राज्यात 1 जूनपासून मासेमारी बंदी

0
2

>> 31 जुलैपर्यंत बंदी राहणार ः मोंतेरो यांची माहिती

राज्यात 1 जूनपासून मच्छीमारी बंदी लागू होणार असून ती 31 जुलैपर्यंत राहणार आहे, अशी माहिती मच्छीमारी खात्याच्या संचालक शर्मिला मोंतेरो यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. या मच्छीमारी बंदीसाठीची अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली असल्याची माहिती त्यांनी काल दिली. वरील बंदीचा काल संपल्यानंतर 1 ऑगस्टपासून राज्यात मच्छीमारी मोसम सुरू होणार असल्याचे मोंतेरो यांनी स्पष्ट केले.
31 मे रोजी रात्री राज्यातील सर्व मच्छीमारी जेटींना मच्छीमारी खाते सील ठोकणार असून जेटीवरील डिझेल पंपही बंद करण्यात येणार असल्याची माहिती मोंतेरो यांनी दिली.

बंदीच्या काळात केवळ 10 अश्वशक्तीच्या मोटर असलेल्या छोट्या मच्छीमारी बोटींना तेवढी मच्छीमारी करता येणार असल्याचे त्या म्हणाल्या. अशा सुमारे 2 हजार छोट्या बोटी राज्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, राज्यात नोंदणीकृत 1100 मच्छीमारी ट्रॉलर्स आहेत. पण प्रत्यक्षात 800 ट्रॉलर्सच राज्यात मच्छीमारी करीत असतात. ह्या सर्व ट्रॉलर्सना वरील मच्छीमारी काळात मच्छीमारीसाठी समुद्रात उतरता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

या बंदीच्या काळात लोकांना छोट्या बोटींद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीतून मिळणारी मासळी व रापणीच्या मासळीवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे 1 जून ते 31 जुलैपर्यंत राज्यात मासळीचा दुष्काळ राहणार आहे.
दरम्यान, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, उशिराने दाखल होणारा पाऊस 19 मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, अंदमान निकोबार बेटांवर आणि अंदमानच्या समुद्रात दाखल झाला.

कर्नाटक, राजस्थानासह
मध्यप्रदेशात जोरदार पाऊस

नवी दिल्ली : कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानच्या अनेक भागात काल रविवारी जोरदार पाऊस झाला. ओडिशाच्या भद्रकमध्ये जोरदार वादळामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड वायर तुटून वंदे भारत रेल्वेवर पडल्या. बेंगळुरू, कर्नाटकात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. अंडरपासमध्ये भरलेल्या पाण्यात एक कार अडकली. त्यात आंध्र प्रदेशातील एक कुटुंब होते. लोकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली, मात्र 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.