मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य द्वेष पसरवणारे

0
14

>> काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर सनातन धर्म टिप्पणीप्रकरणी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत आपल्या वक्तव्यातून द्वेष भावना पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

भाजप देशात सर्वत्र धार्मिक विद्वेषाचे विष कालवत आहे. तो त्यांचा राष्ट्रीय अजेंडा झाला आहे. मुख्यमंत्री आधी ही भाषा बोलत नव्हते. मात्र, आता तेही दुसऱ्या राज्यात जाऊन धार्मिक भेदभावाबाबत बोलत आहेत, अशी टीका पाटकर यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मध्यप्रदेशातील भाजपच्या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाने सनातन हिंदू धर्माचा अपमान केल्याचा दावा केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काँग्रेसने सनातन हिंदू धर्माचा अपमान कसा केला याचे स्पष्टीकरण करावे, असा आव्हान प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी दिले.
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. गोव्यात 450 वर्षे पोर्तुगिजांचे राज्य होते. तरीही आज गोव्यात हिंदू बहुसंख्य आहेत. राज्यात धार्मिक भेदभावाचे वातावरण कधीच नव्हते.
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसने कसा, कधी अपमान केला हे उदाहरण देऊन स्पष्ट करावे, असे कवठणकर यांनी सांगितले.