योगसाधना- 616, अंतरंगयोग- 202
आत्मिक धर्म

0
11
  • डॉ. सीताकांत घाणेकर

आजची विश्वाची स्थिती अशी होण्याचे कारण हेच आहे. ज्ञान वाढत आहे, परंतु त्याचा हवा तसा परिणाम दिसून येत नाही. ज्ञान पचवले जात नाही. ज्ञानाचे बी फक्त पेरून उपयोगी नाही. रोपटे झाले की त्याला योग्य तितके पाणी, खत आणि प्रेम-ममता देऊन त्याला वाढवायला हवे, तेव्हाच वटवृक्ष होईल!

‘मानवी जीवन’ म्हणजे विविध घटक आपोआप त्याबरोबर आले- कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी, समाज… जीवन जगताना बालपणापासून जीवनाच्या अंतापर्यंत विविध परिस्थिती, समस्या, संकटे, आव्हाने येतच असतात. काहीवेळा घटना आपल्या इच्छेप्रमाणे व्यवस्थित घडतात, तर अनेकवेळा अनपेक्षित व मनाविरुद्ध घडतात. अशावेळी प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असू शकते- त्याच्या स्वभावाप्रमाणे, संस्कारांप्रमाणे, अनुभवांप्रमाणे… कितीतरी वेगवेगळे पैलू असतात. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितक्या प्रतिक्रिया!
काहीजण शांत असतात व आलेल्या घटनेला सामोरे जातात. पण बहुतेकजण क्रोध करतात. कळत-नकळत त्यांच्या मुखातून अपशब्द निघतात. काहीवेळा त्यांच्या हातून विपरित कर्मदेखील घडण्याची शक्यता असते. तसे घडले तर वातावरण अधिकच बिघडते. ज्यांना राग येतो ते सहज म्हणतात की, अशा परिस्थितीत मी शांत का व कसा राहू? राग येणे अगदी साहजिक आहे! बहुतेकांना ते मान्य असते, कारण विश्वातील अनेकांची तीच मान्यता असते. याचे मूळ कारण म्हणजे शिक्षणपद्धतीत आध्यात्माला स्थान नाही.

अध्यात्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या धर्माप्रमाणे आचरण करायला हवे. हा धर्म म्हणजे आत्मिक धर्म. आत्म्याचे सात गुण- ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सुख, आनंद, शक्ती. पाण्याचा धर्म जसा शीतलता आहे, फुलाचा धर्म जसा कोमलता आहे, अग्नीचा धर्म जसा ऊब देणे आहे, वृक्षाचा धर्म जसा फुले-फळे देणे आहे, तसाच मानवाचा धर्म आहे- आत्मिक धर्म!
आज ‘धर्म’ हा शब्द उच्चारला की विविध धार्मिक मार्ग डोळ्यांसमोर येतात… अगदी नैसर्गिकरीत्या व सहज- हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी, शिख. लगेच त्यांचा शिक्षक, गुरू दिसायला लागतो. त्यांची धार्मिक स्थाने आठवतात- मंदिर, चर्च, मशीद, गुरुद्वारा… सगळ्या धर्ममार्गांची शिकवण एकच आहे- दया, क्षमा, प्रेम, शांती, सलोखा, सहकार्य, सेवा. फक्त त्यांचे गुरू वेगवेगळे आहेत. आपण भयंकर चूक करतो, धर्माची मूळ शिकवणच विसरतो. गुरूचीच आठवण करतो. मग पुढे जाऊन त्यांच्या शिष्यांच्या शिकवणीला मानतो. त्यामुळे प्रत्येक मार्गामध्ये पंथ उभे राहिले. तद्नंतरचे दुर्भाग्य म्हणजे धर्माच्या नावाने युद्ध करतो. मानवतेचा सांभाळ करण्याऐवजी नाश करतो.

या सर्व मार्गांमध्ये सृष्टिकर्ता सर्वांचा मातापिता आहे हेच सांगितले जाते. सर्वजण एका बोटाने- करंगळीच्या- त्याचे स्थान वर दाखवतात. त्याचप्रमाणे तो अविनाशी, निराकार आहे व ज्योतीस्वरूप आहे हेदेखील सांगतात. वैदिक सनातन धर्म (तथाकथित हिंदू धर्म) भगवंताची दोन रूपे समजावतो.

  1. सगुण-साकार ः सर्वसामान्यांना समजण्यासाठी, सृष्टिकर्त्याबद्दल आकर्षण, प्रेम, आत्मीयता उत्पन्न व्हावी. 2. निर्गुण-निराकार ः त्याचे खरे स्वरूप. ही गोष्ट ज्ञानी लोकांसाठी, अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी. मात्र हा विषय अत्यंत विस्तृत व गहन आहे. इथे पुढे बघायची गरज नाही.
    शास्त्रांचा अभ्यास नसल्यामुळे मूळ मुद्दा, तत्त्वज्ञान माहीत नसल्यामुळे बहुतेकजण आपल्या सामान्य ज्ञानाप्रमाणे विश्व व त्यातील घटनांकडे बघतात. त्यामुळे अनेक गोष्टी नैसर्गिक आहेत असे आपण मानतो. उदा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, शरीराचा-मनाचा रोग होणे. त्यामुळे आत्मधर्म, आत्मगुण नैसर्गिक वाटत नाहीत. निरोगी असणे आपण नैसर्गिक मानत नाही. त्यामुळे या सर्व सहज गोष्टींबद्दल आपल्याला विसर पडला आहे. हजारो वर्षांच्या संस्कारांमुळे मूळ ज्ञानाकडे दुर्लक्ष झाले आहे.

हे मूळ ज्ञान जरी अत्यंत गूढ असले तरी ते शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला तर अत्यंत सोपे आहे. मूळ सिद्धांत लक्षात घेतले तर जगणे कठीण नाही. गरज आहे ती अभ्यास करण्याची व आत्मसात करण्याची, प्रामाणिक इच्छा ठेवण्याची. आध्यात्मिक ज्ञान असले की कुठल्याही घटनेचे विश्लेषण विशिष्ट अशा वेगळ्या पद्धतीने केले जाते. उदा. एकाच कुटुंबात जन्मलेले दोन भाऊ- काहीवेळा जुळे भाऊ. यांच्यात थोड्या वेळेचे अंतर असले तरी अनेकदा वेगळ्या तऱ्हेने वागतात. एकाला राग येतो तर दुसरा अगदी शांत असतो. अशावेळी रागीट व्यक्तीला बहुतेकजण उपदेश करतात. त्याला समजावतात की त्यानेदेखील स्वतःच्या भावाप्रमाणे वागावे. याचे कारण म्हणजे, अज्ञानामुळे आपण विसरतो की हे दोन वेगवेगळे आत्मे आहेत. या जन्मात जरी भाऊ-भाऊ म्हणून जन्मले तरी त्यांचे पूर्वजन्मीचे संस्कार वेगळे आहेत. आणि जन्मदेखील किती असतील हेसुद्धा कुणालाच माहीत नाही.
अध्यात्मशास्त्राप्रमाणे म्हणूनच व्यक्तीकडे शरीर म्हणून न बघता आत्मा म्हणून बघायचे असते. शरीर बघितले की विविध गोष्टी सहज लक्षात येतात- लिंग, वर्ण, शिक्षण, स्थिती, कुटुंब, स्वभाव, वंश, रंग… अध्यात्माचा संबंध असतो तो त्या व्यक्तीच्या आत्म्याकडे, त्याच्या मूळ गुणांकडे, परमात्म्याकडील नात्याकडे.

आपण अनेकवेळा थोर संत-महात्म्यांकडे जातो. त्यांची दृष्टी सूक्ष्म असते. अंतर्ज्ञानामुळे स्थूल-सूक्ष्म दोन्ही ज्ञान त्यांना होते. पण त्यांच्या स्वतःच्या उच्च आध्यात्मिक पातळीमुळे त्यांना त्यांचे सद्गुण-दुर्गुण दोन्ही दिसतात. भूत व वर्तमानकाळ माहीत होतो. पण ते त्यांचे सद्गुणच बघतात. भूत-वर्तमानातील त्यांच्या जीवनातील चांगल्या घटना बघतात. म्हणून अशा व्यक्तींचा जीवनविकास होतो. भारतीय इतिहासातील जिवंत उदाहरण म्हणजे- नारदामुळे वाल्याकोळ्याचा बनलेला महर्षी वाल्मीकी. भगवान बुद्धामुळे बदललेला भील्ल अंगुलीमल.
फक्त कथा न बघता त्यातील बोध व तत्त्वज्ञान बघणे आवश्यक आहे. आपल्यातील अनेकजण विविध संस्थांमार्फत अनेक कार्यक्रमांत या विषयाबद्दल ऐकतात, अनेकवेळा वाचतात म्हणजे जाणून घेतात. ही पहिली पायरी आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे मानणे. त्यांतील सर्व मुद्दे प्रत्येकजण मानतोच असे नाही. तशी अपेक्षाही ठेवू नये. तसेच काहीजण थोडे मुद्दे मानतील म्हणजे त्यांना पटतील. शेवटी प्रत्येकाला या विषयात स्वातंत्र्य आहेच- विशेषकरून अध्यात्मशास्त्रात. कारण ही विद्या अति सूक्ष्म आहे. त्यामुळे सर्वांच्या ज्ञानेंद्रियांना अनुभव येईलच असे नाही. त्यातील अल्प व्यक्ती, ज्या प्रामाणिकपणे नियमित शास्त्रशुद्ध अभ्यास करतात, त्यांना मानणे व पटणे सोपे होते. त्यानंतर महत्त्वाची पायरी म्हणजे त्याप्रमाणे वागणे, चालणे. तिसरी पायरी सोपी आहे. व्यक्तीचे आचरण आपोआप तसे बदलते. महापुरुष, संत-महात्मे, अवतार यांची चरित्रे अभ्यास केली की हा मुद्दा सहज समजतो.

प्रत्येक शास्त्रामध्ये भौतिक/आध्यात्मिक काही विशिष्ट पायऱ्या आहेत. शास्त्रज्ञान आम्हाला वाचून-ऐकून मिळते. त्यानंतर चिंतन-मनन सुरू होते. मग पुढे अनुसंधान. मग कथन व आचरण. असे केल्याने सुरुवातीला अनुभव येतात व तद्नंतर अनुभूती. म्हणून या पायऱ्या लक्षात ठेवून त्याप्रमाणे अभ्यास हवा, साधना हवी- श्रवण- पठन- चिंतन- मनन- अनुसंधान- कथन- आचरण. कालांतराने तो व्यक्तीचा संस्कार होतो. आपण त्याला सवय म्हणतो.
बालपणात गुरुजी म्हणायचे, ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे!’ बहुतेकांचे हे असेच होते. आजची विश्वाची स्थिती अशी होण्याचे कारण हेच आहे. ज्ञान वाढत आहे, परंतु त्याचा हवा तसा परिणाम दिसून येत नाही. ज्ञान पचवले जात नाही.
ज्ञानाचे बी फक्त पेरून उपयोगी नाही. रोपटे झाले की त्याला योग्य तितके पाणी, खत आणि प्रेम-ममता देऊन त्याला वाढवायला हवे, तेव्हाच वटवृक्ष होईल.