यज्ञरक्षण

0
13

(संस्कार रामायण)

  • प्रा. रमेश सप्रे

प्रजेच्या निर्मितीबरोबरच यज्ञाचीही निर्मिती केली गेली. यज्ञ चालू नाही कुठे? निसर्गात, प्राण्यांच्या- विशेषतः मानवाच्या शरीरात, समाजात म्हणजेच सृष्टी-व्यष्टी-समष्टी सर्वत्र जी परमेष्टी व्यापून आहे तिला यज्ञ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

आजच्या मानवजातीला आदर्श अशी प्राचीन भारतीय संस्कृतीतली संकल्पना असेल तर ती म्हणजे ‘यज्ञ.’ वेदकाळापासून ऋषिमुनींच्या सखोल चिंतनातून नि विचारमंथनातून यज्ञविचार समाजमनात रुजवला गेला. भगवद्गीतेत स्वतः सृष्टिनिर्मात्या, विधात्या, प्रजापिता ब्रह्मदेवाचेच उद्गार आहेत- ‘सहयज्ञा प्रजा सृष्ट्‌‍वा।’ म्हणजे प्रजेच्या (सर्व सृष्टीच्या) निर्मितीबरोबरच यज्ञाचीही निर्मिती केली गेली म्हणजे यज्ञसंकल्पना मांडली गेली. यज्ञ चालू नाही कुठे? निसर्गात, प्राण्यांच्या- विशेषतः मानवाच्या शरीरात, समाजात म्हणजेच सृष्टी-व्यष्टी-समष्टी सर्वत्र जी परमेष्टी (परमेश्वरी शक्ती) व्यापून आहे तिला यज्ञ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

सध्या परदेशी अध्यात्मग्रंथांतसुद्धा यज्ञसृष्टी- यज्ञकृती- यज्ञजीवनशैली- यज्ञसंस्कृती असे शब्दप्रयोग वापरले जातात. अशा यज्ञाची मुख्य जबाबदारी ऋषी-मुनी म्हणजे सर्वकाळातील विचारवंत यांच्याकडे असते. ज्यावेळी दुष्ट, राक्षसी शक्तींकडून या सर्वव्यापी यज्ञचक्राचे संतुलन बिघडवले जाते तेव्हा धरतीमाता गोमातेचे रूप घेऊन ऋषींसह ‘त्राहि माम्‌‍ पाहि माम्‌‍’ असे म्हणत ब्रह्मदेवाकडे जाते नि मग ब्रह्मदेव विष्णुभगवानाकडे जाऊन अवतार घेऊन पृथ्वीवरचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करतात तेव्हा निरनिराळ्या रूपात, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी कुठेही असुरसंहाराचे कार्य करण्यासाठी परब्रह्म-पराशक्ती अवतार घेते. कार्य अर्थातच-
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌‍।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
त्यावेळची परिस्थिती कशी असते? गीतेत याचे प्रत्ययकारी वर्णन आलेय-
यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति, भारत (हे अर्जुना)।
अभ्युत्थाम्‌‍ अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌‍॥
हे सारे एवढे विस्ताराने सांगण्याचे कारण, श्रीरामाचे अवघे जीवन स्वतः एक यज्ञ आहे नि त्याचे जीवन (अवतार) कार्य यज्ञसंस्कृतीचे रक्षण हेच आहे. म्हणूनच विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाचे रक्षण ही रामाच्या जीवनातली पहिली महत्त्वाची कामगिरी आहे. ज्यावेळी विश्वामित्र राजा दशरथाकडे येऊन यज्ञरक्षणासाठी त्याच्या ज्येष्ठ पुत्राची- रामाची- मागणी करतात त्यावेळी दशरथ स्वतः सैन्य घेऊन यज्ञरक्षणासाठी येण्याची इच्छा व्यक्त करतात. कारण राम फक्त सोळा वर्षांचा कोवळा युवक असतो. त्याला राक्षसांविरुद्ध लढण्याचा अनुभव नसतो. हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटलं तरी नियतीचा संकेत वेगळा असतो जो विश्वामित्र नि वसिष्ठ या त्रिकालदर्शी ऋषींना माहीत असतो. ज्यावेळी रामाला राजसभेत बोलावले जाते त्यावेळी त्याची देहबोली, एकूणच व्यक्तिमत्त्व पूर्ण नकारात्मक असते. सागरोल्लंघनापूर्वीच्या हतबल हनुमंतासारखे किंवा महाभारतातील युद्धप्रसंगी विषादग्रस्त अर्जुनासारखे. पण या दोन महावीरांना समुपदेशन करून अनुक्रमे जांबुवंत आणि भगवान कृष्ण यांनी युद्धासाठी उभे केले.

तसेच श्रीरामाला या निराशा, नकारात्मकतेच्या मनःस्थितीतून बाहेर काढतात वसिष्ठ मुनी. या श्रीराम-वसिष्ठ संवादातून निर्माण झाला महान ग्रंथ ‘योगवासिष्ठ.’ या ग्रंथातील समुपदेशनातून (कौन्सेलिंग) श्रीराम आपल्या अवतारकार्यासाठी सिद्ध झाला नि लक्ष्मणासह विश्वामित्रांबरोबर यज्ञरक्षणासाठी (अवतारकार्यासाठी) निघाला.

अरण्यातून जाताना अनेकानेक प्रश्न विचारून तो भूभाग, तेथील आश्रम, ऋषींचे आश्रम, राक्षसांचा आतंक याविषयीचा इतिहास रामाने विश्वामित्रांकडून समजून घेतला. पहिले दुष्टांच्या निर्दालनाचे कार्य होते, अर्थातच असुरी शक्तीचे प्रतीक असलेल्या त्राटिकावधाचे.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, विश्वामित्रांच्या एका पूर्वजाने- कुशिकाने- राक्षससंहारासाठी देवदेवतांना अमोघ अशी शस्त्रे नि अस्त्रे निर्माण करून दिली होती. त्यांचे ज्ञान विश्वामित्रांनी रामाला दिले. याशिवाय बला, अतिबला यासारख्या भूक व निद्रा यावर विजय मिळवणाऱ्या विद्याही रामाला शिकवल्या, ज्या रामाने त्यांच्या अनुमतीने लक्ष्मणाला शिकवल्या. अशा रीतीने अस्त्र-शस्त्र, मंत्र-तंत्र, विद्या-शक्ती यांनी सुसज्ज करून यज्ञरक्षणासाठी सिद्ध केले.

सुबाहू, मारीच हे त्राटिकेचे पुत्र सैन्यासह तो यज्ञ भ्रष्ट-नष्ट करायला आले. रात्री त्यांचा प्रभाव अधिक असतो, पण शिकलेल्या विद्या-शक्ती इ.चा अचूक उपयोग करून, त्या राक्षसांचा संहार करून सात दिवस चाललेल्या त्या ऋषींच्या यज्ञाचे रक्षण केले. यात सुबाहूचा वध केला. मारीचावर मनुनिर्मित मानवास्त्राचा (टोक नसलेल्या बाणाचा) प्रयोग करून त्याला खूप दूर सागरतीरापर्यंत उडवून लावले. याचे कारण मारीचाचा सुवर्णमृग प्रसंग, सीताहरण, रावणाचा संहार इ. भावी घटनांशी संबंध येणार होता नि रामाला त्याची पूर्वकल्पना होती. असो.

संस्कार

  • ईश्वरी अवताराचे कार्य यज्ञसंस्कृती नि ऋषिमुनी यांचे रक्षण करणे हे असते.
  • प्रत्येक महान वीराला मंत्रगुरू-शास्त्रगुरू, तसेच तंत्रगुरू-शस्त्रगुरू यांची आवश्यकता असते. उदा. रामाला वसिष्ठ-विश्वामित्र, अर्जुनाला कृपाचार्य-द्रोणाचार्य.
  • यज्ञदीक्षा घेतल्यावर अहिंसा-व्रत स्वीकारायचे असते, म्हणून विश्वामित्र स्वतः राक्षसांना मारू शकत नव्हते. राम-लक्ष्मणाला शिक्षण देऊन त्यांच्यामार्फत यज्ञरक्षण करून घेतले.
  • ज्ञान नि पराक्रम म्हणजेच ब्रह्मतेज नि क्षात्रतेज किंवा गुणवत्ता नि सत्ता यांचा संगम झाला तरच ऐतिहासिक कार्य घडू शकते. योगेश्वर कृष्ण नि धनुर्धर अर्जुन दोघे एकत्र आल्यावरच युद्धात विजयश्री मिळू शकते.
  • महान गुरू आपल्या शिष्यांची आधी तयारी करून घेतो नि नंतरच मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना सिद्धसज्ज करतो.
    एकूण देवांच्या (महान व्यक्तींच्या) अवतारकार्यात असंख्यांचा सक्रिय सहभाग असतो. आपणही सिंहाचा जरी नसला तरी खारीचा वाटा उचलूया. ही काळाची मागणी आहे.