म्हादईनंतर गोव्यावर विर्डी धरणाचे संकट

0
10

>> विर्डी धरणाचे काम 7 वर्षांनंतर पुन्हा सुरू

>> गोवा सरकारने सतर्क राहण्याची गरज

महाराष्ट्र सरकारच्या दक्षिण रत्नागिरी पाटबंधारे खात्याने गेली सात वर्षे बंद असलेले विर्डी (दोडामार्ग) धरणाचे काम पुन्हा सुरू केले आहे. म्हादईचे संकट समोर असताना आता विर्डी धरणामुळे गोव्यावर दुहेरी संकट उभे ठाकणार आहे. या बाबतीत राज्य सरकारला आता अधिक दक्षता घ्यावी लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विर्डी धरणाचे काम 7 वर्षांपूर्वी जोमाने हाती घेण्यात आले होते. त्यावेळी त्रिसदस्यीय म्हादई जल लवादाच्या समितीने त्या ठिकाणी पाहणी करून महाराष्ट्राला धारेवर धरले होते. कोणतेही पर्यावरणीय परवाने न घेता काम युद्धपातळीवर त्यावेळी सुरू ठेवले होते. त्यावेळी लवादाने कडक शब्दांत अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने काम बंद ठेवले होते. परवाने घेतल्याशिवाय काम सुरू करणार नसल्याचे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले होते. त्यावेळी गोव्यातील पर्यावरणीय कार्यकर्त्यांनी सातत्याने याबाबत जागृती करीत हे काम बंद पाडण्यास भाग पाडले होते.

जोमाने काम सुरू
दरम्यान, काल रविवारी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी विर्डी धरण प्रकल्प परिसराला भेट दिली असता त्या ठिकाणी जेसीबी तसेच इतर मशिनरीने काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आल्याची माहिती केरकर यांनी दिली.
या संदर्भात दक्षिण रत्नागिरी पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार काम हाती घेण्यात आल्याची माहिती धरण परिसरात उपस्थित कंत्राटदाराने दिली.

विर्डी धरणामुळे या भागातील परिसरावर अनेक प्रकारे परिणाम जाणवणार असून ते काम बंद करण्यासाठी सात्यत्याने पाठपुरावा केला होता व लवादाने महाराष्ट्र सरकाला फटकारले होते. लवादाने महाराष्ट्राला 1.33 टीएमसी पाणी देण्याचे मान्य केले होते. त्यासाठी सर्व ते पर्यावरणीय दाखले घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले होते. भुयारी कालवे व बोगद्यातून पाणी वळवण्यासाठी महाराष्ट्राने या पूर्वीच योजना आखलेली आहे. आता नव्याने काम सुरू करण्यात आल्याने गोव्याला सतर्क राहावे लागणार आहे.

हे भाजपचे चौथे इंजिन ः काँग्रेस

विर्डी येथे धरण बांधून महाराष्ट्र आता गोव्याचे पाणी वळवू पाहत आहे या बद्दल तीव्र संताप व्यक्त करताना काँग्रेसने, गोव्याचे पाणी वळवण्यासाठी आता महाराष्ट्रातील भाजपचे सरकार प्रयत्न करत असून हे भाजपचे चौथे इंजिन असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपच्या सुस्त व विश्वासघातकी वृत्तीमुळे म्हादईची हत्या झाली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून हे काम बंद पाडावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

धरणाचे काम जोरात सुरू असल्याचे पाहणीत स्पष्ट

काल रविवारी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी विर्डी धरण प्रकल्प परिसराला भेट दिली असता त्या ठिकाणी जेसीबी तसेच इतर मशिनरीने काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आल्याची माहिती केरकर यांनी दिली. या संदर्भात दक्षिण रत्नागिरी पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार काम हाती घेण्यात आल्याची माहिती धरण परिसरात उपस्थित कंत्राटदाराने दिली.
विर्डी धरणाची उंची 48.375 मीटर असून लांबी 736 मीटर आहे. या धरणाच्या माध्यमातून 14.138 एमसीएम पाणीसाठा उपलब्ध करण्याची त्यांची योजना आहे.

विर्डी धरणामुळे या भागातील परिसरावर अनेक प्रकारे परिणाम होणार असून ते काम बंद करण्यासाठी सात्यत्याने पाठपुरावा केला होता व लवादाने महाराष्ट्र सरकाला फटकारले होते.