राहुल गांधींची खासदारकी रद्द

0
9

>> लोकसभा अध्यक्षांची कारवाई

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने काल याबाबतचा आदेश जारी केला. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना गुरुवारी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचे संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.


‘शूर्पणखा’वरून आता काँग्रेस पंतप्रधानांना घेरणार
या प्रकरणानंतर आता काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यसभेतील एका भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेणुका चौधरी यांना अप्रत्यक्षपणे ‘शूर्पणखा’ (राक्षसी – रावणाची बहीण) म्हणून संबोधले होते. आता हाच मुद्दा पकडून काँग्रेस मोदींना घेरणार आहे.