मुख्य सचिवांच्या भूरुपांतरप्रकरणी काँग्रेसचा मोर्चा

0
9

>> हळदोणा गावात शेतजमिनीत बंगला बांधल्याचा दावा; तात्काळ राजीनाम्याची मागणी; राज्यपालांनी हस्तक्षेप करावा

गोव्याचे मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी हळदोणा गावातील सर्वे क्रमांक 36/1 या भातशेतीच्या जमिनीत बंगला उभारल्याच्या प्रश्नावरुन काल राज्यात एकच खळबळ माजली. भूमाफियानंतर आता सरकारी अधिकारीही जमीन रुपांतरे करू लागले असल्याच्या आरोप काल काँग्रेस पक्षाने केला. तसेच राज्यपालांकडे या प्रकरणात हस्तक्षेप करुन चौकशी करण्याची मागणी केली. त्याचबरोबर संध्याकाळी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी या प्रकरणी मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांना घेराव घालून जाब विचारण्यासाठी पर्वरी येथील सचिवालयाकडे आपला मोर्चा नेला; मात्र सचिवालयाजवळील फाटकाजवळ पोलिसानी त्यांना रोखून धरले. यावेळी काँग्रेस नेते व पोलीस यांच्यात बरीच धक्काबुक्कीही झाली.

सविचालयाजवळ मोर्चा घेऊन गेलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसचे हळदोणा मतदारसंघाचे आमदार कार्लुस फेरेरा, काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर, अमरनाथ पणजीकर, जॉन नाझारेथ व अन्य नेत्यांच्या समावेश होता. यावेळी हे मोर्चेकरी व पोलीस यांच्यात बरीच बाचाबाची व धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी केवळ पाच जणांच्या शिष्टमंडळाला आत सोडण्याची तयारी दाखवली होती, ती काँग्रेस नेत्यांनी फेटाळली. मुख्य सचिव आपल्या कार्यालयातून निघून गेले असल्याचेही त्यांना नंतर कळवण्यात आले. त्यामुळे नंतर मोर्चेकऱ्यांना माघारी फिरावे लागले.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल केलेल्या ट्विटमधून पुनित कुमार गोयल यांनी ज्या सर्वे क्रमांक 36/1 मधील शेतजमिनीत बंगला बांधला आहे, त्या शेतजमिनीचे 17(2) अन्वये रुपांतर करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी गोयल यांना जर स्पष्टीकरण देता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राज्यपालांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही पाटकर यांनी केली.

मुख्य सचिवांनी प्रतिमा
डागाळण्याचा प्रयत्न : राणे

काल नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी त्यांना मुख्य सचिवांच्या शेतजमिनीतील बंगल्याविषयी सवाल केला. पुनित कुमार गोयल यांनी भूरुपांतर केलेले नाही. हा बंगला खरेदी करण्यापूर्वी त्यांनी राज्य सरकारची आवश्यक ती परवानगी घेतली असल्याची माहिती राणे यांनी दिली.

याप्रश्नी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे सांगतानाच गोयल यांनी कोणतीही बेकायदेशीर कृती केली नसल्याचा दावाही राणे यांनी केला. गोयल हे एक उत्कृष्ट अधिकारी असून, ते एक चांगले व्यक्ती असल्याचेही राणे म्हणाले. गरज नसताना काही लोक विनाकारण त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही राणे यांनी केला.

18,075 चौ. मी. जमिनीचे निवासी क्षेत्रात रुपांतर

हळदोणा येथील सर्वे क्रमांक 36/1 या शेत जमिनीतील 18,075 चौ. मी. एवढ्या जमिनीचे निवासी क्षेत्रात रुपांतर करण्यात आले असून, ही जमीन त्यातील बंगल्यासह राज्याचे मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी खरेदी केली असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.