लक्ष बिहारकडे

0
6

अवघ्या देशाची नजर ज्याकडे लागून राहिली आहे, त्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज एकूण 243 पैकी 121 जागांसाठी मतदान होणार आहे. गेले काही दिवस विविध राजकीय पक्षांच्या मुलुखमैदान तोफा बिहारच्या रणभूमीवर धडाडल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो तर झालाच, शिवाय योगी आदित्यनाथांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक बड्या नेत्यांनी बिहारी मतदारांना साद घातली. दुसऱ्या बाजूने महागठबंधनच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि स्वतः मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी बिहार पिंजून काढले. ह्या सगळ्या धुमश्चक्रीतून बिहारी मतदार आज मतदानाला बाहेर पडणार आहे. गंगेच्या दक्षिण तीरावरील भागामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत महागठबंधनने बाजी मारली होती. 121 पैकी 63 जागा त्यांना मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजप आणि जेडीयूनेही 55 जागा पटकावल्या होत्या. 2022 ची ती निवडणूक अटीतटीची होती आणि दोन्ही गटांनी तुल्यबळ लढत दिली होती. ह्यावेळीही अशीच चुरस ह्या निवडणुकीत आहे, मात्र दोन्ही आघाडींच्या जोडीने प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या रूपाने नवा एक्स फॅक्टर निवडणुकीची समीकरणे उलथीपालथी करायला अवतरला आहे. प्रचाराला ढवळून काढणारे अनेक महत्त्वाचे मुद्दे ह्या निवडणुकीत अवतरले. एकीकडे गेली वीस वर्षे सत्तेत असलेल्या जेडीयू व भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वतीने चाललेली विकासकामे, त्यांना केंद्र सरकारची आजवर लाभत आलेली साथ आणि दुसरीकडे गेल्या वीस वर्षांतील प्रशासकीय बजबजपुरीला आव्हान देत तेजस्वी यादव यांनी नीतिश सरकारपुढे उभे केलेले आव्हान असा हा तगडा सामना आहे. महिलांना दहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात पोहोचवणाऱ्या नीतिश यांच्या जीविका योजनेला शह देण्यासाठी तेजस्वी यांनी आपले सरकार आल्यास घरटी एक सरकारी नोकरी देण्याचा वायदा केलेला आहे. म्हणजे येत्या पाच वर्षांत एक कोटी तीस लाख सरकारी नोकऱ्या ते उपलब्ध करणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मात्र लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांच्या काळातील बिहारची स्थिती जनतेपुढे आणत तुम्हाला जंगलराज हवे आहे की मंगलराज असा सवाल मतदारांना केला आहे. लालू, राबडी, तेजस्वी हे सगळे राष्ट्रीय जनता दलाचे नेते सध्या जामीनावर बाहेर आहेत ह्याची आठवणही जगत्प्रकाश नड्डा यांनी मतदारांना नुकतीच करून दिली. मात्र, तेजस्वी आपल्या नव्या, तरुण प्रतिमेच्या आधारे मतदारांना नवा विश्वास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना राहुल गांधींची साथ असली, तरी खरी प्रचारमोहीम तेजस्वीच राबवत आले आहेत. नाही म्हणायला राहुल यांनी नुकतीच व्हीआयपी ह्या घटक पक्षाचे नेते मुकेश सैनी यांच्या प्रचारार्थ मल्ला समाजाला साद घालण्यासाठी पाण्यात वगैरे उडी घेतली. परंतु त्यांच्या त्या उडीला मिथिलांचलमधील निषाद आणि मल्लाह समाज किती साथ देतो हे हा निकाल सांगणार आहे. राहुल गांधी यांनी वोटचोरीसारखा मुद्दा लावून धरीत निकालाआधीच आपल्या बाजूला सहानुभूती मिळवण्यासाठी टेकू लावून ठेवलेला दिसतो. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक महत्त्वाच्या लढती होणार आहेत. स्वतः तेजस्वी यादव यांचा फैसला राघोपूरमध्ये होणार आहे. भाजपचे सतीशकुमार यांच्याशी त्यांची थेट लढत आहे. त्यांच्याशी न पटणारे त्यांचे बंधू तेजप्रताप हे स्वतःच्या जेजेडी ह्या पाच प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या वतीने महुआतून निवडणुकीला उभे आहेत. तेथे त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय जनता दलालाच उमेदवार उभा करावा लागला आहे. विद्यमान सरकारमधील उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूरमध्ये उभे आहेत. मोकामामध्ये जेडीयूचा बाहुबली नेता अनंतसिंग याला नुकतीच एका खून प्रकरणात अटक झाली. अलीनगरमध्ये मैथिली ठाकूर ही गोड गळ्याची युवा गायिका भाजपच्या तिकिटावर आपले नशीब आजमावते आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्व प्रकार आजमावून झाले. मतांच्या ध्रुवीकरणापासून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत कशातही कोणी कसर ठेवलेली नाही. मतदारांवर ह्या सगळ्याचा कसा परिणाम होतो, रोजगार, सरकारी नोकरी, महिलांना आर्थिक मदत हे जे फंडे राजकीय पक्षांनी वापरले आहेत, त्यांच्या मतदारांवर किती परिणाम होतो हे हा निकाल सांगणार आहे. नीतिशकुमार आपला गेल्या दोन दशकांचा करिष्मा कायम राखू शकणार का की तेजस्वी त्यांना सत्तेवरून पायउतार करणार ह्याबाबत विलक्षण कुतूहल देशातील मतदारांमध्ये आहे. बिहारची निवडणूक देशातील इतर राज्यांतील निकालांची दिशाही ठरवणार आहे. त्यामुळे ह्या पहिल्या टप्प्यातील मतदार आपला केोणता रंग दाखवतात पाहूया.