राजकारणातला कोहिनूर

0
5

एक सुसंस्कृत राजकारणी अशी आपली ओळख शेवटपर्यंत कायम ठेवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती श्री. मनोहर जोशी यांचे काल निधन झाले. त्यांची संपूर्ण कारकीर्द जशी विस्मयकारक आहे, तशीच ती त्यामागील त्यांच्या अत्यंत खडतर परिश्रमांचे आणि जिद्दीचे दर्शन घडवणारीही आहे. रायगड जिल्ह्यातल्या नांदवी ह्या छोट्याशा गावात वाढलेला हा गरीब भिक्षुकाचा मुलगा पुढील शिक्षणासाठी मुंबईत बहिणीकडे आला. तेथे सहस्रबुद्धे क्लासेसमध्ये शिपायाचे काम करता करता त्याने पुढील शिक्षण घेतले, काही काळ कारकुनी आणि अध्यापकी केली, परंतु त्यात मन न रमल्याने स्वतःचे कोहिनूर क्लासेस काढले, तंत्रशिक्षणाकडे मुले वळत नाहीत म्हणून कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट काढली, योगायोगाने बाळासाहेब ठाकरे नावाच्या मुंबईत तेव्हा घोंगावणाऱ्या वादळाच्या संपर्कात आले, शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळाचे साक्षीदार झाले आणि बाळासाहेबांच्या परिसस्पर्शाने मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार, लोकसभेचे सभापती अशी राजकारणातील सर्व महत्त्वाची पदे क्रमाक्रमाने चढत गेले. ही सगळी कारकीर्द केवळ मानसन्मानाचीच होती असे नव्हे. अधेमध्ये अपमानही वाट्याला आले. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना – भाजप युतीचा पहिला मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना दिला, त्यांनीच एक दिवस पुण्यात जोशींच्या जावयाच्या भूखंडाचे प्रकरण उपटले तेव्हा ‘राज्यपालांकडे राजीनामा देऊनच मला भेटायला या’ असा निरोप पाठवून त्या पदावरून खालीही उतरवले. परंतु बाळासाहेब आणि शिवसेना ह्यांवरील अढळ निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही म्हणून ते पुढील काळातही त्याहून उच्च पदांवर जाऊन पोहोचले. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर स्मारकाच्या वादात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातूनही त्यांना अपमानास्पदरीत्या परत पाठवण्याचा प्रकार घडला होता, परंतु हे सगळे अपमान गिळून मनोहर जोशी सतत कार्यरत राहिले. आपली सुसंस्कृत नेत्याची प्रतिमा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. बालपणी सव्वा रुपयासाठी सत्यनारायणाची पूजा सांगावी लागणाऱ्या ह्या मुलाने आपल्या जिद्दीच्या जोरावर अक्षरशः शून्यातून विश्व साकारले. ते केवळ राजकारणी नव्हते. प्रथमतः ते एक सफल उद्योजक होते. उद्यमशीलता हे मनोहर जोशी यांचे ब्रीद होते. आयुष्यात त्यांनी स्वतःही ती सतत जोपासली म्हणूनच यशाची एकेक पायरी ते चढत जाऊ शकले. बाळासाहेबांच्या पुण्यातील सभेचे ध्वनिमुद्रण करण्यास जाणाऱ्या श्रीकांत ठाकऱ्यांना वाहनाची जरूरी भासली म्हणून मनोहर जोशी आपली कार घेऊन त्यांच्यासोबत गेले. तेथे शनिवारवाड्यापाशी त्यांची बाळासाहेबांशी पहिली भेट झाली. दोघांच्या तारा जुळल्या आणि मनोहर जोशींचा शेवटच्या श्वासापर्यंतचा पुढचा सारा प्रवास हा बाळासाहेब आणि शिवसेनेसोबत झाला. आपल्या ‘स्पीकर्स डायरी’च्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी पुढच्या पुस्तकाचे नाव ‘वन बी’ असेल असे जाहीर केले होते, तेव्हा प्रमोद महाजन यांनी हा ‘बी’ म्हणजे बाळासाहेब व ते नसते तर जोशींची स्थिती ‘टूबी ऑर नॉट टूबी’ अशी झाली असती, असे सांगून हशा पिकवला होता. मराठी माणसाने पुढे आले पाहिजे ही जातिवंत कळकळ बाळासाहेबांप्रमाणेच त्यांच्यापाशीही होती. त्यामुळे स्वतः उद्योजकतेत यशस्वी होतानाच मराठी तरुणांतून उद्योजकांच्या नव्या पिढ्या घडाव्यात यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यासाठी ठिकठिकाणी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे जाळे उभारले. पुढे जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे ते संस्थापक म्हणूनही त्यांनी हे काम चालू ठेवले. ‘मी दारिद्य्रातून वर आलो, पण दरिद्री राहिलो नाही’ असे ते म्हणत असत. एका बाजूने हे सगळे घडत असताना दुसऱ्या बाजूने त्यांचा राजकीय प्रवासही सुरू होता. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांच्या सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हाती असल्याची टीका होत असे, परंतु एकदा एन्रॉनच्या अधिकारी रिबेका मार्क मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली असताना ‘मातोश्री’ वर गेल्याने ती भेट रद्द करण्याची हिंमत दाखवून जोशींनी मुख्यमंत्रिपदाची शान राखली होती. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांना दिल्लीत लोकसभेचे सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली. आपल्या निष्पक्षतेचे दर्शन त्यांनी तेव्हा घडवले. सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आज राजकारण जसे खुनशी झाले आहे, तसे तेव्हा नव्हते. नेते उमदे होते. हास्यविनोदाने रंगणाऱ्या त्या खेळकर राजकीय पर्वातला एक ‘कोहिनूर’ आता निखळला आहे.