माणसांचं जग- ५२ मातीवर प्रेम करणारा चंदूकाका

0
176
  • डॉ. जयंती नायक

मायभूमीशी तुटून परगावात उपरं जीवन वाट्याला आल्यामुळं त्यांच्या मनाची झालेली तगमग अतिशय वास्तव रूपात उभी झाली आहे. कविता लिहिण्यासाठी त्यांनी लेखणी जीवनाच्या सांजसमयी हातात घेतली, म्हणूनच त्यांच्या एकुलत्या एक कवितासंग्रहाचं नाव ‘मनसांज’ ठेवण्यात आलं.

 

चंदूकाकानं या जगाचा निरोप घेतला त्याला आता चार वर्षे होऊन गेली. परंतु मला त्यांची सदैव आठवण येते. आमच्या गावची खूप माणसे-कुटुंबे मुंबईला स्थायिक आहेत, परंतु चंदूकाकांना गावची, गावच्या मातीची, मायभाषेची जेवढी ओढ होती तेवढी मी कुणातच बघितलेली नाही.

चंदूकाका माझे सख्खे काका नव्हे. परंतु सख्ख्या काकांविषयी जेवढं प्रेम आणि आदर वाटावा तेवढा मला त्यांच्याविषयी वाटत होता. ते पिंडानं कलाकार होते. कला त्यांच्या नसानसांत भिनलेली. परंतु सांसारिक जंजाळात जास्त गुरफटल्यामुळे पाहिजे तेवढे कलेसाठी जीवन समर्पित करणे त्यांना जमले नाही अन् त्यांच्यामधील कलाकार उपेक्षितच राहिला. त्यांच्या अंगात फोटोग्राफीची कला होती. ही कला त्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून वापरली. त्यांना माणसांची छायाचित्रे घेण्याबरोबरच निसर्गाची छायाचित्रे घेण्याचा छंद होता. त्यांनी कित्येक विहंगम दृश्ये आपल्या कॅमेर्‍यात टिपली होती. ते चित्रकार होते. रंगांशी त्यांचं नातं लहानपणापासूनचं. ते सांगायचे, लहान असताना आपण एका फळ्यावर कोळसा घेऊन डोंगर, नदी, पक्षी, सूर्योदय वगैरे चित्रे रंगवायचो. मग खडूनं… तिथून पुढं कुंचला अन् रंग… असा त्यांचा रंगांचा प्रवास घडत गेला. त्यांना रंगसंगती एकदम छान जमत असे. त्यांची चित्रे बघताना मन हरखून जायचे. खूप चित्रे त्यांनी काढली. कल्पनेतली अन् वास्तव. निसर्गचित्रांची त्यांत जास्त भर होती. त्यांच्या खूप चित्रांमध्ये गाव, गावचं जीवन आणि बालपण रंगवलेलं आहे. किंबहुना अशा चित्रांचीच संख्या जास्त आहे. त्यांनी पोर्ट्रेट पेंटिंग्सही केलेली आहेत. परंतु एवढी सुंदर चित्रे काढली असूनही त्यांचे कधी प्रदर्शन मांडणे मात्र त्यांना आपल्या सांसारिक व्यवहारात जमलं नाही. जीवनाच्या संध्याकाळी या गोष्टीचं शल्य त्यांना खूप टोचत होतं. म्हणून आपल्या चित्रांचं गोव्यात कला अकादमीच्या आर्ट गॅलेरीत प्रदर्शन मांडण्याची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली होती, परंतु या ना त्या करणामुळे ते राहूनच गेलं.

चंदूकाका कविताही करायचे. सुरुवातीला त्यांनी मराठीतून खूप कविता लिहिल्या. परंतु मुंबईला असूनही त्यांनी त्या कधीच कुठल्या मासिकात छापायला पाठवल्या नाहीत. आपल्या डायरीतच त्या जपून ठेवल्या. माझ्याशी नातं जमल्यावर ते कोंकणीत कविता लिहायला लागले. मग मराठीपेक्षा ते कोंकणीत जास्त रमले. ते म्हणालेसुद्धा मला, अगं मुंबईला एवढी वर्षं राहिल्यामुळं माझं सुरुवातीचं लिहिणं साहजिकच मराठीत झालं; कोंकणीत लिहायला हवं हे मनातही आलं नाही किंवा कुणी सांगितंलही नाही. तू भेटल्यावर म्हणजे तू कोंकणी भाषेचं काम करते हे जाणून मलाही आता कोंकणीत लिहायची ऊर्मी आली आहे. परंतु एक गोष्ट सत्य आहे, मी मराठीत लिहिलं तरी माझा आत्मा मात्र कोंकणीच आहे. तो गोव्याच्या मातीशी जोडलेला आहे.

कोंकणीत एक कविता लिहिली अन् मग ते लिहीतच राहिले… त्यांनी शंभरवर कविता लिहिल्या. त्यांची कोंकणी कविता खूप परिपक्व, दर्जेदार आणि जीवनाचा प्रगल्भ अनुभव घेऊन आलेली. लयात्मक, काव्यरसानं भिजलेली. त्यांच्या कवितेत त्यांची मायघराची ओढ पुरेपूर दिसते. मायभूमीशी तुटून परगावात उपरं जीवन वाट्याला आल्यामुळं त्यांच्या मनाची झालेली तगमग अतिशय वास्तव रूपात उभी झाली आहे. कविता लिहिण्यासाठी त्यांनी लेखणी जीवनाच्या सांजसमयी हातात घेतली, म्हणूनच त्यांच्या एकुलत्या एक कवितासंग्रहाचं नाव ‘मनसांज’ ठेवण्यात आलं. हे पुस्तक प्रकाशित करण्याचं भाग्य माझ्या ‘राजाई प्रकाशना’ला लाभलं.

काकांमधील कलाकाराच्या ओळखीला तीन पैलू आहेत. एक छायाचित्रकार, दुसरा चित्रकार अन् तिसरा कवी. त्यांच्या या तिन्ही रूपांची नाळ त्यांच्या जन्मगावाशी जोडलेली आहे. माझं तर असं मत आहे की काकांमधला संवेदनशील माणूस आपल्या जन्मभूमीपासून दूर जावे लागल्यामुळे जीवनभर तळमळत राहिला अन् हा तळमळा व्यक्त करण्यासाठी त्यांनी कधी कॅमेरा हातात घेतला, कधी कुंचला, तर कधी लेखणी.

वयाच्या नवव्या वर्षी आपल्या मायेच्या माणसांपासून दूर मुंबईत जाऊन जगण्यासाठी केलेल्या संघर्षाचे व्रण त्यांच्या तोंडावर स्पष्ट दिसत होते. त्यांच्या वागण्यात साधेपणा होता. मुंबईत त्यांचा स्वतःचा फोटोग्राफीचा स्टुडिओ होता परंतु त्याचा बडेजाव त्यांना नव्हता. बोलतानासुद्धा ते शांतपणे एक एक शब्द बोलायचे. मात्र त्यांचं बोलणं खूप विचारपूर्वक असायचं. साहित्य ते राजकारण अशा कित्येक विषयांचं ज्ञान असायचं. जिथं कुठं कुणाचे कान टोचायला हवेत तिथं ते नेमके टोचायचे.

काकांचं मूळ घर आमच्या गावात. माझ्या लहानपणी ते आपल्या कुटुंबासमवेत दरवर्षी गावघरी काही दिवस येऊन राहायचे. माझे वडील अन् ते बरोबरीचे. लहानपणी ते सोबत खेळायचे, गुरांना घेऊन चरवायला जायचे, वगैरे… ते आले म्हणजे वडिलांना भेटायला यायचे. माझ्या भावांबरोबर माझीही विचारपूस करायचे. पण हे सगळे औपचारिक होते. त्यांच्याविषयी मला एकदम आदर वाटला अन् आमचं एक वेगळं नातं जुळून गेलं ते राजभाषा आंदोलनकाळी. त्या दिवसांत काकांच्या पुतणीचं लग्न होतं. काका लग्नाला आलेले. माझा राजभाषा चळवळीत सक्रिय सहभाग होता. तर मी लग्नाला गेलेली. तिथं काकांचे काही गोवेकर नातेवाईक, जे मराठी समर्थक होते, ते माझ्याशी कोंकणी भाषेची टिंगल उडवून हुज्जत घालायला लागले. तेव्हा बराच वेळ चूप बसलेले काका एकदम उठले, त्यांनी त्यांना बरंच खडसावलं, एवढं की त्यांनी शरमेनं मान खाली घातली. त्या वेळेपासून काका मला खूप जवळचे वाटले. त्यानंतर ते जिवंत असेपर्यंत आमची साहित्यिक, वैचारिक देवाण-घेवाण होत राहिली.

काकांचं गोव्यात आपल्या चित्रांचं प्रदर्शन माडण्याचं स्वप्न अपुरं राहिलं… ते थोडसं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. मी संपादित करत असलेल्या अनन्य साहित्यपत्रिकेच्या ५ व्या अंकाच्या मुखपृष्ठासाठी तसेच मलपृष्ठासाठी मी त्यांची पेंटिग्स छापलेली आहेत.