रेल्वे मार्ग दुपदरीकरणानंतर गोवा-मुंबई प्रवास 5 तासांत

0
4

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा; गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा अखेर शुभारंभ

‘वंदे भारत’ ही देशी बनावटीची अत्याधुनिक जलद रेल्वे कालपासून गोवा ते मुंबई रेल्वे मार्गावर सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून सकाळी 11.10 वाजता हिरवा बावटा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ केला. तसेच त्यांनी भोपाळ येथूनच अन्य 4 रेल्वे मार्गांवर 4 वंदे भारत रेल्वेंचे लोकार्पण केले. मडगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठा दावा केला. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणारी ही रेल्वे मुंबई-गोवा दरम्यानचे अंतर 8 तासांत कापणार आहे. यापुढे कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यानंतर ही रेल्वे 5 तासांत गोव्यातून मुंबईत पोहचेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य विनय तेंडूलकर, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने देशात दळणवळणाच्या क्षेत्रात भरीव क्रांती केली. गोवाही या क्रांतीत मागे राहिलेला नाही. केंद्र सरकारने पत्रादेवी ते पोळेपर्यंत चौपदरी महामार्ग उभारला असून, केवळ पर्वरी व काणकोण येथील काही भाग वगळता तो महामार्ग जवळपास पूर्णत्वाकडे गेला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मोपा विमानतळ सुरू करून 20 राज्यांत थेट हवाई सेवा सुरू झाली आहे. यापुढे विमानसेवा आणखी राज्यात जोडली जाणार आहे. तसेच मुरगाव बंदर प्राधिकरणाद्वारेही पर्यटकांना जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मडगाव रेल्वे स्थानक हे हे गोव्याचे प्रवेश द्वार असून, दक्षिणेपासून पश्चिमेकडे जाणाऱ्या गाड्या येथे थांबतात. या रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाची मागणी आमदार दिगंबर कामत यांनी करताच त्यांनी ती मान्य करण्यात आली. त्यात विमानतळाप्रमाणे पर्यटकांना या रेल्वे स्थानकावर सुविधा पुरवाव्यात अशी त्यांची मागणी होती. यावर भाष्य करताना, मडगाव पंचतारांकित रेल्वे स्थानक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याविषयी बोललो आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोपा विमानतळापर्यंत रेल्वेमार्ग जोडण्याची योजना असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वंदे भारत रेल्वेमुळे गोव्याला पर्यटनाला चालना मिळेल. गोवा जागतिक नकाशावर आहे. आता या रेल्वेमुळे पर्यटकांना आरामदायी प्रवासाची संधी मिळेल, असे रोहन खंवटे यांनी सांगितले.

पुढील 3 वर्षांत 400 वंदे भारत रेल्वे : श्रीपाद नाईक
वंदे भारत ही भारतीय बनावटीची रेल्वे आहे. देशात एकूण 23 वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. पुढील 3 वर्षात देशांत 400 नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची आश्वासने दिली होती, ती प्रत्यक्षात आणली, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.