म्हापशातील बारमध्ये सिलिंडरचा स्फोट

0
10

>> जीवितहानी टळली, 40 लाखांचे नुकसान

>> दुचाकी व चारचाकी वाहनांची हानी

काल रविवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास डांगी कॉलनी म्हापसा येथे ब्रीज अपार्टमेंट या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील एका बार रेस्टॉरंटमध्ये सिलिंडरचा जबरदस्त स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली. पहाटे पावणेसहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. हा स्फोट झाल्याने शेजारील काही घरांच्या भिंतींना तडे गेले, तर काहींची काचेची तावदाने फुटली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

पहाटे 5.53 च्या सुमारास या घटनेची म्हापसा अग्निशामक दलास माहिती मिळताच दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोचले. स्फोट झाल्याने हिल-टॉप या बार-रेस्टॉरंटच्या बाहेरील काही वाहनांना आग लागली. स्थानिक लोकांसह जवानांनी आग विझविली. त्यानंतर बारमध्ये प्रवेश करीत जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग विझवली.

मोठी हानी टळली
अग्निशामक दलाच्या जवानांनी स्वयंपाक खोलीमधील एका सिलिंडरचा रेग्युलेटर बंद केला आणि इतर दोन सिलिंडर बाहेर काढली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून अपघात म्हणून या घटनेची नोंद केली. हा स्फोट इतका भीषण होता की, जवळपास दीड किलोमीटरच्या परिसरात व स्फोटाचा आवाज ऐकू
गेला.

मालकाकडून घातपाताचा संशय
या बार- रेस्टॉरंटच्या मालक प्रमिला मयेकर यांनी याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला. मुळात बारमध्ये कुठेच आग लागली नव्हती. तसेच वीजपुरवठा सुरळीत होता. शेजारील लोकांच्या म्हणण्यानुसार गॅस गळतीमुळे हा अपघात झाला असावा. या घटनेत पाच लाखांची मालमत्ता वाचविली असल्याचे म्हापसा अग्निशमन दलाने सांगितले. तर बार मालकाच्या म्हणण्यानुसार 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीमुळे दुचाकी खाक
स्फोटामुळे या बारचे शटर उखडून मुख्य रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एका चारचाकीवर आदळले. याशिवाय बारच्या खिडकीची लोखंडी जाळी अशाच पद्धतीने उखडून अन्यत्र पडली. बारबाहेर एक दुचाकी जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच उपसभापती जोशुआ डिसोझा, प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर, नगरसेवक तारक आरोलकर, ॲड. शशांक नार्वेकर, डॉ. नूतन डिचोलकर, स्वप्निल शिरोडकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

स्फोटामुळे वाहनांचे, बंगल्याचे नुकसान
या स्फोटामुळे डांगी कॉलनीतील इमारतीच्या भिंतींना तसेच शेजारच्या काही घरांच्या भिंतींनाही तडे गेले. तर बाजूच्या एका बंगल्याच्या खिडकीची तावदाने फुटली. या स्फोटामुळे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे डांगी कॉलनीतील 7 सदनिका, कॉलनी जवळपास असलेला एक बंगला, पार्क करून ठेवलेल्या तीन चारचाकी गाड्या व 3 दुचाक्यांचे नुकसान झाले. तसेच ज्या हिल टॉप बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये हा स्फोट झाला त्या रेस्टॉरंटची शटर्स या स्फोटामुळे तुटून पडली.