रेल्वे मार्ग दुपदरीकरणावेळी घरे, वास्तूंची मोडतोड होणार नाही

0
6

>> मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन; कोळसा वाहतुकीसाठी दुपदरीकरणाचा घाट : विरोधकांचा आरोप

रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण करताना लोकांची निवासी घरे, तसेच वारसा घरे आणि वास्तू यांची मोडतोड केली जाणार नाही, असे आश्वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिले. काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार विजय सरदेसाई व कार्लुस फेरेरा यांनी रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी बोलताना विजय सरदेसाई व कार्लुस फेरेरा या दोघांनीही या रेल्वे रुळाच्या दुपदरीकरणामुळे कुठ्ठाळी, कासावली, आरोसी, वेळसाव आदी भागातील लोकांची घरे, तसेच वारसा घरे व वास्तू यांचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याचा आरोप केला. लोकांच्या घरासमोरील अंगणातून हा दुहेरी रस्ता जात असून, त्याचा या लोकांना तर त्रास होणारच आहे. शिवाय त्यांच्या जुन्या निवासी घरांचे व वारसा वास्तूंचेही त्यामुळे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भीती या द्वयींनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचाही या दुपदरीकरणास विरोध होता, असे विजय सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. पर्रीकर यांनी 22 नोव्हेंबर 2013 रोजी तशी भूमिका घेतली होती याची आठवणही सरदेसाई यांनी करून दिली. भारतीय रेल्वे आणि काही व्यक्तींच्या संगनमताने या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा घाट घातला जात आहे. हा कोळसा कर्नाटकात जाणार आहे. त्यामुळे हे दुपदरीकरणही कर्नाटकातच केले जावे, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली.

ज्या लोकांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित कराव्या लागणार आहेत, त्या जमिनीचा अद्याप सर्व्हेच करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी कार्लुस फेरेरा यांनी केला. या प्रकल्पासाठी ज्या 25 गावांची जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्या जमिनीचे सर्वे क्रमांक व त्या जमिनीचे मालक कोण आहेत ते तपशील मिळवण्यासाठी सर्व्हे केला जाणार आहे काय असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला. त्यावर मंत्री बाबूश मोन्सेरात हे म्हणाले की, ते काम केले जाणार असून त्यासंबंधीची अधिसूचना 25 मे 2023 रोजी काढण्यात आली आहे. 2 शहरे व 27 गावातील ज्या लोकांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार आहे. त्यांच्या जमिनीसंबंधीच्या मालकी हक्कासंबंधीचे तपशील मिळवण्यात येणार आहेत.

रेल्वेने दुपदरीकरणासाठी आतापर्यंत केलेल्या कामामुळे गटारे तसेच पाणी वाहून जाण्यासाठीच्या अन्य वाटा बुजवल्या गेल्याने परिसरात पाणी साचून राहून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने लोकांचे जे नुकसान झालेले आहे त्याची सरकारला जाणीव आहे का? आणि जर असेल तर अशा लोकांना भरपाई देण्यात आली आहे काय असा प्रश्न कार्लुस फेरेरा व विजय सरदेसाई यांनी केला.

त्यावर उत्तर देताना कुणाकडूनही तशा तक्रारी आल्या नसल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. फक्त मायमोळे येथे रेल्वे रुळाच्या बाजूला पुराचे पाणी साचून राहिले असल्याची एका तक्रार आली होती, असे उत्तर मोन्सेरात यांनी दिले.

दुपदरीकरण रद्द करा : विजय सरदेसाई
या रेल्वे रुळाच्या दुपदरीकरणाचा गोव्याला काहीही फायदा नसून, केवळ कोळसा वाहतुकीसाठी हे दुपदरीकरण केले जात असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. रेल्वेद्वारे कर्नाटकात कोळशाची वाहतूक करता यावी यासाठीच हा सगळा खटाटोप आहे. त्यामुळे हा रेल्वे दुपदरीकरणाचा प्रकल्प रद्द करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.