>> मुख्यमंत्र्यांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्णतेचे निर्देश
राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेला गती देण्याचा निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी अधिकाऱ्यांना काल दिले.
राज्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात काल उच्चस्तरीय बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पशुवैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यासाठी काटेकोरपणे वेळापत्रकांचे पालन करण्याचे आणि भारत सरकारशी प्रभावी समन्वय राखण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत जमीन हस्तांतरण, पायाभूत सुविधा विकास, शैक्षणिक आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती, प्रयोगशाळांची स्थापना आणि पशुधन गोशाळेची स्थापना यासह महत्त्वाच्या योजनांना अंतिम स्वरूप देण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पशुवैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परराज्यात जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.