रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून उपनिरीक्षकाची पत्नी जखमी

0
8

>> गिरी बार्देश येथील प्रकार

म्हापसा येथे उपनिरीक्षक असलेल्या पतीचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पाहण्याची उत्सुकता असलेल्या पत्नीच्या हातात असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून पत्नी जखमी झाल्याची घटना गिरी बार्देश येथे घडली. भारतीय पोलीस राखीव दलात (आयआरबी) सेवेत असलेल्या उपनिरीक्षकाची पत्नी गौरी धनू बोगाटी (24) ही रिव्हॉल्व्हर पाहत असताना त्यातून अचानक सुटलेल्या गोळीतून ती गंभीर जखमी झाली. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
रिव्हॉल्व्हर पाहत असताना त्यातून अचानक गोळी सुटून ती गौरी हिच्या डाव्या हाताच्या मनगटातून आरपार जाऊन डाव्या मांडीत घुसली. यामुळे तिचे मनगट व मांडीचे हाड मोडले आहे. तिला तातडीने उपचारासाठी सुरुवातीला उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात व तेथून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात आले. निरीक्षक सीताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे.