माविन गुदिन्होंनी घेतली नितीन गडकरींची भेट

0
18

>> वाहतूक खात्याच्या कामांवर झाली चर्चा

केंद्रीय महामार्ग, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची राज्याचे वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन सुमारे 600 कोटी रुपयांच्या वाहतूक खात्याच्या संबंधित विविध विकास कामांवर चर्चा काल केली.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमवेत मंत्री गुदिन्हो यांनी राज्यातील नियोजित सहाशे कोटी रुपयांच्या विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातील बसस्थानकांची परिस्थिती योग्य नाही. केंद्र सरकारच्या सहकार्यातून पीपीपी धर्तीवर बसस्थानकांचा विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पणजी, म्हापसा, मडगाव आणि वास्को येथील बसस्थानच्या नूतनीकरणाच्या कामाला प्राधान्य देण्याची विनंती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्यातील सोळाही बसस्थानकाचा विकास करण्याचे आश्वासन मंत्री गुदिन्हो यांना दिले आहे. राज्यातील गोवा कदंब वाहतूक मंडळाला बसगाड्यांची कमतरता जाणवत आहे. केंद्रीय योजनेतून आणखी 500 इलेक्ट्रिक बसगाड्या उपलब्ध करण्याची मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. गोवा सरकारला पहिल्या टप्प्यात 250 इलेक्ट्रिक बसगाड्या उपलब्ध करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले आहे. गोवा सरकारने केंद्र सरकारकडे केलेल्या विविध मागणीचा पंधरा दिवसांनी फेरआढावा घ्यावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली आहे. मंत्री गुदिन्हो यांनी दाबोली ते वेर्णा जंक्शन रस्त्याच्या विषयावर चर्चा केली आहे. या बैठकीला गोवा सरकारचे वाहतूक सचिव, वाहतूक संचालक, गोवा कदंब महामंडळाचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती.