- मीना समुद्र
रामनवरात्रात रामभजन, कीर्तन, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत, कथा, संकीर्तन अशा स्वरूपात हा चैतन्यमय उत्सव आपण साजरा करत आहोत त्याचा आज कळसाध्याय.
आयुष्यात राम आणायचा असेल, आनंद-समाधान-सुखशांती यांनी जीवन आश्वस्त आणि सुंदर बनवायचे असेल तर राम गावा राम घ्यावा आणि तो जीवीचा विसावा शोधावा.
राम आणि कृष्ण गाथा हे भारतीय पुण्यशील संस्कृतीचे सारसंचित आहे. राम आणि कृष्ण यांच्या लीला वैचित्र्य आणि वैविध्यपूर्ण असल्या आणि स्वभाव वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचा स्थायिभाव एकच आहे- खलनिर्दालन करून मानव, प्राणिमात्रांना अभय देणे आणि आपल्या धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणे. ईश्वराने धारण केलेले हे विलक्षण मानवी अवतार आपण देवत्वाला पोचविले आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या गाथा रामायण आणि महाभारत या दोन महान ग्रंथांत ग्रथित करून त्यांची मोठ्या श्रद्धा-भक्तीपूर्वक पारायणे होतात. बालपणापासूनच त्यांची चरित्रकथा ऐकतच आपण मोठे होतो. त्यांचे आदर्श सतत डोळ्यापुढे राहावेत असा प्रयत्न आपोआप घडत असतो. त्यांचे जन्मसोहळे घरोघर साजरे केले जातात. मोठ्या आनंदोल्हासात त्यांच्या चरित्रगाथा गायिल्या जातात. त्यांच्या कथा ऐकविल्या जातात. कितीही वेळा ऐकल्या, वाचल्या तरी या कथांची मोहिनी मनावरून उतरत नाही. त्याची अमृतासमान गोडी चाखण्यात मन गुंगून गुंतून जाते. म्हणून तर त्यांची अवतारसमाप्ती झालेली वाचूनही ‘हरे राम’, ‘हरे कृष्ण’ यांची जोडी अजरामर होऊन गेली आहे.
रामाबद्दल अफाट प्रेम आणि कौतुक जनमानसात आहे; त्याला श्रद्धा, भक्ती आणि अतूट विश्वासाचीही जोड आहे. त्यामुळेच रोजच्या व्यवहारातही कितीदा आणि किती प्रकारे रामनाम ओठी येते त्याची गणतीच करू शकत नाही. सकाळचा प्रहर म्हणजे रामप्रहर असतो. रामप्रहरी रामगाथा ओठावर येते. कुणाची गाठ पडली की ‘रामराम’ घातला जातो किंवा ‘जय रामजी की’, ‘जय श्रीराम’ म्हटले जाते. दोन्हीकडून ‘रामराम’ म्हणून स्वागत, भेटीचा आनंद व्यक्त केला जातो. अगदी सुयोग्य असा उपाय म्हणजे ‘रामबाण’ उपाय/औषध. ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे’ असा जप केला जातो. भजन-कीर्तनाचा शेवटही नाम घेऊनच केला जातो. माझ्या आईसारखेच कित्येकजण ‘श्रीराम जयराम जय जय राम’ असा जप लिहितात. 13 हा आकडा इतरत्र अशुभ मानत असले तरी हा मंत्र मात्र 13 अक्षरी असूनही मनाला अतिशय सांत्वन देणारा आहे. ‘राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा’ असे जिभेला, वाणीला आराम देणारे हे नाव आहे. एखादी गोष्ट निरर्थक वाटली तर ‘त्यात काही राम नाही’ असे आपण म्हणतो. थकलो तरी कुठेतरी टेकल्यावर ‘हरे राम! दमलो बुवा!’ असे उद्गार सहजी आपल्या तोंडी येतात. बाळाच्या बारशाला रामाचाच पाळणा म्हटला जातो. काम असफल झालं तरी ‘हे राम’ म्हणून कपाळावर हात मारला जातो. ‘आराम हराम है’ म्हणताना दोन्ही शब्दांत राम येतो ते कर्मरत राहण्यासाठी आणि तसे न झाल्यास ती गोष्ट (आळस) व्यर्थ आहे हे दाखवण्यासाठीही! ‘आयुष्यात राम राहिला नाही’ असे काही मंडळी निराशेने म्हणतात तेव्हा राम म्हणजे आनंद, राम म्हणजे चैतन्य, राम म्हणजे आशा, राम म्हणजे उल्हास, उल्लास, धैर्य, संयम, शौर्य या गुणांचा लोप झालेला किंवा ऱ्हास झालेला जाणवतो. आयुष्याच्या शेवटी रामनामच मुखी यावे अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या तोंडी शेवटच्या क्षणी रामनाम आले तर ती व्यक्ती पुण्यवान समजली जाते; तिचे स्वर्गपद निश्चित असे मानले जाते. मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेच्या वेळी ‘राम नाम सत्य हैं’ हा घोष केला जातो.
म. गांधींच्या तोंडून शेवटच्या क्षणी ‘हे राम’ असेच उद्गार बाहेर पडले. ‘राम’ हे मंत्राक्षर आहे. अतिशय सोपे, सुटसुटीत, रम्य, आराम देणारे असे हे नाव आहे. ‘रामा, रघुनंदना’ अशी शबरीसारखी आर्त हाक त्याला खरोखरच ऐकू येते. तोच त्राता आणि उद्धारकर्ता असतो. सगळं रामायण ऐकलं तरी ‘रामाची सीता कोण?’ हा प्रश्न हास्यास्पद, निरर्थक आणि अडाणीपणाची परिसीमा दाखवतो. राम हा मर्यादापुरुषोत्तम आहे. तो एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असा आदर्श पुुरुष आहे. आपल्या मनातली भीतीची भावना रामनामाने दूर होते. म्हणून अंधारातून, अडचणीतून, संकटातून वाट काढताना आपल्या तोंडी रामनाम येते. दुष्टविमोचन आणि संकटनाशन राम अत्यंत शांत, संयमी, धीरवीर पुरुष आहे. म्हणून त्याच्या श्यामल शांतमूर्तीचे, लोकरंजनाचे कर्तव्यकर्म करीत राहणाऱ्या रघुकुलतिलकाचे नाम सदैव ओठी यावे याबाबत प्रत्यक्ष शिवशंकर पार्वतीला सांगतात-
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने॥
(बुध कौशिक विरचित रामरक्षास्तोत्र)
असे सुंदर, कल्याणकारी रामनाम सतत मुखी यावे म्हणून आपल्या मुलांची नावे राम, रामचंद्र, सीताराम, शिवराम, रामभद्र, राजाराम, रामदास, जयराम किंवा सीतापती, सीताकांत, जानकीनाथ अशी ठेवली जातात.
समर्थ रामदासस्वामी हे श्रीरामाचे परमभक्त, सेवक होते. हनुमान किंवा मारुतीस्तोत्र तर रामनामाशिवाय पूर्ण होत नाही आणि ‘रामचरितमानस’ लिहिणाऱ्या आणि हुबेहूब चित्रमय वर्णन करणाऱ्या तुलसीदासांनी तर कोणतेही नाम घेतले तरी शेवटी रामनामच उरते हे दाखविणारा एक सूत्रबद्ध श्लोकच लिहिला. ‘तुम्हाला राम दिसला का?’ असे विचारणाऱ्या रामभक्तांना तुलसीदासांनी दिलेले उत्तर त्यांची गणितातली परिणतप्रज्ञाही दाखविते. तो श्लोक असा-
नाम चतुर्गुण पंचतत्त्व मिलन तासा द्विगुण प्रमाण
तुलसी अष्टसो भागे अन्तमें रामहि राम/(रामहि नाम)
उदा. कोणतेही नाव, आडनाव घ्या. समजा तुलसी ही 3 अक्षरे, त्याला 4 ने गुणायचे, त्यात 5 मिळवायचे (3 गुणिले 4 + 5) गुणिले 2 = 34 भागिले 8 = 4. उरले 2), त्या अक्षरांची दुप्पट करून त्याला 8 ने भागायचे. शेवटी 2 अक्षरे उरतात ती ‘राम’ होय. 5, 6, 7, 8 कितीही अक्षरे नाव, आडनाव घेतले तरी उरतात 2 अक्षरे म्हणजे ‘राम.’
चतुर्गुण- चार दिशा, पंचतत्त्व- पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. द्विगुण- धरणी + आकाश, आठ दिशा म्हणजे सर्वांगीण ज्ञान असा अर्थ धरल्यास एकूण रामनाम ब्रह्मांडव्यापी आणि त्यातून शिल्लक उरणारे आहे.
अशा या रामाचे नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत म्हणजे रामजन्मापर्यंत चालू आहे. रामाची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की वाल्मिकींनंतर 300 रामायणे रचली गेली. यातील वाल्मिकीकृत ‘नामरामायण’ हे सारभूत 10 मिनिटांचे रामायण रामकृष्ण मठात दर रविवारी आणि एकादशीला म्हटले जाते. त्याची चाल विवेकानंदांनी लावलेली आहे हे वाचून आश्चर्य वाटते. आणि ती परंपरा शिष्यांनी अबाधित ठेवल्याचे कौतुक आणि समाधानही वाटते. रामपथ आचरल्याने रामराज्य म्हणजे सुराज्य स्थापित होईल हा विश्वास मनात उत्पन्न होतो.
शरयूनदीतीरी मनूनिर्मित अशा अयोध्यानगरीत राजा दशरथाच्या राजप्रासादात चैत्र शुद्ध नवमीला रामजन्म झाला. आज हीच तिथी आहे. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ म्हणत वासंतिक वाऱ्यात, सुगंधी पुष्पांनी नटलेल्या- सजलेल्या- धजलेल्या अवतीभवतीच्या सुगंधी सुंदर वातावरणात घरोघरी, दारोदारी, मंदिरी हा जन्मसोहळा साजरा करत आहोत. रामनवरात्रात रामभजन, कीर्तन, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत, कथा, संकीर्तन अशा स्वरूपात हा चैतन्यमय उत्सव आपण साजरा करत आहोत त्याचा आज कळसाध्याय.
आयुष्यात राम आणायचा असेल, आनंद-समाधान-सुखशांती यांनी जीवन आश्वस्त आणि सुंदर बनवायचे असेल तर राम गावा राम घ्यावा आणि तो जीवीचा विसावा शोधावा.