लांबलेले मदतकार्य

0
26

उत्तरकाशीमधल्या कोसळलेल्या बोगद्यात गेल्या दिवाळीपासून अडकून पडलेल्या 41 कामगारांच्या सुटकेचा क्षण जवळ आला असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशीनच्या ब्लेड तुटल्याने अवघ्या दहा मीटरचे खोदकाम बाकी असताना दुर्दैव आडवे आले. आता हे ब्लेडचे तुकडे मॅग्ना आणि प्लाझ्मा कटरद्वारे कापून बाहेर काढण्यात आले आहेत आणि दुसरा पर्याय नसल्याने मानवी हातांनी पुढील खोदकाम हाती घेण्यात आले आहे. त्याचवेळी दुसरा पर्याय म्हणून बोगद्याच्या वरच्या बाजूने खोदकाम करून एक मीटर रुंदीचा पाईप वरून खाली घालण्याचे कामही हाती घेण्यात आलेले आहे. मात्र, तब्बल 86 मीटरपर्यंत हे खोदकाम करावे लागणार आहे आणि तेही कोणतेही कंपन येऊ न देता अत्यंत काळजीपूर्व पद्धतीने करावे लागणार आहे. हे काम रविवारपासून सुरू करण्यात आलेले आहे आणि हा अग्रलेख लिहिस्तोवर साधारण वीस मीटरपर्यंत खोदकाम पूर्णही झाले आहे. मात्र, ह्या खोदकामात बोगद्याचे कवच तोडावे लागणार आहे. ह्या दोन पर्यायांखेरीज बडकोटच्या बाजूने टीएचडीसीतर्फे दोन मीटर पाईप घुसवण्याचे काम चालले आहे. त्यासाठी छोटे नियंत्रित स्फोट केले जात आहेत. मात्र दरड कोसळू नये यासाठी अत्यंत काळजीपूर्वक हे स्फोट करावे लागत आहेत आणि तब्बल 483 मीटरचे अंतर ह्यात पार करायचे आहे. त्याला चाळीस दिवस लागू शकतात, त्यामुळे ते वेळकाढू आहे. बोगद्याच्या वरून खोदकामाचा आणखी एक पर्याय आरव्हीएनएलतर्फे हाती घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी उपकरणे पोहोचली आहेत. बडकोटच्या बाजूने ओएनजीसीतर्फे खोदकाम हाती घेण्यात आले आहे. एकाचवेळी असे पाच सहा पर्याय अवलंबिले जात असले तरी पहिले दोन सोडल्यास सगळे वेळकाढू पर्याय आहेत, परंतु इंग्रजीत ‘नो स्टोन अनटर्न्ड’ म्हणतात त्याप्रमाणे कोणताही पर्याय हाताळायचा बाकी ठेवला गेलेला नाही ही ह्या मदतकार्याची विशेषता आहे. कामगारांच्या सुटकेसाठी आणखी काही दिवस लागतील हे आता स्पष्ट झालेले असल्याने, बोगद्यात गेले सोळा दिवस अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य तोवर टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. मदतकार्यांतर्गत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेलेल्या सहा इंची पाईपमधून घालण्यात आलेल्या एंडोस्कोपीक कॅमेऱ्यातून ह्या कामगारांचे प्रत्यक्ष दर्शन बाहेरच्या जगाला झाले होते. त्याच पाईपमधून त्यांना रोजचा आहार, औषधे वगैरे दिले जात आहे, त्यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य ठीक जरी असले, तरी मानसिक आरोग्य राखणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी आणि मनोधैर्य टिकवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्याशी सतत बोलता यावे यासाठी बीएसएनएलने एक लँडलाईन उपलब्ध करून दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवरील मदत घेऊन अशा प्रकारे युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले हे मदतकार्य अभूतपूर्व स्वरूपाचे आहे असे आम्ही यापूर्वी म्हटले होते. खरोखरच ह्या मदतकार्याची व्याप्ती फार मोठी आहे, परंतु हातातोंडाशी आलेला घास निघून जावा तसे काही विपरीत घडू नये यासाठी प्रार्थना करणेच मदतपथकांच्या हाती आहे, कारण मुळातच हिमालयाची अस्थिर भूमी, त्यात सध्या उत्तरकाशीच्या त्या परिसरात पावसाचे अनुमान हवामान विभागाने वर्तवलेले आहे. त्यामुळे ह्या मदतकार्यात आणखी अडथळे येऊ शकतात. मुळातच हे मदतकार्य अत्यंत जिकिरीचे आहे, परंतु 41 मानवी प्राण त्यात अडकलेले आहेत हेही विसरून चालणार नाही. हे अडकलेले कामगार वेगवेगळ्या राज्यांतले आहेत. त्यातले पंधराजण झारखंडचे आहेत, आठ उत्तर प्रदेशचे आहेत, प्रत्येकी पाच ओडिशा व बिहारचे, तीन पश्चिम बंगालचे, प्रत्येकी दोन उत्तराखंड आणि आसामचे आणि एक हिमाचल प्रदेशमधील आहे. एका परीने मिनी भारतच तेथे अडकलेला असल्याने हे राष्ट्रीय मदतकार्य ठरले आहे. पंतप्रधान कार्यालयापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सर्व यंत्रणा जातीने मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. पाच राज्यांचा निवडणुकीचा मोसम असल्याने ह्यात राजकीय श्रेय लाटण्याचा हव्यासही दिसून आला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांचे स्वतः मदतकार्यात लुडबूड करणेही सतत दिसले, जे टाळता आले असते, परंतु अशा गोष्टींच्या राजकीय श्रेयाचा हव्यासही भल्याभल्यांना टाळता येत नाही हेच खरे. काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सैन्याधिकाऱ्याच्या आईच्या हातात कॅमेऱ्यासमोर बळजबरीने धनादेश कोंबण्याचा प्रकार नुकताच उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने केला तोही सवंगपणाचा होता. हे कामगार लवकरात लवकर सुखरूप बाहेर यावेत यासाठी अहोरात्र चाललेल्या ह्या प्रयत्नांना लवकरच यश मिळावे आणि त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट व्हावी अशी प्रार्थना करूया!