यौवराज्याभिषेक?

0
9
 • प्रा. रमेश सप्रे

मिथिला नगरीत चारही राजपुत्रांचे विवाह झाल्यावर सारी मंडळी अयोध्येला परतली. येथे रामायणातील पहिले ‘बालकांड’ संपते नि ‘अयोध्याकांड’ सुरू होते. अयोध्येला सीता-राम आणि इतर दांपत्ये बारा वर्षे आनंदात राहिली. सर्वांची गृहस्थाश्रमी दिनचर्या आदर्श होती. असे वर्णन केले जाते की, भूमिकन्या सीता ही राज्यातील भूमिपुत्रांच्या, सामान्यजनांच्या सुखदुःखांशी एकरूप होऊन त्यांची सेवा करून, अडचणीत गरज भागवून, अगदी गर्भवतींचे डोहाळे पुरवून, त्यांच्या बाळंतपणात आवश्यक ती मदत करून जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनून राहिली होती. …तर राम आदर्श पुत्र, बंधू, पती, स्वामी, सेवक बनून सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करत होता. सर्व अयोध्यावासीयांनी श्रीरामाला आपला भावी राजा मनोमन मानून टाकले होते.

दशरथाच्या मनातही असेच विचार होते; पण त्यांना भूतकाळातील दोन घटनांची पार्श्वभूमी होती. एक इतरांना माहीत नसलेला प्रसंग म्हणजे श्रावणकुमाराचा अनवधानाने झालेला वध नि त्याच्या आईवडिलांनी मरताना दिलेला तळतळाटी शाप. दुसरी घटना होती दशरथ-कैकेयीच्या विवाहाची.

राजघराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचे विवाह दोन प्रकारचे असतात. एक- यात वधू असते ‘वीर्यशुल्का.’ यात आपल्या वीर्याच्या म्हणजे शौर्याच्या, पराक्रमाच्या जोरावर जाहीर केलेला ‘पण’ (अट) जिंकायचा असतो. सीता नि द्रौपदी या ‘वीर्यशुल्का’ होत्या. दुसऱ्या प्रकारात वधू असते ‘राज्यशुल्का.’ म्हणजे राजाला इतर राण्या असल्या तरी ‘राज्यशुल्का’ वधूच्या मुलालाच राजाचा वारस म्हणून सिंहासनावर बसण्याचा अधिकार असतो. कैकेयी आणि महाभारतातील शांतनू राजाची पत्नी सत्यवती या ‘राज्यशुल्का’ होत्या.
खूप विचार करून राजगुरू वसिष्ठ नि मंत्री सुमंत्र यांच्या सल्ल्याने दशरथाने एक (हल्लीच्या भाषेत ‘स्मार्ट’) योजना तयार केली. त्यानुसार सर्वांना प्रिय असलेल्या श्रीरामाला युवराजपदाचा अभिषेक म्हणजेच यौवराज्याभिषेक लवकरात लवकर करावा असे ठरले. त्याचवेळी दशरथाच्या मनात कैकेयीच्या पिताश्रींना नि बंधू युधाजिताला दिलेल्या वचनाचेही स्मरण होते. यासाठी त्याने गुरू वसिष्ठांना लवकरात लवकर असलेला शुभमुहूर्त काढायला सांगितला. त्याबरोबर भरताला आपल्या मामा युधाजिताकडे केकय देशाला पाठवले. बरोबर अर्थातच शत्रुघ्नही जाणार होता. या विचारानुसार यौवराज्याभिषेकाची पूर्वतयारी झाली. विशेष म्हणजे दूरदूरच्या सर्व राजा-महाराजांना निमंत्रणे पाठवली. केकयाधिपतीला मात्र निमंत्रण धाडले नाही. इतकी काळजी घेऊनही अटळ नियतीनुसारच सर्व घटना घडत गेल्या. सर्वांच्या पूर्वसंचितानुसार सारे काही घडणार होते नि झालेही तसेच.

समर्थ रामदासांचे वर्णन करणाऱ्या श्लोकात त्यांनी तीन ऋषितुल्य व्यक्तींशी तुलना केली आहे. शुकमुनींसारखे धगधगीत वैराग्य, वाल्मीकींसारखी लोकप्रिय काव्यरचना आणि वसिष्ठांसारखे ज्ञान. अनेकजणांच्या मनात प्रश्न उभा राहतो की वसिष्ठांनी श्रीरामाच्या यौवराज्याभिषेकासाठी काढलेल्या सुमुहूर्ताने काय साध्य झाले?

 • ज्याच्यासाठी मुहूर्त काढला तो रामाचा यौवराज्याभिषेक झालाच नाही.
 • त्याऐवजी रामाला चौदा वर्षे वनवासात जाणे भाग पडले. स्वेच्छेने सीता, लक्ष्मणांनाही.
 • हाय खाऊन, ऊर बडवत, ‘हेऽऽ राम, हेऽऽ राम’ म्हणत दशरथ राजाने प्राण सोडला.
 • तीनही प्रमुख राण्या (नि इतरही राण्या) विधवा झाल्या.
 • ज्या भरतासाठी हक्क सांगून मागितलेल्या राजसिंहासनावर भरत कधीही बसला नाही.
 • इतकेच काय पण चौदा वर्षे भरतही अयोध्येत गेला नाही. नंदिग्रामात तपस्व्यासारखा राहिला.
 • मुख्य म्हणजे, एका महोत्सवासाठी सजल्यासवरलेल्या अयोध्येत शोकाचे वातावरण पसरले.
  याला वसिष्ठांचे ज्ञान, दूरदर्शित्व म्हणायचे का? पण या वरवर अशुभ वाटणाऱ्या मुहूर्ताच्या पोटात एक अतिशुभ अमृतमुहूर्त दडला होता. कसा? -ते पुढे पाहू.

आणखी एक दृश्य आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. अभिषेकाच्या आदल्या दिवशी नि रात्री श्रीराम-सीता व्रतस्थ राहिली. तृणशय्येवर निजली. कंदमुळे, फळे यांचा साधा आहार केला. दुसऱ्या दिवशी जीवनातील सुरू होणाऱ्या भव्य अध्यायापूर्वीचं स्वतःला शिकवणारं हे दिव्य जीवन अभिषेकाच्या पूर्वसंध्येला दोघंही जगले.
अभिषेकाच्या दिवशी पहाटे सुमंत्र बोलवायला आल्यावर श्रीराम निष्पाप सहजतेने त्यांच्या मागून जाताना सीतेलाही तयार राहायला सांगतो, यात पुढच्या क्षणी घडणाऱ्या घटनेचं अज्ञान दिसून येतं. ‘देशी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार’ या भीषण वास्तवाची प्रचिती येते. रामाने हे ज्या पद्धतीने स्वीकारले त्यात त्याची महानता दिसून येते.
अनेक संस्कारांचा पुंज या महत्त्वाच्या प्रसंगात दिसून येतो.

 • नियतीची अटळता. वरवर कटू वाटणाऱ्या नि अशुभ दिसणाऱ्या घटनेच्या अंतरंगात दूरगामी परिणाम घडवणाऱ्या गोष्टी असू शकतात.
 • नियती ही चराचरावर प्रभाव पाडणारी एक विश्वशक्ती असते. तिच्या अंतर्गत अनेक व्यक्ती आपली प्रारब्धगती, संचिताचे भोग भोगत असतात. ते आनंदाने, विनातक्रार भोगायचे असतात. या दृष्टीने श्रीराम हा आदर्श आहे.
 • मानवाच्या बुद्धीने काढलेले मुहूर्त, शुभवर्प इ. गोष्टी प्रारब्धाच्या किंवा नियतीच्या चौकटीतच प्रवाही नि प्रभावी असतात.
 • जीवनातील कोणत्याही मोठ्या, सुखदायी घटनांचे रूपांतर दुःखदायी, अपेक्षाभंग करणाऱ्या घटनेत झाले तरी आपली प्रतिक्रिया असली पाहिजे (आणि तीही मनापासून)- ठीक आहे. हरकत नाही. चालेल. ओके! …ओके?