मुख्यमंत्र्यांचा उद्या राज्यभरातील पालक, शिक्षकांशी संवाद

0
11

>> शिक्षण संचालकांची माहिती; ९३२ प्राथमिक विद्यालये कार्यक्रमात सहभागी होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत राज्यातील प्राथमिक विद्यालयातील शिक्षक, पालक आणि पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सरकारी आणि अनुदानित मिळून एकूण ९३२ प्राथमिक विद्यालयातील शिक्षक, पालक या संवाद कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत. या ऑनलाइन संवाद कार्यक्रमासाठी राज्यभरात प्रमुख १३७ ठिकाणी कार्यक्रमासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमातून नवीन शैक्षणिक धोरण २०२०, मूल्यवर्धन शिक्षण, माध्यान्ह आहार, समग्र शिक्षा अभियान व इतर विषयांबाबत जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहे. या कार्यक्रमात निवडक पालकांना प्रश्‍न विचारण्याची संधी दिली जाणार आहे. या कार्यक्रमात सरकारच्या ७१८ आणि अनुदानित २१४ विद्यालयातील शिक्षक व पालकांचा सहभाग असणार आहे. राज्यातील विद्यालयातून देण्यात येणार्‍या माध्यान्ह आहाराच्या दर्जावर संबंधित विद्यालय व्यवस्थापन, पालक-शिक्षक संघाचे लक्ष असते. माध्यान्ह आहाराबाबत येणार्‍या तक्रारीची योग्य दखल घेतली जाते, असेही शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

‘त्या’ शिक्षकाला रुजू होण्याचे आदेश

सांगे तालुक्यातील वालंकिनी कॉलनीतील प्राथमिक शाळेतील शिक्षिका निवृत्त झाल्यानंतर त्या शाळेत नव्याने नियुक्त करण्यात आलेला शिक्षक रुजू झालेला नाही. आता, शिक्षण खात्याने त्या शाळेत पर्यायी शिक्षकाची नियुक्ती केली असून, पूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकाला त्वरित शाळेत रुजू होण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असून, तो शिक्षक दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

सांगे येथील भाग शिक्षणाधिकार्‍यांनी सदर प्राथमिक शाळेत मंगेश गावकर यांची नियुक्ती केली होती. तथापि, तो शिक्षक अजूनपर्यंत त्या ठिकाणी रुजू झालेला नाही. त्यामुळे स्थानिक सरपंचांनी पुढाकार घेऊन स्थानिक तरुण प्रेमानंद रेकडो याला मुलांना शिकविण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षण संचालनालयातून त्या शाळेत सध्या पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१४२ शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू
सरकारी विद्यालयात शिक्षकांची कमतरता आहे. नवीन १४२ शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा व इतर सोपस्कार पूर्ण केले जाणार आहे, असेही शिक्षण संचालकांनी सांगितले.