- – डॉ. मनाली महेश पवार
(सांतइनेज, पणजी)
आज प्रत्येकजण स्पर्धा, नाव, कीर्ती, पैसा इत्यादींच्या मागे धावताना मानसिक शांतता गमावून बसला आहे व झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेत आहे. निद्रानाश हा दिसायला मोठा गंभीर आजार वाटत नसला तरी भविष्यात धोकादायक ठरू शकतो. तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध झालेलेच बरे…
झोपेची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही पाहतात व झोप येत नाही म्हणून तक्रार करतात. सध्या रात्रही लहान असल्याने रात्रीत झोप पूर्ण होत नाही. झोपेची समस्या फक्त शहरापुरती आता मर्यादित राहिली नाही, ती गावोगावी पोचलेली आहे.
विभक्त कुटुंबे, स्पर्धा, ताणतणाव तुमच्याही नकळत कधी गावात सर्वत्र पोचले समजलेच नाही. त्याबरोबर ‘निद्रानाश’ ही समस्याही सर्वत्र पसरली. आज प्रत्येकजण स्पर्धा, नाव, कीर्ती, पैसा इत्यादींच्या मागे धावताना मानसिक शांतता गमावून बसला आहे व झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेत आहे. निद्रानाश हा दिसायला मोठा गंभीर आजार वाटत नसला तरी भविष्यात धोकादायक ठरू शकतो. तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध झालेलेच बरे…
झोप ही स्वाभाविकपणे यायला हवी. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे-
यदा तु मनसि क्लान्ते कर्मात्मनः क्लमान्विता|
विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिति मानवः॥
- मन व शरीर हे जेव्हा थकते त्यावेळी इंद्रिये शिथिल होतात आणि आपले कार्य करणे बंद करतात तेव्हा झोप लागते. पण मन व शरीर जर अस्वस्थ असेल तर झोप तरी कशी लागणार? जेव्हा इंद्रियांचा मनाशी असणारा संपर्क तुटतो तेव्हा झोप येते.
आरोग्यकारक झोप
रात्रीच्या वेळी स्वाभाविकपणे, निसर्गतः येणारी झोप ही नैसर्गिक झोप आहे व ती आरोग्यकारक असते. ज्ञानग्रहणशक्तीवर आवरण येणे हे निद्रा येण्यासाठी आवश्यक असते. रात्रीच्या काळी स्वभावानुसार सृष्टीत तमोगुणाचे प्राबल्य उत्पन्न होते व त्याचा परिणाम म्हणून रात्री स्वाभाविकपणे सर्वच सजीवसृष्टी झोपेच्या अधीन होते.
अशी ही आरोग्यकारक झोप आता कुठेतरी लुप्त होताना दिसत आहे. खरं तर आहार, निद्रा व ब्रह्मचर्य हे जीवनाचे तीन मूलभूत आधार किंवा उपस्तंभ आहेत. म्हणजेच निद्रा (झोप) याला किती महत्त्व आहे हे लक्षात आलेच असेल. पण आपण जरा जास्तच बेफिकिर झालो आहोत व निद्रानाशाला बळी पडत आहोत.
निद्रानाशाची कारणे…
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे दूषित वातदोष, दूषित पित्तदोष, मानसिक अस्वस्थता, शरीरातील धातूंचा क्षय आणि अग्निघात या कारणांचा स्पष्टपणे समावेश आहे.
- वातदोष संपूर्ण शरीराचे नियंत्रण करतो; पण जेव्हा हाच दोष बिघडतो तेव्हा झोप येत नाही. विविध प्रकारच्या वातव्याधींमध्ये उदा. संधिवात, कंबरदुखी इत्यादी वेदना असल्यास झोप येत नाही.
- पित्त दोषाच्या विकृतीमुळे अपचनासारखे आजार असल्यासही झोप येत नाही.
- शरीरातील रस, रक्तादी सात धातूंचे पोषण व्यवस्थित न झाल्यासही निद्रानाश होतो.
- कोणत्याही स्वरुपाचा शारीरिक आघात हेदेखील निद्रानाशाचे एक कारण आहे.
- झोप न येण्याचे महत्त्वाचे कारण सध्याच्या परिस्थितीत ते म्हणजे मानसिक अस्वस्थता आहे. मनामध्ये विचारांची श्रृंखला चालूच असते. क्रोध, सूड या भावना वाढल्यामुळे, सगळ्या स्पर्धांमुळे सारखे मनात काही ना काही घोळत असते. त्यामुळे ताण-तणाव वाढतो व परिणामी झोप येत नाही.
अनिद्रेमुळे उत्पन्न होणारी लक्षणे
आदल्या दिवशी झोप नीट लागली नाही तर दुसरा दिवस कोणत्या परिस्थितीत जाईल हे सांगता येणार नाही. रात्री जागरण जरी झाले असले तरी दुसर्या दिवशी कामाला जाण्यासाठी म्हणा किंवा शाळेत जाण्यासाठी म्हणा- इत्यादी अट्टहासाने उठावेच लागते व डोळ्यांत झोप तशीच राहते. मग…
- डोके जड होणे.
- सारख्या जांभया येणे.
- डोळ्यांना खाज येणे.
- शरीर जड होणे.
- ग्लानी येणे, चक्कर येणे.
- मलावरोध
अशा विविध तक्रारी निर्माण होतात.
काही आजारांत, उदा. ताप आला असता किंवा उन्हाळ्यात होणारा निद्रानाश ही कारणे प्रासंगिक असतात व छोट्याशा उपायांनी झोप येते. पण झोप न येण्याचे कारण जेव्हा मानसिक असते, तेव्हा स्वतः मेडिकलमधून आणून गोळ्या घेऊ नये. वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे हे जाणावे.
निद्रानाशावरील उपचार
ज्यांची झोपेची तक्रार आहे त्यांनी प्रथम कोणत्या कारणामुळे आपल्याला झोप येत नाही हे समजून घ्यावे व ते कारण प्रथम दूर करावे.
- झोपायच्या आधी साधारण दोन तास मोबाईल हातात घेऊ नये, हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार आहे. हे ज्याला जमले त्याला ‘अनिद्रा’ हा त्रास भेडसावणार नाही. ही सध्या काळाची गरज आहे. नाहीतर निद्रानाश गंभीर स्वरूप प्राप्त करू शकतो.
- आयुर्वेदशास्त्राप्रमाणे निद्रानाशासाठी अभ्यंग, मूर्ध्नितैल, गात्र उद्वर्तन, मर्दन, संवाहन यांसारखे उपचार करावेत.
- अभ्यंग म्हणजे शिरोभ्यंग व पादाभ्यंग हे अधिक उपयुक्त ठरतात. झोपण्यापूर्वी रोज डोक्याला तेल लावावे.
तेलामध्ये ब्राह्मी तेल जास्त उपयुक्त ठरते. ब्राह्मी म्हणजे आपल्याकडे इथे मण्डुकपर्णी (कारीवनो) सर्वत्र उपलब्ध आहे. त्या पानांचा एक वाटी रस काढावा. त्यात दोन वाट्या तिळाचे किंवा खोबर्याचे तेल घालावे व बारीक अग्नीवर पाणी उडून फक्त तेल शिल्लक राहीपर्यंत शिजू द्यावे. थंड झाल्यावर हे तेल बाटलीत भरून ठेवावे व रोज रात्री डोक्याला लावून मालिश करावे. तसेच जीर्ण स्वरुपात किंवा खूप दिवस झोपेचा त्रास असल्यास हेच तेल पायाला चोळावे व तळपाय काश्याच्या वाटीने घासावेत.
- ब्राह्मीच्या तेलांबरोबर जायफळाचे तेलही झोप येण्यासाठी मदत करते. हे तेल कपाळाला, कानशिलाला, बेंबीमध्ये, डोक्याला, तळपायाला चोळावे किंवा एक-एक थेंब नाकपुडीत घासल्यासही फायदा होतो.
- निद्रानाश जेव्हा गंभीर स्वरुपाचा असतो, त्यावेळी केवळ शिरोभ्यंग करण्याऐवजी शिरोबस्तीचा उपक्रम करावा. शिरोभागी वक्रधारा- विशेषतः जटामांसी, सर्पगंधा यांनी सिद्ध केलेल्या ताकाने धारा देणे उपयुक्त ठरते.
- तेलाच्या साहाय्याने ‘कर्णपूरण’ (कानांमध्ये तेल घालणे) करणे याचाही चांगला उपयोग होतो.
- अशा रुग्णांना मधुर, स्निग्ध, कफकर असा आहार द्यावा.
- निरसे दूध किंवा म्हशीचे गार व साखर घालून दूध रात्री झोपताना प्यावे.
- खसखसाची खीर झोप येण्यासाठी उपयुक्त ठरते.
- जायफळयुक्त अशी बासुंदी सेवन केल्यानेही झोप लागते.
- शय्या ही मृदू, सुखकर, विस्तीर्ण हवी.
- मधुर संगीत व मनोकुल वातावरणामुळेही झोप येते.
- जेव्हा बेचैनी जास्त असते तेव्हा प्राणायाम, ध्यानासारखा योगाभ्यास करावा.
- झोपण्यापूर्वी पंधरा मिनिटे दीर्घ श्वसन करावे.
- नामस्मरण, जप, ध्यानामुळेही झोप येण्यास मदत होते.
- जेव्हा निद्रानाश अधिक प्रमाणात असतो, त्याचवेळी औषधांचा उपयोग करावा; अन्यथा औषधांचा उपयोग करणे योग्य नव्हे. औषधे ही वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावी. सर्पगंधा, जटामांसी, धमासा आदी द्रव्ये ही मनाची व्याकुळता कमी करून झोप आणण्यास मदत करतात.
ज्यांची झोप रात्री पूर्ण होत नाही, ज्यांना रात्रीची कामे (ीहळषीं) असतात- कलाकार मंडळी, गायन-वादन करणारे, नाट्यकर्मी त्यांनी मात्र दिवसा झोपावे. दिवसा झोपू नये व रात्री जागरण करू नये, असा सर्वसामान्य नियम सांगितला जातो हे खरे, पण त्यांना त्यांच्या कामाच्या स्वरुपामुळे ते शक्य होत नाही. रात्री जागरणाने किंवा दिवसा झोपल्याने दोष उत्पन्न होत नाहीत. अशा व्यक्तींनी रात्री जेवढा वेळ जागरण झाले असेल त्याच्या अर्धावेळ इतकी झोप व तीसुद्धा दुसर्या दिवशी अन्नग्रहणापूर्वी घ्यावी. भोजनानंतर झोप घेऊ नये.
झोप ही योग्य असल्यास त्यामुळे सुख, पुष्टी, बल, वृषता, ज्ञान व चांगल्या जीवनाची प्राप्ती होते. अर्थातच अनिद्रेमुळे तत्तत् विरोधी विकृती निर्माण होतात.
योग्य निद्रा न येणार्या व्यक्तींमध्ये अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक विकृती उत्पन्न होतात. त्यामुळे झोप येत नसल्यास वैद्याचा सल्ला नक्की घ्यावा.