‘मातृछाया’- स्वप्नपूर्तीची ४६ वर्षे

0
16
  • – विजय कापडी

आजपासून बरोबर शेहेचाळीस वर्षांपूर्वी, म्हणजे १९७६ सालच्या १४ नोव्हेंबर या ‘बालकदिनी’ ‘मातृछाये’ची स्थापना होऊन कामकाजाला सुरुवात झाली. एखादं इवलंसं रोपटं भरभर वाढत जाऊन सुखकर सावली देणारा वटवृक्ष व्हावा, इतका विकास या संस्थेनं आज निश्‍चितच साधला आहे. या समाजसेवी संस्थेविषयी…

दक्षिण गोव्यातील अंत्रुज महाल तिथल्या देवदेवतांच्या भव्य मंदिरांबद्दल आणि भाविकांच्या येण्या-जाण्याच्या अखंड ओघाबद्दल ओळखला जातो, हे खरं असलं तरी तिथल्याच ढवळी या छोट्याशा गावात उभी असलेली ‘मातृछाया’ ही वास्तू आज तितकीच महत्त्वाची मानली जाते. ‘मातृछाया’ ही एकप्रकारची स्वप्नपूर्ती आहे आणि आज मितीस तिची उणीपुरी शेहेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘मातृछाया’ म्हणजे मातेची सावली. इवल्याशा नवजात अर्भकांची सर्वात सुरक्षित, उबदार आणि आनंददायी हक्काची जागा म्हणजे मातृछाया. ज्या दुर्दैवी बालक-बालिकांच्या नशिबी हे स्वर्गसुख काही कारणाने हिरावले जाते, अशांसाठी ‘मातृछाया’ ही वास्तू आपले दोन्ही हात पसरून सुहास्य मुद्रेने स्वागतास उभी आहे. ‘बाळांनो, तुम्ही या सुंदर जगात एकटे नाही आहात, आमची सोबत तुमच्याचसाठी आहे’ अशी उबदार भावना देणारी सेवाभावी संस्था म्हणजे ‘मातृछाया!’

आजपासून बरोबर शेहेचाळीस वर्षांपूर्वी, म्हणजे १९७६ सालच्या १४ नोव्हेंबर या ‘बालकदिनी’ ‘मातृछाये’ची स्थापना होऊन कामकाजाला सुरुवात झाली. एखादं इवलंसं रोपटं भरभर वाढत जाऊन सुखकर सावली देणारा वटवृक्ष व्हावा, इतका विकास या संस्थेनं आज निश्‍चितच साधला आहे. अर्थातच, गोवा आणि गोव्याबाहेरील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या भरघोस आर्थिक मदतीच्या साहाय्याने. अनाथ बालक-बालिकांप्रति आदर्शवत प्रेम दर्शविणार्‍या या संस्थेला ४६ वर्षे पूर्ण होऊन, नव्या वाटचालीच्या दिशेने जाताना पाहून अचंबित तर व्हायला होतेच, शिवाय या संस्थेची सुरुवात नेमकी कशी झाली असेल यासंबंधीचं कुतूहलही जागृत झाल्यावाचून राहत नाही. उपलब्ध माहितीनुसार, सर्वश्री मधुकर दीक्षित, ग. ना. कापडी, वल्लभ करमली आणि इतर समविचारी तरुणांना अशा एका संस्थेच्या उभारणीचा ध्यास लागला, जेणेकरून काही व्यक्तिगत कारणांसाठी मातापित्यांनी आपली जबाबदारी झटकून आपल्याच पोटच्या पाल्यांना अनाथ केले, त्या दुर्दैवी अर्भकांना आधार वा आश्रय उपलब्ध व्हावा. इतकेच नव्हे तर त्यांच्या वाढत्या वयानुसार संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याची संधी प्राप्त करून देणारी संस्था उभी राहिली पाहिजे, या विचारांनी प्रेरित केले.

अर्थातच अशा सेवाभावी कामासाठी सरकारी मदतीचा हात लागणे आवश्यक वाटल्यामुळे, त्यासंदर्भात घेतलेल्या भेटीत सरकारतर्फे प्रश्‍न विचारला गेला की, ‘तुम्ही उभा करू पाहत असलेल्या अनाथाश्रमात किती मुलं आहेत?’ आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, या सरकारी प्रश्‍नानं निरुत्तर झालेल्यांच्या मदतीला साक्षात नियतीच धावून आली! सरकारी भेटीनंतरच्या अवघ्याच काही दिवसांत सावर्डे-कुडचडे रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीच्या एका डब्यातून एका अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्यांनी त्याच्या दिशेनं धाव घेतली आणि त्या अनाथ अर्भकाचा कायदेशीर ताबा घेऊन ‘मातृछाये’तर्फे त्याचं नाव ठेवलं गेलं- सगुण. मात्र त्यावेळी संस्थेची इमारत उभी झालेली नसल्याने ढवळी परिसरातील एक सेवाभावी महिला सविता रामनाथकर यांच्या हवाली ते बालक करण्यात आलं.

दरम्यान, एक समाजहितचिंतक श्रीयुत दुर्गानंद सावर्डेकर यांच्या मदतीने कवळे देवस्थानकडून ‘मातृछाये’ची इमारत उभी करण्यासाठी जागा उपलब्ध झाली आणि बांधकाम खात्यातील एक अभियंता श्री. प्रभावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत उभी झाली. दरम्यान, अनाथ मुला-मुलींची संख्या वाढत गेली आणि अनाथांना परिपूर्ण ‘घरपण’ देण्याच्या महत्त्वाकांक्षेला गती मिळाली.

आजच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं संस्थेच्या कामकाजाचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केल्यास, तिथली सर्वांगीण प्रगती पाहून अचंबित व्हायला होते. संस्थेच्या अगदी सुरुवातीच्या एका इमारतीनंतर आता आणखी तीन इमारतींची भर पडलेली दिसते. ढवळी, तळावली, मडगाव आणि म्हापसा या ठिकाणच्या इमारतींत तळावलीची केवळ बालकांसाठीची इमारत सोडल्यास अन्य तीन ठिकाणी बालिकांचं वास्तव्य आहे. चारही ठिकाणचा कर्मचारी स्त्री-पुरुषवर्ग हा ताई, दीदी, मामा, दादा, भाई या घरगुती नावांनी संबोधिला जातो. तिथली मुलं आणि कर्मचारिवर्ग यांच्यातील घनिष्ठ नातेसंबंधावर एकप्रकारचा शिक्कामोर्तबच होतो म्हणा ना!
वर्षभरात तुमच्या-आमच्यासारख्यांच्या घरोघरी होणारे पारंपरिक सण येथे मोठ्या उत्साहाने, सर्वांच्या सहकार्याने साजरे केले जातात. वर्षाच्या सुरुवातीचा गुढीपाडवा, होळी- रंगपंचमी, आषाढी एकादशी, कृष्णजन्म- दहीहंडी, राखीपौर्णिमा, गणेशचतुर्थी, दिवाळी- तुलसीविवाह आदी सण मुलामुलींच्या आनंदात भर घालतात. दिवाळीच्या दिवसांत आकाशकंदिलांची निर्मिती मुला-मुलींकडून होते आणि त्यांची विक्रीही होते. सणांसोबतच स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन हे राष्ट्रीय दिन मोठ्या उत्साहाने पाळले जातात. मुलामुलींचे वाढदिवस साजरे होतात. लहानग्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्यकॅम्प आयोजिले जातात… विविध खेळ, मलखांबावरील कसरती, समूहगीतं, बुद्धिबळ, चित्रकला, रांगोळी इ. स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वयानुरूप शिक्षणाची सुरुवात करून दिली जाते. पहिल्या वर्गापासून ते थेट पदवी प्राप्त होईपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या पारंपरिक शिक्षणासोबत इतरांप्रति बंधू-भगिनीभाव, आदरभाव आणि अकस्मात उभ्या राहणार्‍या प्रसंगांना यथोचित सामोरं जाण्याचं शिक्षणही इथं मिळून जातं.

आजच्या दिवशी, शिक्षणप्राप्तीच्या बाबतीत विशेष रुची दर्शविणार्‍या आणि आपलं ध्येय प्राप्त केलेल्या दोन विद्यार्थिनींचा नामोल्लेख आवश्यक वाटतो. त्यातली एक आहे कुमारी नीता सावंत, जिनं वयाच्या नवव्या वर्षी केवळ उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन ‘मातृछाये’त प्रवेश घेतला आणि एम.कॉम.पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून आज अर्थार्जन करते आहे. दुसरी आहे रिश्‍वा. २००७ साली तिनं संस्थेत प्रवेश घेतला आणि पहिल्या इयत्तेपासून ते मायक्रोबायोलॉजी या विषयाची पदवी प्राप्त होईपर्यंत एकचित्त अभ्यासाचं दर्शन इतरांना घडविलं… इतर विद्यार्थी-विद्यार्थिनीदेखील कमीजास्त प्रमाणात शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत.

‘मातृछाये’ने दरम्यानच्या काळात आणखी एक सामाजिक कार्य सुविहित केलेले आहे. २००२ साली बांबोळी येथील सरकारी इस्पितळाजवळच ‘रुग्णाश्रय’ नावाची संस्था उभी करून, रुग्णांसोबत येणार्‍या त्यांच्या आप्तस्वकीयांना अल्प दरात सोय उपलब्ध करून देण्याचं सत्कार्य साधलं आहे. अशा प्रकारची सेवा देणारं, सरकारी इस्पितळाजवळचं ‘रुग्णाश्रय’ हे कदाचित भारतातील पहिलंवहिलं उदाहरण असावं.
शेवटी ‘मातृछाये’च्या शेहेचाळीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीस आपण सारे नतमस्तक होऊया.