मुरगाव बंदरात अमोनिया वायू गळती

0
5

>> एमपीएच्या अग्निशमन दलाकडून तात्काळ नियंत्रण; धोका टळला

मुरगाव बंदरातील धक्का क्र. 8 वर लागलेल्या ‘एसटी – ओस्लो पनामा’ इंधनवाहू जहाजातून अमोनिया वायू काढताना काल अचानक गळती लागली. यावेळी एमपीएच्या अग्निशमन दलाने अमोनिया वायू गळतीवर नियंत्रण आणले. त्यानंतर घटनास्थळी गोवा अग्निशमन दलाचे जवान, पॅरादीप प्रास्पेट आस्थापनाचे अधिकारी, एमपीएचे अधिकारी, मुरगाव पोलीस दाखल झाले.
मुरगाव बंदरातील धक्का क्र. 8 वर इंधनाची जहाजे लागत असतात. त्यानंतर येथूनच भूमिगत वाहिनीतून सर्व प्रकारचे इंधन जेटी, वास्को, साकवाळ येथील विविध आस्थापनांमध्ये असलेल्या टाकीमध्ये साठवून ठेवले जाते.

मंगळवारी सकाळी ‘एसटी – ओस्लो पनामा’ जहाज अमोनिया वायू भरून आले होते. सर्व ती खबरदारी घेतल्यानंतर या जहाजातील अमोनिया वायू भूमिगत वाहिनीद्वारे बंदरात जवळच असलेल्या झुआरी ॲग्रो – पॅरादीप प्रास्पेट आस्थापनाच्या अमोनिया वायू टाकत साठवून ठेवली जाते; पण दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जहाजातून अमोनिया वायू वाहिनीतून जाताना अचानक गळती लागली. त्यानंतर लगेचच एमपीए अग्निशमन दलाच्या जवानांनी अमोनिया वायू गळतीवर नियंत्रण आणले.

टाकी अन्यत्र हलवा;
अन्यथा मोर्चा : आमोणकर

मुरगाव बंदरात अमोनिया वायू गळती झाल्याची माहिती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हे घटनास्थळी दाखल झाले. मुरगाव बंदरातील अमोनिया वायू साठवून ठेवणारी टाकी म्हणजे टाईम बॉम्ब असून, ती त्वरित दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी संकल्प आमोणकर यांनी केली. ही अमोनिया टाकी येथून स्थलांतरित केली नाही, तर मुरगाववासियांना घेऊन झुआरी ऍग्रो – पॅरादिप प्रास्पेट आस्थापनावर मोर्चा नेण्याचा इशाराही आमोणकर यांनी दिला.