युद्धकाळ आणि गोवा

0
47
  • शरत्चंद्र देशप्रभू

पहलगामनंतरचा संग्राम अन्‌‍ पूर्वीचे संग्राम यांचा अभ्यास करताना नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा स्वतंत्रपणे, सर्वंकष अभ्यास व्हायला हवा. युद्धजन्य परिस्थितीत या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणात्मक निर्णय घेण्यात उपयुक्त ठरू शकतील.

भारताच्या इतिहासाची पाने संस्कृती, राजवंश, विविध राजवटी तसेच संघर्षाच्या रक्तरंजित रंगाने रंगलेली आहेत. या संघर्षात विजयाच्या गाथा तसेच पराभवाच्या कटू घटनांचे वर्णन अन्‌‍ विश्लेषण आहे. अजून या विषयावर संशोधनकार्य चालूच आहे. पुराव्यांची अल्प साधने उपलब्ध असल्यामुळे भारताच्या इतिहासातील संघर्षासंबंधीचे संदर्भ हे वास्तव अन्‌‍ कल्पनाविलासाच्या जाळ्यात गुरफटल्याचे जाणवते. सर्वसामान्य नागरिकांना भारतवर्षाचा देदीप्यमान संघर्षकाल खुणावतो. विजयोत्सवाच्या क्षणांनी हा सामान्य नागरिक सुखावतो अन्‌‍ पराजयाच्या भावनेने निराश होतो. परंतु इतिहासाच्या साक्षेपी अभ्यासकांना अभिप्रेत असतो तो अल्प परंतु निर्णायक साधनांवर आधारलेला- भावनोत्कट दृष्टिकोन नसलेला- पारदर्शक वास्तवावर आधारित- सांगोपांग अभ्यास करून निरीक्षणे नोंदवत- निर्विकारपणे लिहिला गेलेला संघर्षाचा इतिहास. यात संघर्षाची कारणे, परिणाम, झालेली हानी अन्‌‍ त्याचा राजकीयच नव्हे तर तत्कालीन समाजावर झालेला खोलवर परिणाम याचे त्रयस्थाच्या निर्मळ परंतु चिकित्सक दृष्टीने केलेले विवेचन, विवरण असेल.

इतिहास हा माझा आवडता विषय असल्याने नकळतच माझ्या वाचनात संघर्षाच्या घटना आल्या. परंतु सारे संदर्भ संदिग्ध अन्‌‍ दृष्टिकोन पण रंजनात्मक. यास्तव इतिहासावरील कादंबरी वाचनात पण मी रस घेतला. परंतु जीवनात खऱ्याखुऱ्या युद्धाचे प्रसंग म्हणजे माझ्या दृष्टीने दुरून डोंगर साजरे! गोवामुक्तीचा प्रसंग तसे म्हटले तर लष्करी कारवाई. गोवा पोर्तुगीज शासनातून मुक्त करण्यासाठी केलेली नियोजनबद्ध, आखीव-रेखीव, टोकदार लष्करी धडक कारवाई. ही कारवाई छोटी असली तरी आम्हा गोमंतकीयांना याची सवय वा कल्पना नव्हती. सारे ऑपरेशन चोवीस तासांचे. परंतु हे बालवयातच अनुभवल्यामुळे मनात कायमचे रुतून बसले. लष्करी कारवाईची गती अन्‌‍ व्याप्ती एवढी नियोजनबद्ध होती की शत्रू गाफीलच राहिला. मनुष्य किंवा वित्तहानी न्यूनतम. नागरिकांना गैरसोय अशी सहन करावी लागलीच नाही. हे छोटे आवर्तन कधी पार पडले हे सर्वसामान्यांना कळण्यापूर्वीच गोवा, दमण व दीव हे प्रदेश मुक्त झाले. चकमकी झाल्या, हवाई हल्ले झाले, समुद्री संघर्ष झाला; परंतु याच्या झळा सर्वसामान्यांना जाणवल्या नाहीत. या कारवाईची आभासी तीव्रता जाणवली, कारण गोमंतकीयांचा हा पहिलाच अनुभव होता. या घटनेमुळे लोकमानसात संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. मुक्तीचा अत्यानंद, लष्करी कारवाईबद्दलची आशंका अन्‌‍ नव्या राजवटीबद्दल कुतूहल. परंतु काही का असेना, सर्वसाधारण वातावरण अल्पकाळ तंगच राहिले.

या धक्क्यातून सावरत असताना चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाची बातमी धडकली जुलै 1962 च्या दरम्यान. गोमंतकीय राष्ट्रीय प्रवाहात समरस होण्याचा तो संवेदनशील काळ. या आक्रमणाने एकंदर प्रक्रियेला गतीच मिळाली. त्याकाळी युद्धभूमीवरचा ‘आँखों देखा हाल’ पोहोचवण्याची प्रभावी माध्यमे नव्हती. स्थानिक नव्याने प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे अन्‌‍ रेडिओवरील बातम्या! त्याकाळी रेडिओचे अस्तित्व पण तुरळक. शिवाय निम्नस्तरावरील सरकारी स्वायत्त संस्था असल्यामुळे सरकारी निर्बंध आलेच. वृत्तपत्रांवर पण नियंत्रण होते. यामुळे युद्धभूमीवरील हालचालींचा मागोवा घेणे सर्वसामान्यांना तसे अशक्यच. शिवाय सर्वसामान्यांना त्याकाळी जागृतीअभावी युद्धाच्या बारीकसारीक तपशिलाबद्दल अनभिन्नता. त्याकाळची ‘उ हेराल्द’ अन्‌‍ ‘हेराल्द’ ही पोर्तुगीज भाषेतून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे युद्धासंबंधी बातम्या देण्यात अग्रेसर. या वृत्तपत्रांचा वाचक बहुधा कॅथलिक वर्ग. त्याकाळी गोवा मुक्तीच्या मानसिक धक्क्यातून सावरला नव्हता. त्यावेळचा यांचा कल पण भारतविरोधी. परंतु याला प्रखर राष्ट्रवाद जोपासणारे मुक्तिलढ्यातील नायक डॉ. मार्टिन्स, इव्हेग्रियो जॉर्ज, पीटर अल्वारिस हे अपवाद. भारत-चीन युद्धाच्या झळा त्यावेळी गोव्याला भिडल्या नाहीत. कारण भौगोलिक अंतर अन्‌‍ दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा. शस्त्रास्त्रांचे पल्ले पण मर्यादित. त्यामुळे या युद्धाने गोव्यात तरी दहशत माजली नव्हती. परंतु शासकीय पातळीवर ताण जाणवत होता. अत्यावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबद्दल पण चिंता व्यक्त केली जात होती. सायरन, ब्लॅक आउट यांचे पण प्रयोग हिरिरीने केलेले दिसत नव्हते. एकंदर या युद्धात झालेल्या पराभवाचा धाक आम्ही अनुभवला तो मुंबईत. 1963 साली वडिलांची दमणला बदली झाली होती. आम्ही मुले मुंबईची सुप्रसिद्ध दिवाळी अनुभवण्याची स्वप्ने पाहत होतो. परंतु चीनच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आमची ही मुंबईतली पहिलीवहिली दीपावली सुतकी वातावरणात पार पडली. गोव्यात चीनच्या आक्रमणादरम्यान आम्हा मुलांना पुराणातील, रामायणातील, महाभारतातील अस्त्रांचा प्रयोग चीनवर करून विजय प्राप्त करावा असे वाटत असे. परंतु मुंबईत या आक्रमणाच्या वेळी राष्ट्रप्रेम उफाळून आले होते असेच संकेत होते. आपल्या शरीराचा लचका तोडल्याची भावना मुंबईच्या लोकमानसात प्रतीत होत होती. दागदागिने, पैसाअडका, सरहद्दीवर जवानांना लागणाऱ्या वस्तूंचा ओघ चालूच होता. स्वयंसेवकांच्या फौजा निर्माण झाल्या होत्या, सरहद्दीवर या प्रेमापोटी दिलेल्या वस्तू पोहोचवण्यासाठी. राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग धगधगते ठेवण्यासाठी प्रभातफेऱ्या काढल्या जात होत्या.
1965 च्या भारत-पाक युद्धावेळी गोवेकर राष्ट्रवादाच्या दृष्टीने बराच प्रगल्भ झाला होता. या युद्धाच्या झळा गोवेकरांनी अनुभवल्या. धान्यटंचाई, ब्लॅक आउट, रेडिओवर बातम्या अन्‌‍ देशप्रेमाशी संबंधित विविध कार्यक्रम. त्याकाळी गोव्यात विजेचा प्रसार झाला नसल्यामुळे नागरिकांना तशा खडतर अडचणींचा सामना करावा लागला नाही. आमची शालान्त परीक्षा असल्यामुळे खिडक्यांची पारदर्शक तावदाने जाड पुठ्ठे लावून बंद करावी लागत. चिमणी किंवा कंदिलाचा प्रकाश खिडकीबाहेर परावर्तित होत नसे. रस्त्यावरचे विजेचे दिवे विझवले जात. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते पोलिसांसमवेत गस्त घालताना रात्री दिसत. भारतीय सैन्याची लाहोरपर्यंतची धडक अन्‌‍ नाविक दलाची कराची बंदरावरची कामगिरी ऐकून आमचा ऊर भरून येत असे. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे घोषवाक्य ‘जय जवान, जय किसान’ गोंधळलेल्या मनाला ऊर्जा देत होते. शेवटी ताश्कंद करारान्वये झालेल्या या युद्धाच्या सांगतेमुळे तणावमुक्त वातावरण अनुभवायला मिळाले. भारताला मिळालेल्या या विजयाने गोवेकर अत्यानंदाने बेहोष झाल्याचे दिसत होते. घोषणा, विजय मिरवणुका, सभा, मेळावे यांना ऊत आल्याचे स्मरते.

‘भारत-पाक युद्ध 1971′ म्हणजे भारतासाठी विजयोत्सवाचा मेरुमणी. गोवा मुक्त होऊन दशक उलटले होते. गोवेकर एका नव्या युगाचा हुंकार अनुभवत होता. प्रगतीचे दरवाजे हळूहळू उघडत होते. पुरोगामी विचारसरणी रुजत होती अन्‌‍ अनुषंगाने आलेले भूसुधारणा, कल्याणकारी कायदे अमलात येऊ पाहत होते. शैक्षणिक क्रांतीची गोमटी फळे मुक्त गोव्यातील नवीन पिढी चाखत होती. औद्योगिकीकरणाचे पडसाद उमटू लागले होते. आशा-आकांक्षांचे पंख फैलावले होते. अशा एकंदरीत स्थित्यंतराच्या अवकाशात युद्धाचे काळे ढग अवतरू लागले होते. पाकचा इरादा स्पष्ट होता, परंतु हेतू छुपा होता. पूर्व पाकिस्तानात निर्माण झालेल्या राजकीय अराजकामुळे स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढे भारतीय भूमीत शिरत होते. युद्धाला तोंड फुटले अन्‌‍ त्याचे रूपांतर बांगलादेशाच्या निर्मितीत झाले. मुक्त गोव्यातील शांत, परिपक्व नागरिकांना या पंधरा दिवसांच्या झळा अप्रत्यक्षपणे पोहोचल्या. पाकिस्तान मुंबईवर हल्ला करेल, मार्मागोवा बंदर उद्ध्वस्त करून शहर पाण्याखाली आणेल अशा वदंता उठत होत्या. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत होता. माल गोदामात बंदिस्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. त्याकाळी दूरदर्शनचा प्रवेश गोव्यात झाला नव्हता. वर्तमानपत्रांतल्या बातम्यांवर पण नियंत्रण होते. ब्लॅक आउटची अंमलबजावणी कठोर होती. तोपर्यंत गोव्याचा साराच शहरीभाग विजेने चकाकत होता. प्रकाशाची तिरीप जरी खिडकीतून बाहेर आली तरी पोलिस दार ठोठावत. स्वयंघोषित राजकीय पक्षांचे कार्यकर्ते काचेच्या तावदानांवर दगडफेक करीत. थोडेफार दडपशाहीचे वातावरण उलगडत होते. परंतु या साऱ्या गदारोळात राष्ट्रप्रेमाचा उत्कट भाव नागरिकांच्या देहबोलीतून प्रक्षेपित होत असताना दिसत होता. या राष्ट्रप्रेमात दिखाऊपणा नव्हता; राष्ट्राबद्दलची चिंता होती. भाबड्या मनाच्या नागरिकांना गळेकापू स्पर्धेचा सामना करावा लागला नव्हता. परंपरा, संस्कृती, रीतिरिवाज यात आधुनिकता आली तरी अत्याधुनिकता आली नव्हती. मर्यादेत देशासाठी त्याग करण्याची भावना पण जाणवत होती. राष्ट्रप्रेम स्वार्थाच्या विळख्यात अडकले, बरबटले नव्हते. व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठे अन्‌‍ महत्त्वाचे या संकल्पनेचा गाभा विस्कटलेला नव्हता. राष्ट्रकार्यात प्रत्यक्ष योगदान नसले तरी समर्पणाचे, तादात्म्याचे तत्त्व अबाधित असल्याचे नागरिकांच्या मनोभूमिकेतून स्पष्ट होत होते. काहींनी अर्धपोटी राहून आपल्यापरीने देशकार्याला मदत करण्याचा चंग बांधला होता. जसजसे गोव्यातील नागरी वातावरण विकसित होऊ लागले, तसतशी देशप्रेमाची परिभाषा बदलत चालली.
मध्यंतरीच्या काळात कारगील युद्ध झाले. गलवान खोऱ्यात चकमक झाली. या दोन्ही प्रसंगी समाजमाध्यमे तसेच दूरदर्शन वाहिन्यांचा प्रभाव अधोरेखित झाला. खरे वृत्त राहिले बाजूला अन्‌‍ समाजमाध्यमांवर खऱ्याखोट्या संदेशांचे महापूर आले. यांच्याच जोडीला फेसबुक, इन्स्टाग्राम अन्‌‍ आता रिल्स. खाजगी वृत्तवाहिनी तर अतिरेकी भूमिका वठवताना दिसतात. तारस्वरात चर्चा, वितंडवाद, निरर्थक बडबड, ऐकीव माहिती अन्‌‍ याची परिणती अँकरच्या अशोभनीय ओरडण्यात. खासगी वृत्तवाहिन्यांचे एकमेव लक्ष्य म्हणजे सर्वसामान्य नागरिक- देशभक्तीने भारलेले. तासन्‌‍तास युद्धकाळात विविध खाजगी वाहिन्यांवर नजर खिळलेली. देशाबद्दल, युद्धाबद्दल काहीतरी अर्थपूर्ण बघायला, ऐकायला मिळेल या शुद्ध हेतूने. वाहिनीवरील निरर्थक बडबड अन्‌‍ गडबड पाहून कावून जाणारी. शेवटी डोंगर पोखरून उंदीरसुद्धा बाहेर पडणार नाही. खासगी वाहिन्यांनी मात्र युद्धकाळात जाहिरातींद्वारे रग्गड पैसा कमावला. तथाकथित बुद्धिजीवी वर्ग मात्र वृत्तवाहिनीला हवे तेवढेच महत्त्व देणार! या वर्गाला देशाविषयी प्रेम नाही असे नाही; परंतु नव्या जीवनशैलीमुळे यांचा देशहिताकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावहारिक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्वहिताच्या, सहअस्तित्वाच्या चष्म्याने देशहिताचे निरीक्षण करणे अन्‌‍ याच अनुषंगाने समीकरणे योजणे, मानणे नव्हे. व्यक्तिगत हित अन्‌‍ देशाचे हित यांची सांगड बेमालूमपणे घालून आपला सामाजिक, आर्थिक दर्जा युद्धकाळात कसा अबाधित राहील याची चिंता वाहणे. दोष परिस्थितीचा. आपण आज भौतिक आकर्षणाच्या ज्या उच्चस्तरावर पोहोचलो आहोत त्यातून परत येण्याचे दोर केव्हाच कापलेले आहेत. यास्तव आजच्या नागरिकांची पूर्वीच्या युद्धकाळातील भाबड्या नागरिकांशी तुलना करणे असयुक्तिक ठरेल. यास्तव सेन्सेक्सचे चढउतार युद्धज्वरात पण मनाच्या कप्प्यात आपले ठोकताळे मांडत असतात. पहलगामनंतरचा संग्राम अन्‌‍ पूर्वीचे संग्राम यांचा अभ्यास करताना नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा स्वतंत्रपणे, सर्वंकष अभ्यास व्हायला हवा. युद्धजन्य परिस्थितीत या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणात्मक निर्णय घेण्यात उपयुक्त ठरू शकतील. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मध्यमवर्गीयांची संख्या अन्‌‍ त्यांचे युद्धजन्य परिस्थितीतले अंतरंग जाणून घेणे महत्त्वाचे. या वर्गाचे राष्ट्रीय उत्पादन निर्देशांकातले योगदान अन्‌‍ प्रत्यक्ष देशकार्य याची वस्तुनिष्ठ सांगड घालणे अनिवार्य.