानाची कास धरणारा व स्वच्छतेचे नियम पाळणारा असाच असावा लागेल.