म्हादई वाचविण्यास सरकार गंभीर नाही

0
6

म्हादई बचाव अभियानचा आरोप

म्हादई प्रश्नावरून काल म्हादई बचाव आंदोलनाच्या नेत्या व माजी मंत्री निर्मला सावंत यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना गोवा सरकावर जोरदार टीका केली. म्हादई वाचवण्यासाठी गोवा सरकार गंभीर नाही आणि त्यात त्यांना रसही नाही, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला. म्हादई प्रश्नी कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला असतानाही गोवा सरकारने अद्याप न्यायालयात अवमान याचिका दाखल केलेली नाही, याचे आपणाला आश्चर्य वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. कर्नाटकच्या डीपीआरला गोव्याच्या ‘चीफ वाइल्ड वार्डन’ने मंजुरी देऊ नये तसेच या प्रकरणी त्याने गोव्याच्या बाजूने निवाडा द्यावा यासाठीही गोवा सरकारने कोणतीही पावले उचलली नसल्याचे त्या म्हणाल्या. वरील सर्व गोष्टींकडे पाहिल्यास गोवा सरकारला म्हादईच्या बाबतीत विजय मिळवण्यास रस नाही हे उघड होत असल्याचे त्या म्हणाल्या.

म्हादईप्रश्नी म्हादई बचाव आंदोलनाने जर लढा दिला नसता तर 2017 सालीच कर्नाटकने म्हादईचे पाणी पळवण्याच्या कामात यश मिळवले असते, असा दावा निर्मला सावंत यांनी काल केला. पांचाळ आयोगाने पाणी वाटप करताना कर्नाटकला जेवढे पाणी दिलेले आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी कर्नाटक म्हादईतून पळवू पाहत आहे. त्याला गोवा सरकारने न्यायालयात आव्हान द्यायला हवे, अशी मागणीही सावंत यांनी यावेळी केली.