महिला सशक्तीकरण – एक विचार

0
221

– सौ. पौर्णिमा केरकर 

सर्जनशील मानव म्हणून प्रत्येकालाच जीवन जगता यावे यासाठी समानता, स्वातंत्र्य, लोकशाही या संकल्पना सर्वमान्य झालेल्या आहेत. असे असले तरी स्त्री-पुरुषांमधील भेद समाजव्यवस्थेच्या मानसिकतेचा अपरिहार्य भाग बनून गेलेला आहे. संपत्ती, शिक्षण, राजकारणाची धुरा पुरुषमंडळीकडे, तर कर्तव्य, नैसर्गिक धर्म, कौटुंबिक स्वास्थ्य, मातृत्व, प्रेम, स्वयंपाक या सार्‍या गोष्टी ओघानेच स्त्रीकडे स्थिरावल्या. कामाची विभागणी, शरीररचना यामुळेसुद्धा स्त्रियांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलत गेला. त्याग, सेवा, शील रक्षण, संस्कार, मातृत्व वगैरे सर्व गुणांचा मिलाफ स्त्री-व्यक्तिमत्त्वात एकत्रितपणे अनुभवण्याची सभोवतालच्या समाजमानसाची असलेली इच्छा, त्यामधून तिच्याकडे सहानुभूतीपूर्वक कटाक्ष टाकण्याची पडलेली सवय… ती अबला, दुर्बल. ती एकटी काहीच करणे शक्य नाही, किंबहुना तिने समूहाला, कुटुंब-संसार यांनाच सोबतीला घेऊन पुढे जायला हवे. तिचे स्वतः निर्णय घेण्याचे मनोबल खचल्यासारखे झाले. मध्ययुगीन कालखंडात तर ‘स्त्री’ एक असहाय्य व्यक्तिमत्त्व, जिला स्वतःचे असे अस्तित्वच नाही अशीच प्रतिमा समोर आली. त्याला छेद देण्याचा संघर्ष अजूनपर्यंत चालू आहे.आजच्या युगाचा विचार करता आमूलाग्र असा बदल स्त्रियांत झालेला दिसतो. महिला मंडळे, स्वयंसाहाय्य गट, विविध संस्था यांच्या माध्यमातून महिलांना एकत्रित येण्यासाठी भरभक्कम व्यासपीठ प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. परंतु हे सशक्तीकरण फक्त आर्थिक दृष्टीतूनच लक्षात घेतले तर मात्र त्याचा विचार करावा लागेल. महात्मा गांधींनी म्हटले होते, ‘स्त्री ही त्याग, क्लेश, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा यांची मूर्ती आहे. तिला दुर्बल म्हणणे ही तिची निंदा आहे. मानसिक बलात ती पुरुषापेक्षा कमी नाही. स्त्री ही अहिंसा, प्रेमाची मूर्ती आहे. ती अहिंसा त्यांनी मानवी समाजापर्यंत पोचविली पाहिजे.’ आजच्या काळाशी या अवतरणाचा सुसंगत अर्थ लावताना प्रगल्भ अशा वैचारिक क्षमतेतून स्त्रियांनी समाजमानसापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या सशक्तीकरणाचा विचार करायलाच हवा.
त्याबरोबरीनेच विचारपरिपक्वता, आरोग्य, आहार, शिक्षण, प्रदेश, देशाविषयीचे सजग भान; कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य; स्वावलंबन, अहंकारविरहित स्वाभिमान; आत्मविश्‍वासाच्या जोडीनेच आलेले आत्मभान; परिसर, प्रदेशाला भेडसावणार्‍या समस्यांविषयीची जागरूक जाणीव ठेवणे व त्यासाठी कृतीशील राहणे… एक व्यक्ती म्हणून समाजमानसाविषयीची संवेदनशीलता अंतःकरणात सतत तेवती ठेवून कार्यरत राहिल्यानंतरचे जे एक समाधान लाभणारे असते, त्याची तुलना करणेच अशक्य असते.
मनात वेगवेगळे हेतू बाळगून, वैविध्यपूर्ण नावांची महिला मंडळे वेगवेगळ्या राजकीय गटांशी आपले कार्यक्षेत्र मर्यादित करून आपल्या सभोवताली वावरताना दिसतात. मोठा थाटमाट करून केलेली या स्वयंसाहाय्य गटांची, महिलामंडळांची उद्घाटने, त्यावेळची भाषणे, स्थापनेमागचे उद्दिष्ट हे सर्व नंतर मात्र विस्मृतीत जाताना दिसते. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सरकारकडून मिळालेले आर्थिक साहाय्य, इतर सरकारी मंडळांकडून महिलांच्या, समाजाच्या, मुलींच्या सबलीकरणाचे उपक्रम राबविण्यासाठी प्राप्त होणारे आर्थिक साहाय्य या सर्वांचा लाभ महिलामंडळाना, स्वयंसाहाय्य गटांना होतो. पण मनात एक प्रश्‍न नेहमी सलतो की हे सर्व आर्थिक साहाय्य खरोखरच सत्कारणी लागते का? की तो निव्वळ एक पार्स आहे, जेणेकरून जेवढे एखाद्या गटाचे सदस्य असतात त्यांच्यामध्येच हा सर्व आर्थिक व्यवहार घडून येतो? या सर्व आर्थिक व्यवहाराला काही महिला मंडळे, स्वयंसाहाय्य गट अपवाद असतीलही, तरीसुद्धा समाजभान बाळगून त्या माध्यमातून वैचारिक, व्यक्तिमत्त्व विकास साधणारे सशक्तीकरण व त्या जोडीनेच आपल्या व्यक्तिगत आणि सामूहिक कौशल्याचा वापर करून प्रामाणिकपणे महिलांचे सशक्तीकरण करायचे झाल्यास काय करावे लागेल, कोणता मार्ग स्वीकारणे महत्त्वाचे ठरेल याचा विचार व्हायला हवा.
स्त्री ही शक्तिरुपिणी आहे. तिच्याकडे असलेली शक्ती म्हणजे कृती करण्याची तिची क्षमता, त्याशिवाय उत्पादनशक्ती, वाक्‌शक्ती, स्मृतिशक्ती, मेघाशक्ती, धृतिशक्ती, क्षमाशक्ती वगैरे. या सर्वच शक्ती एकवटून ती जर कार्यरत राहिली तर मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. तूर्तास तिची उत्पादन क्षमता जरी लक्षात घेतली तरी त्याद्वारे तिच्या सशक्तीकरणाच्या मार्गाला योग्य दिशा सापडू शकेल. आपल्या प्रदेशात पर्यटनदृष्ट्या मोठ्या झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एखाद्या प्रदेशाची वेगळी ओळख सर्वदूरपर्यंत पोहोचते ती तेथील प्रादेशिक वैशिष्ट्यांमुळे. बदलणार्‍या ऋतूमासातील गोव्याचे नैसर्गिक वैभव जसे सर्वांना भुरळ पाडणारे आहे तसेच येथील मासे आणि भाताची ओळख सर्वदूर पोहोचलेली आहे. मांसाहारी पदार्थांप्रमाणेच शाकाहारी खाद्यपदार्थांतसुद्धा गोव्याची वेगळी ओळख आहे. परंतु ती ज्या तर्‍हेने पर्यटकांपर्यंत पोहोचायला हवी तशी ती पोहोचत नाही. मग त्यासाठी महिलामंडळांनी, स्वयंसाहाय्य गटांनी पुढाकार घेऊन खास गोवेकरी खाद्यसंस्कृती रुजविण्यासाठी अन्नपूर्णागृहाची उभारणी करायला हवी. या उपहारगृहात ऋतुमानात उपलब्ध असलेले मासे, नैसर्गिक भाज्या, उकडा तांदूळ, गावठी सुरय तांदळाचा वापर करून जर पर्यटकांना या प्रदेशाच्या खाद्यपदार्थांची ओळख करून दिली, तर तो एक अभिनव प्रयोग ठरेल.
महिलांच्या हाताला उपजतच चव असते असे मानले गेलेले आहे. शिवाय ती नुसतीच आपल्या माणसांसाठी अन्न शिजवत नसते तर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम यांच्यात ते पदार्थ मुरलेले असतात. महिलांनीच पुढाकार घेऊन सरकारच्या आर्थिक साहाय्याच्या माध्यमातून असे उपहारगृह सुरू केले तर महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्याचा हातभार तर लागेलच, शिवाय पारंपरिक अन्नपदार्थांतील गोव्याची ओळख सर्वदूरपर्यंत पोहोचेल. आजघडीला ‘चायनीज’ खाद्यान्नाने आमच्या जिभेची चव बदलवून टाकण्याचा चंगच बांधलेला आहे. त्यासाठी असा उपक्रम महिलांनी एकत्रित येऊन राबविला तर ते मोठे समाजकार्य ठरेलच, शिवाय आर्थिकदृष्ट्या भक्कम आधार प्राप्त होऊ शकतो. ऋतुमानानुसार निसर्गात तयार होणार्‍या भाज्या, त्याशिवाय मेहनत करून लावलेल्या गावठी भाज्या, कंदमुळे यांचा वापर आहारात वाढविणे हे उद्दिष्ट बाळगायला हवे. तेरे, तायखिळा, अळू, कुड्डूक, हुड्डूक, शेवग्याच्या पानांची भाजी, सुरणाची पाने, वालीची पाने, शेवग्याच्या शेंगा, त्याशिवाय माडी, सुरण, झाडकणगे, कारोती, फागला… वगैरे कितीतरी भाज्या. या सार्‍यांचा शोध घेण्यासाठीची शोधक दृष्टी व कष्टसातत्य घेतले तर त्यातून मोठे यश प्राप्त होणारे आहे. गोव्याची खास चव देणारे एकही अन्नपूर्णागृह सर्वसामान्यांसाठी, पर्यटकांसाठी सहजपणे उपलब्ध असलेले दिसत नाही. याकामी महिलामंडळांनी पुढाकार घेतला व प्रामाणिकपणे ही जबाबदारी पेलली तर सशक्तीकरणाच्या बाबतीत ती एक क्रांतीच ठरेल.
दार्जिलिंग या डोंगराळ, थंड प्रदेशात ‘कांचनजंगा’ पॉईंट आहे. ज्या जागेवर सकाळी साडेतीन ते पाच या वेळेत उभे राहून दूरपर्यंत पाहिले तर ‘कांचनजंगा’ हे तिसरे मोठे शिखर पाहता येते. हा नजारा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक भल्या पहाटे, दाट धुक्यात, थंडीवार्‍याचा मारा सहन करीत उभे असतात. त्यावेळी त्यांना उबेची गरज असते. त्या परिसरातील महिलामंडळाच्या हे लक्षात आले. त्यांनी मग जगण्यासाठी मार्ग अवलंबिला. पर्यटक पोहोचण्यापूर्वीच आपण तिथे जायचे, जाताना किटल्या भरून चहा करून न्यायचा, पर्यटकांची तर ‘चहा’ ही त्या दीडदोन तासांची महत्त्वाची गरज असते. त्यामुळे कितीही पैसे मोजून ते चहा घेतात. काहीजण तेवढ्या वेळात दोन-दोन, चार-चार वेळासुद्धा उबदारपणा येण्यासाठी चहा पितात. पर्यटकांची सोय होते व हा उपक्रम राबविणार्‍यांना आर्थिक लाभसुद्धा होतो. एवढ्या उंचीवर येऊन असा काही तासांचा व्यवहार करणे ही सहजसाध्य गोष्ट नाही. त्यासाठी चिकाटी हवी. पहाडी प्रदेशातील महिलांमधील हा चिवटपणा येथे कामी येतो. येथे पर्यटकांप्रतीची सामाजिक जाणीव जशी दिसते, तशीच कणखर जिद्द. त्यातून आर्थिक सक्षमीकरण प्राप्त होते. एकदोन तासांसाठीच तर ही धडपड असते, परंतु त्यातून होणारी आर्थिक उलाढाल मोठी असते. सांगण्याचे तात्पर्य हेच की, आपल्याकडेसुद्धा अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत की जिथे पर्यटकांना हव्या असलेल्या सुविधांची वानवा आहे. कोठे काय कमी आहे त्याचा शोध घेऊन जर आपली कल्पकता वाढविली तर असे स्वाभिमानाचे उपक्रम महिलांना आर्थिक पाठबळ देणारे तर ठरतीच, त्याचबरोबरीने आत्मसन्मानसुद्धा प्राप्त करून देतील. आपण कोणाचेही मिंधे होऊन जगत नाही, उलट कोणाला आपली गरज असेल तर त्यांच्या उपयोगी आम्ही येऊ अशी भावना मनात निर्माण होईल.
अशी खूपशी महिलामंडळे, स्वयंसाहाय्य गट आपापल्या परीने स्वतःचे सक्षमीकरण करत आहेत. छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करून स्वावलंबी झालेले आहेत. काहींनी मोठी झेप घेतलेली आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हायला हवी. उद्योग व्यवसाय करताना पर्यावरण रक्षणाचा वसा घ्यायला हवा. त्याविषयीची जागृती मनामनांत निर्माण करायला हवी. पर्याय शोधायला हवेत. खाद्यपदार्थ खपून भरमसाठ पैसा मिळायला हवा म्हणून रसायनांचा वापर, रासायनिक रंग वगैरेंचा वापर करून लोकमानसाच्या आरोग्याला अपायकारक अशा गोष्टींचा वापर करणे कटाक्षाने टाळायला हवे. आपण माणसे आहोत व आपल्याला माणसांच्या सहवासात राहून जगायचे आहे. निव्वळ पैशांसाठी माणसांच्या आरोग्याशी खेळ मांडायचा नाही ही संवेदना सतत जागी ठेवायला हवी. आपल्याकडे असलेल्या पारंपरिक धनाचा वापर करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड करायला हवी. काण्णा, बिंबल, करमल यांची लोणची घालणे, सरबत तयार करणे, कैरीचे पन्ह, कोकम, आवळा सरबत, फणसांपासूनचे वेगवेगळे प्रकार, नाचणी, उकड्या, गावठी, सुरय तांदळांचा वापर करून केले जाणारे पारंपरिक खाद्यपदार्थ, त्या त्या हंगामात उपलब्ध असलेली कडधान्ये या सगळ्यांचा कौशल्यपूर्ण वापर करून सक्षमीकरणात मोठे यश महिला प्राप्त करू शकतात.
खाद्यपदार्थांबरोबरीने इतर अनेक अंगे व्यावसायिक क्षेत्राची आहेत. महिलांमध्ये अनेक कौशल्ये आपल्याला दिसतात. काही महिला अन्न शिजविण्यासाठी तर काही विणकाम, भरतकामात तरबेत, नृत्य-गायनात निपुण तर लहान मुलाबाळांची काळजी मायेने घेणारे हातही काही महिलांचे तेवढेच आपुलकीचे असतात. उत्पादनात ठसा उमटविण्यासाठी, व्यवसायात स्वतःची वेगळी नाममुद्रा कोरण्यासाठी असंख्य क्षेत्रे महिलांसाठी खुली आहेत. त्याचा प्रामाणिकपणे वापर व्हायला हवा. त्यासाठी बुद्धी स्वच्छ व निर्मळ हवी. काम करण्यासाठी व मिळून सार्‍याजणी पुढे जातानाचा उत्साह हवा. त्याबरोबरच सत्यनिष्ठा, धाडस, प्रेम, करुणा व सहयोगाची भाषा हवी. ‘श्रमशक्ती’ हे नाव स्त्रियांना दिलेले आहे. सातत्याने श्रम करत राहण्याची उपजत शक्ती तिच्याकडे आहे. आजवरची तिची वाटचाल विचारात घेतली तर याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तिच्यातील कणखर लवचीकपणानेच तिला आजपर्यंत जगवलेले आहे. जीवनामध्ये जे काही शुद्ध आहे, सात्त्विक, धार्मिक आहे त्या सार्‍यांचेच संरक्षण करणारी स्त्रीच आहे. म्हणूनच या स्पर्धेच्या युगात तिने विचलित होता कामा नये. आत्मविश्‍वासाला विवेकरूपी वागण्याची जोड देऊन सशक्तीकरणासाठी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा प्रामाणिकपणे विकास करण्यासाठी झटायला हवे. मनातील सद्भावना सतत जागी ठेवून समाजासाठी आपला आदर्श निर्माण करावा, जेणेकरून समाजही आपल्यावर विश्‍वास ठेवण्यासाठी तयार राहील. सकस समाजजीवनाचे मूल्य महत्त्वाचे मानून, वैचारिक प्रगल्भपणाची मूल्ये अंगिकारून साध्य होणारे सक्षमीकरण हे काळाच्या कसोटीवर टिकून राहते.