बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर ओडिशामध्ये काल आणखी एक विचित्र रेल्वे अपघात घडला. एका मालगाडीखाली सापडून सहा मजुरांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जाजपूर रोड रेल्वेस्टेशनजवळ काही मजूर बाजूच्या रेल्वे रुळावर काम करत होते. अचानक वादळी वारे वाहू लागले आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे मजूर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या मालगाडीच्या खाली लपले. मात्र ही मालगाडी अचानक हलली आणि चाकाखाली सापडून जागीच चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही जखमींपैकी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार या मालगाडीला इंजिन नव्हते. जोराचा वारा आणि पाऊस पडत होता त्यादरम्यान हे मजूर मालगाडीच्या खाली आडोशाला गेले; मात्र अचानक विनाइंजिनची मालगाडी धावली आणि हे मजूर तिच्याखाली सापडले.