रस्ते व मान्सूनपूर्व कामांना लवकरच सुरूवात

0
127

>> बांधकाम मंत्री पाऊसकर यांची माहिती

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मान्सूनपूर्व विकास कामे, रस्त्याची दुरुस्तीला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची सूचना करण्यात आली आहे. ओपा पाणी प्रकल्पात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील इतर भागातील पाणी समस्या सोडवण्याकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी बांधकाम खात्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

ओपातील पातळी कायम राखणार

ओपा पाणी प्रकल्पातील पाण्याची पातळी दरदिवशी २ इंचांनी कमी होत आहे. ही पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे. ओपा पाणी प्रकल्पातून पणजी, फोंडा, शिरोडा, उसगाव आदी भागात पाण्याचा पुरवठा केला असून दर दिवशी १४० एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे. ओपा प्रकल्पातील खांडेपार नदीतील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी गांजे, सांगे भागातून पाणी खेचून खांडेपार नदीत सोडले जात आहे. जलस्रोत खात्याकडून नदीतील पाण्याची पातळी राखण्याचे काम केला जात आहे. नदीतील पाण्याची पातळी न राखल्यस आगामी मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू शकते, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

पडोशे येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पंपामध्ये बिघाड झाल्याने डिचोली परिसरात पाणी टंचाईची समस्या निर्णय झाली आहे. पंपाच्या दुरुस्तीचे काम कर्नाटकातील कंत्राटदाराकडून केले जाते. लॉकडाऊनच्या काळात कंत्राटदाराला कर्मचारी आणण्यात अडचण निर्माण झाली. पंपाच्या दुरुस्तीचे काम लवकर मार्गी लावण्याची सूचना करण्यात आली आहे. अस्नोडा, चांदेल येथील पाणी प्रकल्पाकडे योग्य पद्धतीने लक्ष देण्याची सूचना अधिकार्‍यांना करण्यात आली आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

 

हॉटमिक्सिंग मेमध्ये

राज्यातील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाची कामे मे महिन्यात केली जाऊ शकतात. राज्यातील महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवू नये, अशी सूचना ठेकेदाराला करण्यात आली आहे. खराब रस्त्यामुळे गत पावसाळ्यात वाहन चालक, नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या पावसाळ्यात नागरिक, वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून वेळीच दुरूस्ती करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला करण्यात आली आहे. बांधकाम खात्याच्या कंत्राटदारांना रस्त्याच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कंत्राटदारांकडे ६० टक्के कामगार आहेत. त्यामुळे बाहेरून कामगार आणण्याची गरज नाही, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.