राज्यातील उद्योग सुरू करण्यास २० पासून मान्यता

0
147

>> मुख्यमंत्री ः कोविड १९ मार्गदर्शक सूचनांचे पालन कंपन्यांना बंधनकारक

राज्यातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या येत्या सोमवार २० एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात मान्यता दिली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीतील आयडीसीच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून उद्योगांना मान्यता दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या कोविड १९  मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे कंपन्यांना बंधनकारक आहे. तसेच उद्योगांना बाहेरू कामगार आणायला मान्यता दिली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राज्यात येत्या २० एप्रिलपासून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सर्वेक्षणामध्ये २५ ते ३० हजार नागरिकांना श्‍वसन समस्या असल्याचे आढळून आले आहे. एक हजार थर्मल गन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्या सगळ्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान योजनेखाली दारिद्य्र रेषेखालील लोकांना तांदूळ वितरणाबरोबर आता डाळ वाटप केले जात आहे. एपीएल रेशनकार्ड धारकांना तांदूळ देण्यावर विचारविनिमय केला जात आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी

थुंकण्यावर बंदी घालणार

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. तंबाखू, गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची अनेकांना सवय आहे. एका ठिकाणी चार पेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. प्रवासी व इतर बसगाड्यांमध्ये केवळ ३० ते ४० टक्के प्रवासी घेण्यास मान्यता दिली जाणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी कदंब आणि खासगी बसचा वापर केला जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

खलाशांना आणण्याच्या

प्रक्रियेला गती

विदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळालेली आहे. केंद्रीय जहाजोद्योगमंत्री व इतर अधिकार्‍यांशी पुन्हा एकदा चर्चा करून खलाशांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती जाणून घेतली. साधारण ६ ते ७ हजार गोमंतकीय खलाशांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गोमंतकीय खलाशांना क्वारंटाईन करून ठेवण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

म्हापसा अर्बनबाबत

वित्त सचिवांकडून अभ्यास

म्हापसा अर्बऩ बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा राज्याच्या  वित्त सचिवांकडून अभ्यास केला जात आहे. या बँकेतील गुंतवणूकदारांना जास्त त्रास होऊ नये म्हणून सरकारकडून आवश्यक प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कोविडवर सरपंचांशी

संवाद, आढावा

राज्यातील सर्व १९१ ग्रामपंचायतीच्या सरपंचासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून कोविड उपाययोजना व मदत कार्याचा आढावा घेतला. राज्यातील १६५ सरपंचांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामपंचायतीना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी २५ हजार रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती आर्थिक सक्षम आहेत त्यांना आणखी २५ हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जास्त सावधगिरी बागळण्याची गरज आहे. तपासणी नाक्यावर कडक तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू घेऊन येणार्‍या मालवाहू वाहनांचे ट्रेकिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परराज्यातून आलेली वाहने राज्यात जास्त काळ ठेवून घेतली जाणार नाहीत. परराज्यातून कुणी व्यक्ती राज्यात आल्यास त्याची माहिती त्वरित पोलीस किंवा सरकारी अधिकार्‍यांना द्यावी. परराज्यातून आलेल्या लोकांना यापुढे होम क्वारंटाईन केले जाणार नाही. तर सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

शिरगांव येथील श्री देवी लईराईच्या धोंडांनी आपले उपवास व्रत घरीच करावे. घराबाहेर मंडप घालून एकत्र राहून उपवास करू नये. देवस्थान समितीने यंदाचा जत्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

राज्यात मुख्यमंत्री, मंत्र्यांना नवीन वाहने खरेदीसाठी मान्यता दिली जाणार नाही. गाड्या खरेदीसंबंधी सुधारित मार्गदर्शक सूचना अधिसूचित करणे हा सरकारी कामकाजाचा भाग आहे. आपण नवीन कारगाडी घेतलेली नाही. तसेच, नवीन कारगाडी घेण्याचा प्रस्ताव नाही. माजी मुख्यमंत्री वापरत असलेल्या कारगाडीचा वापर करीत आहे, असेही सावंत यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.